No holiday (2)

दिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा!

सर्व सणांचा राजा असणा-या दिवाळीनिमित्त बॉस सुट्टी देत नसेल, तर मनाविरुद्ध ऑफीसला जाणं आलंच. घरोघरी सणाची धम्माल सुरु असताना आपल्याला ऑफीसला जाव लागतयं, याचा वैताग येणं साहाजिक आहे. धनोत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज असे महत्तम दिवस आठवडाभर सुरु असतात. प्रत्येक दिवशी सुट्टी मिळत नाही, मग काय फराळाचं ताट झपझप संपवून निघावं लागतं कामासाठी, अशावेळी रडत खडत आणि कंटाळत कामावर जाण्यापेक्षा या परिस्थितीकडे जरा हटक्या नजरेने पाहूयात! बघा वाचून पटतयं का?

प्रवासातील गर्दी –

ट्रेनमध्ये सीट मिळविण्याची धडपड, तर जीव नकोसा करणारी ट्रॅफिकची कासवगती. प्रवास जिथे गर्दी तिथे! हा प्रवासाचा सावळा गोंधळ सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीला कमी असतो. जरा सुखासुखी प्रवास होतो. दिवाळीच्या दिवसांतही ऑफीसला जाताना हा अनुभव येतील. घाई गडबडीला तोंड न देता ऑफीसला पोहोचणे नक्कीच सुखावह आहे ना!

ऑफीसमधील मित्र – पार्टी-

सुट्टी न मिळालेले समदु:खी ‘दिवाळी लंच’ किंवा फराळाचा एकत्र आस्वाद अशी ‘फराळी पार्टी’ प्लॅन करु शकतील. खाऊ व गप्पांमध्ये कामाचा भारही हलका झाल्यासारखे वाटेल.

हसरे चेहरे –

सुट्टी मिळालेल्या सुदैवी व्यक्तींमुळे ऑफीसमधील लोकसंख्याही कमी असते. वातावरणातील प्रसन्नता ऑफीसमधील वातावरण खेळीमेळीचं करते. काम सुरु असतं, पण आंबट तोंड आणि गंभीर चेहरे न करता! यामुळे, सुट्टी न मिळण्याचं दु:ख असलं, तरी कामाचा ताण जाणवणार नाही.

आनंदाचा बोनस –

दिवाळी बोनस किंवा गिफ्ट मिळाले, की आपण लहान मुलांसारखे खूष होतो यात शंका नाही. त्यामुळे, काम करण्यात नवा हुरुप येतो. तेव्हा, या सकारात्मकतेचा अचूक वापर करुन कामे उरकून घ्यायला हवीत. यामुळे, ऑफीसच्या कामानंतर घरातील दिवाळी सेलिब्रेशनमध्येही याच उत्साहाने सहभागी होता येईल.

दिवाळीनंतरचे प्लॅन्स –

दिवाळी महत्त्वाची असली, तरी आपले सणसोहळे वर्षभर सुरु असतातच. दिवाळीला मानमोडून काम केलेत त्याबद्दल विश्रांती हवी ना! त्यामुळे, पुढील दिवसांत कधी सुट्टी घेता येईल यावर नक्की विचार करा.

वरील पर्याय, रजा न मिळण्याच्या दु:खावर मलम लावण्यासारखे वाटतील कदाचित, पण येत्या दिवाळीचे हसतमुख स्वागत करायचे, तर मन उत्साही हवे. कारण, सण आले की आपसूकच वातावरणात एक उर्जा संचारते. रुसवे फुगवे अन् कामाचा तणाव हलकेच दूर होऊन, मन परिसरातील जल्लोषात सामील होते. रोजच्या वेळापत्रकाचा कंटाळा येतो, पण सणवार तेच वेळापत्रक हसत खेळत पार करण्याची ताकद देतात हे खरे!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares