contorl (1)

त्रासदायक जीवांना घराबाहेर काढणारे घरगुती उपाय!

घरात साफसफाई केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पुन्हा भिंतीवर कोळाष्टकं, मुंग्यांच्या रांगा, फटीतून डोकावणारी झुरळं दिसली किंवा उंदरांची खुडबुड ऐकू येऊ लागली, की जीव अगदी हैराण होतो. मोठ्या मेहनतीने घराची स्वच्छता केल्यानंतर, हे असे पुन्हा पाढे पच्चावन्न! यावर उपाय म्हणून, बाजारात किड्यामुंग्यांना पळवून लावणारी विविध रासायनिक औषधं मिळतात किंवा घरात पेस्ट कंट्रोल करुन घेण्याचाही पर्याय असतो. मात्र, यापेक्षा कुठल्याही साईड इफेक्ट्सची चिंता नसणा-या घरगुती उपायांचा वापर करुन पाहा.

उंदीर

घरात उंदरांचा वावर असेल, अशा ठिकाणी पेपरमिंट ऑईलचे काही थेंब टाकून ठेवावेत. आठवडाभर नियमित हा उपाय केल्याने नक्कीच उंदीर पळून जातील. आणखी एक उपाय म्हणजे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये कोको पावडर मिसळून उंदरांचा वावर असणा-या ठिकाणी ठेवावी. ही पावडर खाल्ल्याने उंदीर काही मिनिटांत मरण पावतात.

झुरळ

झुरळे ज्या ज्या ठिकाणी दिसतात, तिथे तिथे लवंग ठेवावी. लवंगाचा उग्र दर्प झुरळांना पळवून लावतो. तमालपत्राचाही वापर करता येईल. तमालपत्रे बारिक चिरुन खोलीच्या कोप-यात ठेवावीत. काही दिवसांच्या अंतरानी ही पाने बदलत रहावीत. तमालपत्राचा उग्र वासही समान कार्य करतो.

पाल

भिंतीवर चिकटून राहणारा एक किळसवाणा प्राणी म्हणजे पाल. तिचे किचनमध्ये वावरणे, तर धोक्याचेच. कारण, ती जिथे जाईल तिथे अस्वच्छता निर्माण करते. हिला प्रथम घरातून हुसकावून लावायला हवे. त्यासाठी, कांदाच्या चकत्या कापून त्या खोलीतील लाईटजवळ बांधून ठेवाव्यात. कांद्याच्या उग्रवासामुळे पाली पळून जातात. तसेच, कांद्याचा व लसणाचा रस पाण्यात मिसळून हे मिश्रण पाली येतात त्या ठिकाणी शिंपडावे. या मिश्रणाच्या उग्र वासानेही पाली पळून जातील.

मुंग्या

फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ मिसळल्यास, फरशीवर येँणा-या मुंग्याची संख्या कमी होईल किंवा हळद व फटकीची पावडर एकत्र करुन घराच्या कोप-यांत पसरवल्यास घरात येणा-या मुंग्यांचे प्रमाण घटेल.

ढेकूण

रोजच्या वापरातून लाकडाच्या वस्तू थोड्या कमी झाल्यात, तसेच गाद्यांमध्ये कापसाच्या जागी स्पंज आलाय, म्हणून असेल कदाचित; पण पूर्वीइतके आता, “ढेकूण त्रास देतात” अशा तक्रारी फारशा ऐकू येत नाहीत. तरीही आपला पूर्वाभ्यास असलेला बरा म्हणून हे पुढील उपाय, कापडावर थोडे रॉकेल घेऊन त्याने गादी स्वच्छ करावी किंवा लिंबाची पाने गाद्यांवर पसरवावीत.

डास

काही ठिकाणी वर्षभर डास सतावतात. त्यावर उपाय म्हणून, लसूण पाण्यात उकळवून, त्या पाण्यासहितच रुममध्ये ठेवावा. लसणाचा उग्र वास डासांना पळवून लावेल. तसेच, त्वचेवर कुठलेही क्रिम लावण्यापेक्षा खोबरेल तेल व कडुलिंबाचे तेल समप्रमाणात एकत्र करुन त्वचेला लावल्याल डास चावत नाहीत.

माशा

कुंभारमाशी किंवा मुख्यत्वे पावसाळ्यात येणा-या काळ्या माशांना पळवून लावण्यासाठी कापूर उत्तम ठरतो. खोलीच्या कोप-यात कापराच्या वड्या ठेवाव्यात आणि भरपूर माशा असल्यास कापूर जाळवा.

वाळवी

वाळवी फर्निचर खराब करते, तर भिंतीतील वाळवी शॉर्टसर्किटला कारणीभूत ठरु शकते. कडुलिंबाचे तेल किंवा व्हाईट व्हिनेगर वाळवीवर फवारल्यास वाळवी नष्ट होते. मात्र, हा उपाय काही आठवडे नियमित करणे आवश्यक आहे.

कोळी

कोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी लिंबू, संत्र, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या साली घरात कोळाष्टके होतायत अशा ठिकाणी चोळावीत. दारं, खिडक्या, फर्निचरच्या कोप-यांसाठी हा उपाय वापरता येईल.

वस्तूंची नासाडी करणा-या, आरोग्यासाठी घातक असणा-या त्रासदायक जीवांचा योग्य बंदोबस्त करणारे वरील साधे सोप्पे उपाय नक्की करुन पाहा. वरील उपायांपलिकडे तुम्हाला काही उपाय ठाऊक असतील, तर ते झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी कमेन्टबॉक्समध्ये शेअर करा व कसा वाटला आजचा ब्लॉग ते देखील कळवा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares