salad (1)

तरच, मुलं घरचं जेवण आवडीनं जेवतील!

बरीचशी लहान मुलं घरात शिजवलेलं अन्न खाण्यास टाळाटाळ करतात आणि हॉटेल किंवा रस्त्यालगतच्या ठेल्यावरील चमचमीत पदार्थ अगदी मनलावून पोटभर खातात. लहान वयाच घरातल्या अन्नाला नाही म्हणण्याची लागलेली सवय मुलं जाणती झाल्यावरही कायम राहते. मुलं अधिक हट्टी व हेखेखोर बनली, की त्यांना आवरणं पालकांनाही तितकच मुश्किल जातं.

शाळेच्या टिफीनबॉक्स पासून खरेतर पौष्टिक अन्नपदार्थांची गोडी लागण्यास सुरुवात होते. चपाती भाजी न्यायला मुलं कंटाळतात म्हणून, चिवडा, चकली, वेफर्स, न्युडल्स, पावाचे विविध पदार्थ मुलांना डब्यात देण्याची चूक तुम्हीही करत असाल, तर मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी थोडं कठोर व्हावंच लागेल.

खूपशा शाळांमध्ये बालवाडी पासूनच टिफीन बॉक्समध्ये चपाती भाजी आणणं सक्तीच केलंय. जे योग्यच आहे. कारण, या वयात मुलं आई वडीलांहून शिक्षकांचं अधिक ऐकतात, शाळेचे नियमही गांभीर्यानं घेतात. त्यांना पदार्थातील प्रथिने, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थांची शरीराला असणारी गरज पाठ्यपुस्तकात अभ्यासाला असतेच, त्यानुसार आहारात पदार्थांना स्थान देणेही जमायला हवे. मनाविरुद्ध चपाती भाजी घेऊन जाणारी मुलं, सुरुवातील चिडचिड करतील पण पोटाला भूक लागली की व्यवस्थित टिफीन बॉक्स संपवून परततील.

“तू ताटातलं इतकं संपव, मग तुला चॉकलेट, पास्ता किंवा आईस्क्रीम देईल.” असं अमीष दाखवतं असाल. तर पालकहो लक्षात घ्या. ही सवयं पुढे फक्त जेवणाबाबत स्तिमित रहाणार नाही, तर कुठलेही काम करण्याच्या बदल्यात, तुमच्याकडे ते काहीतरी मागतील. ह्या वाईट सवयीला वेळीच अटकाव घालायचा, तर कशाचातरी बदल्यात काहितरी कबूल करण्याची प्रथाच बाद करायला हवी.

बाहेरच्या खाण्यातही दर्जा टिकून रहावा यासाठी, उघड्यावर अन्न शिजवणा-या छोटेखानी रेस्टॉरंटच्या किचन विभागात लहान मुलांना कधीतरी डोकावून पाहायला सांगावं. तेथील अस्वच्छतेचे वर्णन करुन त्यांना जितके समजले नसते, तितके एका पाहाण्यात त्यांना घरातील अन्नाचे महत्त्व समजेल आणि चवीत बदल म्हणून, महिन्यातून एकदा छानशा रेस्टॉरंटमधील मेजवानीचा सर्वांनी मिळून आस्वाद घेणे काही चुकीचे नाही. तितकाच घरातील महिला वर्गास किचनमधील कामांतून आराम मिळतो. आता, इथे रेस्टॉरंट निवडण्याबाबत तुम्ही काटेकोर असाल यात शंकाच नाही.

भाज्या त्याच त्याच पद्धतीने करत राहिल्यास, त्याच नेहमीच्या चवीला छोटे काय मोठेही वैतागतात. अशावेळी, जगभरातल्या रेसिपीज एका क्लिकवर पाहाता येणा-या इंटरनेटचा आधार घेता येईल. भाजी वांग्यांचीच पण पद्धत निराळी, काहितरी नवं फ्यूजन. तुम्हाला बनवायलाही बरं वाटेल आणि खवय्यांना नवं ते हवं असतंच.

लहान मुलांनी चपाती, भाजी, आमटी, वरण, भात, लोणचं, पापड असा सकस आहार आवडीन घ्यावा. म्हणून त्यांना दरडावून चालायचे नाही. तर वरील काही उपाय शांतपणे करणे अधिक चतुराईचे ठरेल. पटतंय ना?

More Articles
Designed and Developed by SocioSquares