Pregnancy (2)

डोहाळेजेवणानिमित्त मैत्रिणींसाठी धम्माल खेळ!

गरोदर स्त्रीला सातवा महिना लागताच मोठ्या कौतुकानं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर, आईच्या भूमिकेत प्रवेश करणारी ‘ती’ बाळंतपणासाठी सासरहून माहेरी जायला निघते. त्यापूर्वी आप्तजनांच्या उपस्थितीत पार पडणा-या या सोहळ्यात होऊ घातलेल्या आईचे ओटीभरण, तिच्यासाठी नाजूक कळ्यांची गुंफण असलेले दागिने, आसन म्हणून फुलापानांनी सजवलेला झोपाळा, धनुष्यबाण धरुन काढलेले फोटो या पारंपारिक त-हा आपण आजपर्यंत पाहिल्यात. पण, त्यात हल्ली पाश्चिमात्त्य बेबी शॉवरचा शिरकाव झालाय. ज्याने या समारंभास अधिक मनोरंजक बनवलयं. पाहूण्यांसमवेत मजेशीर खेळ खेळण्याचा पायंडा रुजतोय. त्यापैकीच काही खेळ पुढीलप्रमाणे,

दूधाची बाटली

या खेळासाठी लागणारं साहित्य म्हणजे, तोटी असलेल्या दूधाच्या बाटल्या व कुठलाही ज्युस! दूधाच्या बाटलीत ज्युस भरुन तो खेळाडूंस पिण्यास सांगावा. खेळाडूंना बाटलीतील ज्युस लहान बाळासारखाच चोखून संपवायचा आहे. जो सर्वातआधी ज्युस संपवेल तो विजेता ठरेल.

ओळखा आईचं वय?

उत्सवमुर्ती असलेल्या आईचे लहानपणीचे काही फोटोज टेबलवर मांडून ठेवावेत. खेळात भाग घेतलेल्यांनी ते फोटोज पाहावेत. एक एक करुन साधारण कितव्या वर्षी हा फोटो काढला असावा ते सांगावे. जो सर्वाधिक अचूक उत्तर देईल तो जिंकेल.

उकडलेलं अंड

बालपणी चमचा लिंबू खेळलायत? हा खेळ देखील तसाच आहे, फक्त लिंबाच्या जागी इथे चमच्यावर उकडलेलं पण न सोललेलं अंड ठेवायचं आहे. या अंड्यावर मार्करने छान चेहरे काढावेत किंवा त्यांना रंगरंगोटी करावी. हे अंड चमच्यावर ठेवून, तो चमचा तोंडात पकडून, ठरवून दिलेल्या रेषेपर्यंत जो स्पर्धक सर्वांतआधी पोहोचेल तो विजयी ठरेल.

बाळांचे फोटोज्

डोहाळेजेवणाचे निमंत्रण देतानाच पाहूण्यांना त्यांच्या बाळाचा लहानपणीचा एक फोटो घेऊन यायला सांगावे. सोहळ्याच्या दिवशी पाहूण्यांनी आणलेले फोटोज् जमा करावेत, प्रत्येकाला आकडे देऊन खोलीभर लावावेत. आता, स्पर्धकांना कागद पेन द्यावे व फोटो कुणाचा आहे हे ओळखण्यास सांगावे.  अर्थातच सर्वातजास्त योग्य उत्तरे देणारा स्पर्धक जिंकेल.

चित्रकलेचा तास

या खेळात प्रत्येक स्पर्धकास कागदी प्लेट व एक स्केचपेन द्यावे. त्यांना या प्लेटवर लहान बाळाचे चित्र काढायचे आहे. किती सोप्पा आहे नं खेळ? नक्कीच नाही. कारण, या प्लेट्स कपाळावर धरुन मग त्यावर अंदाजाने चित्र रेखाटायचे आहे. त्यामुळे, नंतर स्पर्धकांनी चितारलेली अतरंगी चित्र पाहून हसून हसून पुरेवाट होईल हे खरे. तेव्हा, त्यातल्यात्यात बरं चित्र काढलेल्या स्पर्धकाला विजयी घोषित करता येईल.

डोहाळे जेवणाचे सर्व सोपस्कार पार पाडताना, सोहळ्या दरम्यान असे खेळ खेळणे नक्कीच मनोरंजक ठरेल. छान छोटी छोटी गिफ्ट्स, रंगीत संगीत कागदात पॅक करुन ठेवावीत, जेणेकरुन खेळानंतर विजेत्यांच्या हातात लगेचच त्यांचे बक्षिस सुपूर्त करता येतील. बक्षिसांमुळे स्पर्धकमंडळीही अधिक हौसेने खेळतील.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares