डॉक्टर आनंदीबाई जोशी!

डॉक्टर आनंदीबाई जोशी!

३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रात पुणे येथे जन्मलेल्या लहानश्या यमुनेचा ‘डॉक्टर आनंदीबाई जोशी’ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरण्यापर्यंतचा खडतर प्रवास त्यांच्या कतृत्वाची ग्वाही देतो. लग्नाआधी मुलगी म्हणून घरातल्यांचे कुत्सीत वागणे सहन करुन कोमेजलेल्या कोवळ्या आनंदीबाईंचा तत्कालीन बालविवाहाच्या प्रथेनुसार वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी या बिजवराशी विवाह झाला.

गोपाळराव स्त्री शिक्षणाबाबत आधुनिक विचारसरणीची कास धरणारे असल्याने, पत्नीला उच्चशिक्षित करण्यासाठी ते आग्रही होते. ज्यामुळे, आनंदीबाईंना वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी इंग्लडला जाणे शक्य झाले. शिक्षणात आनंदीबाईंच्या नशीबाने व पतीने साथ दिली असली, तरी संसार, परंपरा, पेहराव सा-याबाबतची परिस्थिती मात्र कायम प्रतिकूल होती. त्यांना वयाच्या १४व्या वर्षी मातृत्व प्राप्त झाले, पण अपु-या सुविधांमुळे त्यांचे बाळ दगावले. आनंदीबाईंच्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला व वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्याचा निर्धार त्यांनी केला. कारण, त्याकाळी स्त्रिया तपासणी करण्यासाठी पुरुष डॉक्टरांकडे जाणे टाळत, यामुळे गरोदर असताना मातेच्या आरोग्याची वरचेवर तपासणी न झाल्याने बाळ किंवा आईच्या आरोग्याला धोका निर्माण होत असे. यावरील उपाय म्हणजे, स्त्री डॉक्टर तयार व्हायला हव्यात. आनंदीबाईंनी ही सामाजिक गरज नेमकी ओळखली होती.

शिक्षणाचे हे स्वप्न पूर्ण करताना त्यांच्या आरोग्याची मात्र हेळसांड झाली, इंग्लडमधील वातावरणाला साजेसे कपडे घालण्याची परवानगी नसल्याने त्यांना नऊवारी साडीतच वावरावे लागे, यामुळे थंडीपासून बचाव होत नसे. बोटीवरील २ महिन्यांच्या प्रवासात जडलेल्या आजाराशी झुंज देत त्या डॉक्टर झाल्या, प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करीत त्यांनी शैक्षणिक यश मिळवले व त्या भारतात परतल्या.

कोल्हापूर संस्थानामध्ये डॉक्टर म्हणून कार्य करण्याचा त्यांचा निर्णय आणि आजाराने पुन्हा डोके वर काढले, असह्य दुखणे वाढतच गेले, औषधोपचारानेही सुधारणा होईनासे झाले. क्षयरोगासारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करीत वयाच्या २२व्या वर्षी, २६ फेब्रुवारी १८८७ रोजी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची प्राणज्योत मालवली.

निरंतन कष्ट व दु:ख सोसत अल्प जीवनकाळातही शिक्षणाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करणा-या डॉक्टर आनंदीबाई जोशी समस्त स्त्री वर्गासाठी आदर्श ठरल्या.

Designed and Developed by SocioSquares