PAINING (2)

‘त्या पाच’ दिवसांतले नकोसे नियम!

नियमित भेटीला येणारे महिन्याचे दुखणे सहनशक्तीची अगदी परीक्षा पाहाते. स्त्री शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असणारी मासिक पाळी जीव अगदी नकोसा करते. कंबर पाठ धरते, पोट-या ठणकतात, पोटात कळ येते, प्रंचड अशक्त वाटते. अशा आंतरिक दुखण्यात भर पडते, या दिवसांत कसे वागावे, कसे वागू नये याबाबत समाजाने घालून दिलेल्या बाह्य नियमांची!

जुन्या नव्या पिढीच्या विचारांत ब-याच विषयांवरुन द्वंद्वयुद्धे घडतात. त्यापैकीच एक असते, कड्याक्याचा वाद घडविणारी मासिक पाळीची नियमावली! बदललेल्या जीवनशैलीमुळे आजच्या तरुणीचे दिवसाचे वेळापत्रक मागच्या पिढीतील स्त्रियांहून बरेच निराळे झालेय. सध्याची ‘ती’ पाळीचे दुखणे सहन करीत घरात बसत नाही, तर इतर दिवसांसारखेच हेही दिवस ठेरलेल्या दिनक्रमाप्रमाणे जगते. घरकाम करते, जेवण बनवते, कामावर जाते, प्रवास करते, धावपळ अन् पळापळ करीत संपूर्ण दिवस घालवते. सॅनिटरी नॅपकीन्सच्या अॅड्समध्ये पाहातोच ना, कशा त्या बिनधास्त इथून तिथून उड्या मारतात, डान्स करतात, कठीण ऑफिस वर्क सहज पूर्ण करतात, अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण हीच तर आहे नवी पिढी! त्यांना कसं पटेल सारं? पिरेड्सच्या दिवसांत किचनमध्ये यायचं नाही, देवपूजा करायची नाही, सणसुदीला बाजूला बसायंच, सोहळ्यांत पुढेपुढे करायचं नाही, कुणाला शिवायचं नाही, पळायचं नाही, खेळायचं नाही, पहिल्या-तिस-या-पाचव्या दिवशी डोक्यावरुन अंघोळ; डोक्यावरुन पाणीच इतक्या नियमांची सरबत्ती म्हणजे! बरं, यामागची शास्त्रीय कारणं विचारली, तर तीही थोरामोठ्यांना नीटशी सांगता येत नाहीत.

अशा हिडीस फिडीस वागवण्याने एखादा पाच दिवसीय रोग जडल्यासारखेच वाटते. म्हणे या दिवसांत स्त्री अपवित्र असते, पण उलट खराब रक्त शरीराबाहेर पडल्याने आरोग्याची पवित्रता वाढतच असेल. तसेच, किचन किंवा मंदिरात प्रवेश वर्ज्य असण्यामागेही काही चांगल्या सवयी दडलेल्या असाव्यात. जसे, फार पूर्वी अंघोळी नदीवर होत असत आणि पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी नदीचेच पाणी वापरले जाई. अशा पाण्याची स्वच्छता टिकून राहावी यासाठी या पाच दिवसांत नदीवर अंघोळ करणे किंवा कपडे धुणे त्या टाळत असाव्यात आणि अंघोळ नाही, म्हणून स्वयंपाक घरात प्रवेश नाही, देवळातही प्रवेश नाही. ह्या चांगल्या सवयींची परंपरा बनली व रुढ अर्थाने त्याचे नियमात रुपांतर झाले. मात्र, आता काळ बदललाय, हल्ली मुली मुळात आरोग्याकडे फार लक्ष देतात. जाणीवपूर्वक स्वच्छतेबाबत काटेकोर असतात. त्यामुळे, शिक्षण, घरकाम, नोकरी, मुलंबाळं, स्वत:ची आवड, छंद जोपासण्यात दंग असणा-या तिला चार दिवस एका जागी शांत बसणं कसं शक्य होईल? साडीला पदर घोचावाच लागतो,  किचनमधली कामे आटपावी लागतात, कामावर जावेच लागते, थेट देवळात गेलो नाही तरी घर लहान असल्यावर देवघरापाशी घुटमळणे होतेच, रोजच्या गर्दीत आपसूक होणारी शिवाशिवी टाळता येत नाही.

अशाप्रकारे, आजच्या तरुणी जुनाट नियमावलीला छेद देऊन, शास्त्रोक्त पडताळणीत पास होतील तितकेच नियम आपलेसे करतात. बुरसटल्या विचारांकडे कानाडोळा करतं, त्यापैकी नेमकं तितकच घेण्याची कला मस्त अवगत केलीय त्यांनी! आता, थोडं पिकल्या केसांनीही या पाच दिवसांत पाळायचे  नियम थोडे शिथील करायला हवेत ना…?

More Articles
Designed and Developed by SocioSquares