baby food

तान्ह्याचा सात्विक आहार असा हवा…!

बाळाच्या प्राथमिक वाढीसाठी आईचे दूध अत्यावश्यक आहेच. सुरुवातीच्या सहा महिन्यांत बाळाची वाढ पूर्णत: आईच्या दूधावर होते. मात्र, त्यानंतर बाळाच्या सकस आरोग्यासाठी दूधासोबत इतरही काही पौष्टिक अन्नघटकांचा त्याच्या आहारात समावेश करावा लागतो. ज्यामुळे, हाडांना मजबूती मिळते, स्नायू बळकट होतात, एकूणच बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढण्यास पौष्टिक अन्नघटक सहाय्यक ठरतात.

दूध पावडर मिश्रित, प्रथिने, जीवनसत्त्वांनीयुक्त असे बाळासाठी रेडीमेड आहार बाजारात उपलब्ध आहेत. तरी, ब-याचदा काही मंडळी पारंपारिक घरगुती पदार्थ देणेच पसंत करतात. त्यात मग, खिमट, दलिया, खिचडी किंवा सत्त्वासारख्या पौष्टिक रेसिपीजचा समावेश होतो.

पूर्वी घर न घर अनुभवी माणसांच्या मायेखाली तावून सुलाखून, तंदुरुस्त बनत असल्याने, आजी-आजोबांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु हसत खेळत बाळसं धरत. हल्ली घरोघरी तान्ह्यासाठीच्या पौष्टिक पाककृती सांगणारी वयस्कर मंडळी क्वचितच असतात, त्यात बाळाचे आई वडील दोघंही नोकरी करणारे, मग कमीत कमी वेळात तयार होणारा पदार्थ म्हणून बाळाला रेडीमेड आहार देणे पसंत केले जाते. ही परंपरा रुजण्याआधीच्या पिढ्यानपिढ्या दणकट आणि बळकट झाल्यात ते आई, आजीच्या हातचे नाचणीचे सत्व किंवा गहू डाळींपासून बनलेले दलियासारखे पदार्थ खाऊनच!

भाताचे दलिया-

साहित्य- ३० ग्रॅम भात, १५ ग्रॅम शेंगदाणे, १० ग्रॅम भाजलेले मुगाचे पीठ किंवा तूर डाळ, ३० ग्रॅम साखर किंवा गूळ, ३० ग्रॅम पालक किंवा कुठलीही पालेभाजी.

पाककृती – प्रथम भात शिजवून घ्या. त्यामध्ये शेंगदाण्याचे व डाळीचे पीठ मिसळून घ्या. त्यानंतर, पालक पाण्यात शिजवून, उकळवून तो एका स्वच्छ कपड्यातून गाळून घ्यावा व वरच्या मिश्रणात एकजीव होईल अशा पद्धतीने मिसळावा. वरील तयार मिश्रणात आता साखर किंवा गूळ मिसळून काही मिनिटे सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावे.

नाचणीचे सत्व –

नाचणी ७ ते ८ तास साध्या पाण्यात भिजत ठेवावी. नंतर, त्यातून पाणी विलग करुन नाचणी मऊ कापडात हलकेच बांधून ठेवावी. तिला उबदार जागेत ठेवावे, म्हणजे छान मोड येतील. मोड आलेली नाचणी सावलीत एका कापडावर पसरवून ठेवावी. साधारण ७ ते ८ तासांनी ती वाळेल व पूर्ण कोरडी झाल्यावर जाड तळाच्या भांड्यात मंद आचेवर भाजून घ्यावी. भाजताना सतत ढवळत राहावं, नाहितर नाचणीच्या गुढळ्या होतात. नाचणी छान भाजून घेतल्यावर, व्यवस्थित बारीक होईस्तोवर मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.

अशाप्रकारे तयार केलेले नाचणीचे सत्व दुधासोबत बाळाला देताना पुढील प्रमाण वापरावे.

साहित्य- १ चमचा नाचणीच्या सत्वात, १/२ कप दूध व १ चमचा साखर

पाककृती – भांड्यात दूध घेऊन त्यात सत्व व साखर मिसळावी. मिश्रण मंद आचेवर ढवळत रहावे. ४ ते ५ मिनिटांत नाचणी शिजेल, तसेच दूध आटल्याने मिश्रण जाडसर झालेले असेल. अशाप्रकारे, तयार झालेले नाचणीचे सत्व बाळाच्या आरोग्यासाठी पोषक ठरते.

तृणधान्याचा दलिया –

३० ग्रॅम बाजरीचे भाजलेले पीठ(तूस काढलेले), १५ ग्रॅम भाजलेले मुगाचे पीठ, १० ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्यांची पूड, ३० ग्रॅम पालेभाजी, ३० ग्रॅम गूळ.

पाककृती – इथे बाजरीऐवजी तूस काढलेल्या ज्वारी किंवा नाचणीचे पीठही वापरु शकता. प्रथम पालेभाजी शिजवून ती स्वच्छ पाण्यातून गाळून घ्यावी. पालेभाजीच्या रसात आता बाजरी, डाळ व शेंगदाण्याची पूड मिसळून घ्यावी. त्यानतंर, गूळ मिसळून मिश्रण जाडसर करुन घ्यावे.

तुमच्या घरात किंवा नातेवाईंकामध्ये अजूनही या घरगुती पौष्टिक आहाराची परंपरा जपली जात असेल, तर उत्तमच! मात्र, ज्या घरांतून ती लोप पावत चालली आहे, तिथे पुन्हा ती पोहोचवण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा. अधिकाधिक वाचकांपर्यंत या रेसिपीज पोहोचवायला हव्यात, जेणेकरुन तयार होणा-या पुढील पिढीला ख-या अर्थानं सात्त्विकतेचं बाळकडू मिळले. तुमच्याजवळ अशा पारंपारिक रेसिपीज असतील, तर जरुर शेअर करा खालील कमेन्ट बॉक्समध्ये!

More Articles
Designed and Developed by SocioSquares