read (2)

तरच, लहानग्यांस वाचनाची आवड लागेल!

तुमच्या दिनक्रमात वाचन वेळेस स्थान आहे की नाही? तुमचे उत्तर ‘ हो’ असेल तर उत्तम आणि ‘नाही’ असेल तरी हरकत नाही. कारण, या लेखाच्या अखेरीस तुम्हाला तुमची व घरातील  छोट्यांचीही वाचन वेळ गवसली असेल इतकं नक्की!

घरातील लहान मुलांमध्ये वाचन वेड रुजवण्याचा श्रीगणेशा पालकांपासूनच होत असल्याने, आधी मोठ्यांच्या वाचन वेळेचा शोध घ्यायला हवा. मोबाईल वा सोशल मिडिआमुळे वाचन संस्कृती लोप पावते आहे, हा बोधट झालेला मुद्दा पुन्हा न उगाळता. विविध माध्यमांतून ई-बुकचा आस्वाद घेण्याचा चंग बांधायला हवा. स्क्रिनवर सतत नजर रोखून डोळ्यांना त्रास होत असेल, तर प्रत्यक्ष वाचनाची पारंपारिक पद्धत देखील आहेच आणि साधारण वाचण्याचाच कंटाळा येत असेल तर ऑडीओ बुक्सचाही पर्याय आहेच. त्याची निरनिराळी ऍप्स उपलब्ध आहेत. ज्यावर ऑडीओ बुक्स मोफत ऐकता येतात. इअरफोन्स कानात घातले, की  झालं पुस्तकातला मजकूर ऐकत रहायचं फक्त! आहे की नाही झक्कास? लहानग्यांना वाचनाची गोडी लावण्याविषयी बोलताना पालकांच्या वाचनास प्राधान्य देणं गरजेच ठरतं, कारण बालवय निरिक्षणातून सवयी आत्मसात करतं.

आधी घरातील इतर सदस्यांनी वाचनासाठी वेळ काढायला हवा. लहान मुलं आई, बाबा, आजी, आजोबांना प्रत्यक्ष पुस्तकं वा ई-बुक्स वाचताना किंवा ऑडीओ बुक्स ऐकताना पाहतील तेव्हा घरातील छोटे देखील बारीक सारीक चित्रकथा चाळतील, वाचण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यासाठी मोठ्या अक्षरातील रंगीबेरंगी चित्र असलेली गोष्टीची पुस्तकं, परिकथा, बालमासिकं कॉमिक बुक्स खरेदी करावीत. खेळणी, कपड्यांची खरेदी करताना नियमित एखादं पुस्तक विकत घ्यावं.

या वयात झालेले संस्कार, लागलेल्या सवयी लहान मुलांमध्ये कायमच्या रुजत असल्यानं, अशाच कळत्या नकळत्या वयाच्या सीमेवर एकदा त्यांची पुस्तकांशी तोंडओळख व्हायला हवी. पोटभर जेवणं, मनभर खेळणं आणि अभ्यासापलिकडे छान छान गोष्टी ऐकण्याचा, वाचण्याचा छंद जडला, की बालपण ख-या अर्थी सार्थकी लागेल.

त्यापुढचा वाचन प्रवास, ते स्वत:चा स्वत: करतील. आपण फक्त मार्गदर्शन करत रहावं. काय वाचावं, काय वाचू नये, नवीन लेखक, त्यांची पुस्तक, कुणी काय नवं वाचलंय, यावर गप्पा माराव्यात. अवांतर वाचन करणारे विद्यार्थी शालांत परिक्षांत इतर विद्यार्थ्यांहून उजवे ठरतात. शब्दसंग्रह वाढल्याने त्यांची विचार मांडणी अचूक असते, सविस्तर उत्तरे लिहिणं, निबंध तयार करणं त्यांना सहज जमतं. यासाठी, घरातून वाचनाचं बाळकडू मिळायला हवं. पालकहो! ही जबाबदारी तुमचीच आहे. पटतंय ना? लिहा तुमची मते, प्रतिक्रिया खालील लेखाखालील comment box मध्ये!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares