Wearable technology (2)

उपयुक्त ‘डॉक्टररुपी यंत्रे’!

वेळखाऊ कामे चुटकीसरशी उरकणारी यंत्रे आपल्या जोडीला आली आणि कठीणातले कठीण कामही झटपट होऊ लागले. आपल्या जीवनात यंत्रांचा वावर इतका वाढला, की प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या यंत्रांचा वापर आपण करीत असतो. सध्या मोबाईल सतत सोबत असला, तरी त्याआधी घड्याळ हे हातावर बांधायचे यंत्र व्यक्तिच्या जास्तीतजास्त वेळ सोबत असणारे होते. वेळ पाहाण्याच्या गरजेवरील हा उपाय आता फॅशन ट्रेंड झालाय, मात्र बाजारात घड्याळाप्रमाणे वापरता येणारी नवी यंत्रे आली आहेत, जी वेळ दाखवण्यापलीकडे आपली करमणूक करतात, तसेच आपल्या शारीरिक हालचालींची नोंद करुन आरोग्यदायी सल्लेही देतात.

स्मार्टवॉच, फिटनेस वॉचेस, स्मार्ट क्लोथिंग, स्मार्ट ज्वेलरी ही अंगावर परिधान करता येणारी यंत्रे आपल्या ह्दयाच्या प्रत्येक ठोक्यापासून आरोग्याचा सारा लेखाजोखा ठेवू शकतात. किती किलोमीटर चाललात किंवा किती कॅलरीज बर्न झाल्या अशी माहिती मोबाईलमधील ऍपच्या वापरातून समजत होती. ढोबळमानाने मिळणा-या या माहितीपेक्षा बिनचूक किंवा अगदी परफेक्ट आकडे ही स्मार्ट आरोग्यदायी यंत्रे देतात.

जीपीएस तसेच, ब्लू टुथद्वारे ही यंत्रे स्मार्ट फोनशी जोडली जातात. त्यानंतर, यंत्रातील सेन्सर्स प्रत्येकवेळी हालचालींवर लक्ष ठेवून जमवलेला डेटा लॅपटॉप किंवा मोबाईलला पुरवतात. प्रत्येक दिवसाचा डेटा उपलब्ध असल्याने आठवडभर किंवा महिनाभर सरासरी किती चाललात, किती वजन कमी झाले, कॅलरीज किती बर्न झाल्या, पुढील दिवसांत आणखी किती व्यायाम आवश्यक आहे असा आराखडा सविस्तर आपल्याला पाहाता येतो.

नियमित व्यायाम किंवा डायेट करुन फिटनेसची काळजी घेणा-यांसाठी हे तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आजारी व्यक्तिवर औषधोपचार करणा-या डॉक्टरांना देखील त्या रुग्णाच्या शरीराची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी ही यंत्रसामुग्री उपयुक्त ठरते. आरोग्याची देखभाल करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करणारी ही यंत्रे जणू २४ तास उपलब्ध असणा-या डॉक्टर सारखीच भासतात.
मैत्रिणींनो! दिवसेंदिवस अधिकच स्मार्ट होणा-या नव्या टेक्नोलॉजीचा अचूक वापर करुन स्वत:च्या देहाची काळजी घ्यायलाच हवी. टेक्नोलॉजी शिकून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया, कारण यंत्रांच्या विश्वात झपाट्याने होणारी प्रगती पाहाता, येणारा काळ संपूर्ण यंत्रमय असणार हे निश्चित!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares