Pain (1)

‘त्या’ पहिल्या दिवशी कशी जाऊ ऑफिसला?

“स्त्रीचं दुखणं स्त्रिलाच माहीत बाई…!”, हे पालुपद प्रसिद्ध होण्यामागे जितकी कारणं असतील, त्यापैकी एक म्हणजे पीरेड्सच्या दिवसांत होणा-या प्रचंड वेदना. ज्यावर धड बोलताही येत नाही व त्यापासून दूर पळताही येत नाही. शारीरिक दुखण्यासोबत न दिसणारे मानसिक बदलही त्रास देतात. या पाच दिवसांत बदलणारे वागणे, मूड्स कधी चिडचिड, कधी निराशा तर कधी न उमगणारा हर्ष, होणारा सगळा त्रास निमूटपणे सहन करावा लागतो. शाळा किंवा कॉलेजमध्ये असणा-या मुलींना अचानक सुट्टी घेऊन घरी आराम करण्याची मुभा तरी असते. मात्र, नोकरी करणा-या महिलांना मन नसेल, तरी ऑफीसला जावे लागते. तिथे वेदना सहन करत, कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करायचा.

चीन, जपान, तैवान, साऊथ कोरिया अशा काही निवडक देशांनी या दिवसांत महिलांना भर पगारी रजा जाहीर केली आहे, तर काही कंपन्यांनी त्या पाच दिवसांत महिलांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. भारतातील कल्चर मशीन या कंपनीने गेल्याच महिन्यात अशी भर पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तेथील महिला कर्मचारी वर्ग सुखावलाय. महिलांच्या प्रकृतीचा विचार करुन येत्या काळात कदाचित आणखी काही कंपन्या अशी रजा देणे सुरु करतील. तोपर्यंत, या दिवसांत ऑफिसला जाणे भाग आहेच, याचसाठी दुखणे कमी करण्यास उपयुक्त ठरणारे काही घरगुती उपाय-

१. ग्लासभर दूध प्यावे. कॅल्शियममुळे पोटदुखीवर आराम मिळतो.

२. पोटावर लवेंडर ऑईल लावल्याने स्नायूंवरील ताण कमी होऊन, पोटदुखी कमी होते.

३. अंघोळीसाठी गरम पाणी वापरावे. पाठ, कंबर, पाय गरम पाण्याने शेकल्यास दुखणे कमी होते.

४. कटाक्षाने शरीराची स्वच्छता बाळगा. दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यदायी ठरते. यामुळे, मनावरची मरगळ दूर होऊन, फ्रेश वाटते.

५. मांस, जंग फूड, मैद्याचे पदार्थ, अधिकचे मीठ, चहा-कॉफी, कोल्ड ड्रिंक्स असे पदार्थ या पाच दिवसांत न खाल्ल्याने, त्रास कमी होण्यास मदत होईल.

६. घट्ट किंवा तंग कपडे न घालता, आरामदायी व सुटसुटीत कपडे घालावेत.

७. निदान पहिले दोन दिवस कुठलेही अंग मेहनतीचे काम करणे टाळावे. त्याऐवजी आवडते छंद जोपासा वाचन, संगीत, कलाकुसर स्वत:ला सतत कुठल्यातरी कामात गुंतवून ठेवा, ज्यामुळे शारीरिक दुखण्यावरुन तुमचे लक्ष विचलित होईल.

या दिवसांत शरीराला होणा-या वेदना कमी होण्यासाठी किंवा पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी काही स्त्रिया औषधे घेतात, ज्याचे दुष्परिणाम शरीराला भविष्यात भोगावे लागतात. म्हणूनच, या नैसर्गिक गोष्टीवर कुठलेही बंधन न घालता घरगुती उपाय करुन होणारा त्रास थोडा कमी करावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares