eye banner

डोळ्यांचं हित महत्त्वाचं…

गरजेच्या वस्तूंत फॅशनने शिरकाव केला आणि अशा वस्तूंच्या आवश्यकतेपेक्षा ती सौंदर्यात भर पाडण्यास प्राधान्य दिलं जाऊ लागलं. जसं की, डोळ्यांना नंबर असल्याचं समजताच मोजक्या फ्रेम्सपैकी एखादी निवडून त्यावर काचा बसवून घेतल्या जात. आता, तर नंबर नसतानाही लूक बदलण्याच्या उद्देशाने झीरो नंबरचा चष्मा वापरणारे सर्रास दिसतात. यापलिकडे, डोळ्यातील बुबळांचा क्षणार्धात लेन्सेसच्या सहाय्याने रंगबदल देखील करता येतो.

डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाशी निगडीत फॅशन करताना थोडं सावध रहाणंच योग्य! मग आय मेकअपसाठी वापरले जाणारे प्रॉडक्ट असोत किंवा चष्मा की लेन्सेस यापैकी अचूक पर्यायाची निवड करणे असो. ही निवड सोप्पी होईल, जेव्हा या दोन्ही वस्तूंची चांगली वाईट अशी दुहेरी बाजू माहिती असेल.

  1. चष्म्यासारखी पारंपारिक वस्तू वापरण्यास सोप्पी ठरते. त्यामानाने लेन्सेस लावण्याचे काम तसे अवघडचं. नीट जमायला हवे, नाहितरी डोळ्यांच्या आतील बाजूला चिटकून रहातात. व्यवस्थित निघल्या नाहीत, तर डोळ्याला रुपत रहातात, डोळा लाल होतो, सुजतो. चष्मा अशा परिणामांपासून आपणास दूर ठेवतो.
  2. डोळ्यांतील उष्मा किंवा भोवतालच्या वातावरणानुसार चष्म्याच्या काचांवर वाफ जमा होते, तर अशी समस्या लेन्सेस वापरताना भेडसावत नाही. त्याउलट, कॉनटॅक्ट लेन्सेसना वा-यापासून जपावं लागतं. डोळ्यात कचरा गेल्यास, डोळा स्वच्छ करताना तितकाच त्रास होतो. त्याचजागी चष्मा असल्यास मुळात फारसा धुळीचा त्रास डोळ्यांना होत नाही आणि धुळीचे कण गेलेच, तर चष्मा काढून झटपट डोळ्यांवर भरपूर पाणी मारता येते किंवा अगदी ओंजळीत पाणी घेऊन त्यात हलकेच डोळा बुडवता येतो. ही मोकळीक लेन्सेसबाबत मिळत नाही.
  3. तसेच, खेळताना, धावपळीची कामं करताना चष्म्याची अडचण वाटते, तर लेन्सेस तितकीच मोकळीक देतात. अगदी सध्याच्या फोटोसोशल जमान्यात चष्म्यापेक्षा लेन्सेस लावणंच तरुणाई पसंत करते.
  4. या पलिकडे, डोळ्यांची सुरक्षितता सर्वांत अग्रस्थानी असल्याने, हे समजून घ्यायला हवं, की लेन्सेस स्वच्छ न धुतल्यास, सुरक्षितरित्या न घाताळल्यास त्यांच्यामार्फत डोळ्यांना थेट जंतूसंसर्ग होऊ शकतो. हा धोका चष्म्याबाबत तितकासा जाणवत नाही.
  5. सुरक्षेपलिकडे आर्थिकदृष्ट्या दोन्ही पर्यायांकडे पाहिल्यास, चष्मा सर्ववयोगटाला वापरण्यास सोयीस्कर आहे, तसेच स्वस्त दरातही उपलब्ध आहे. याविरुद्ध, लेन्सेस डोळ्यांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्या चांगल्या दर्जाच्याच घ्यावा लागतात. महागही असतात व नंतर त्यांची सुरक्षितता जपणे देखील थोडे जोखमीचे असते.

आता, निवड तुमची असेल? डोळ्यांसाठी हिताचं आणि सौंदर्यासाठी बेताचं काय ठरणार हे अचूक निवडायला हवं, तरच फॅशन व आरोग्याचा योग्य समतोल साधला जाईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares