Navrangi Navratr (1)

नवरात्रीच्या नऊ रंगांमागील रहस्य!

घरोघरी घट बसलेत, सार्वजनिक ठिकाणी देवीची विविध रुपे विराजलीत. सर्वत्र पुन्हा एकदा मंगलीमयी वातावरणची पेरण झालेली असताना आणखी एक गंमतीशीर बाब या नवरात्रौत्सवाचे आकर्षण ठरते. ते म्हणजे नऊ दिवसाचे नऊ रंग. तुम्हालाही यंदाच्या नवरंगांचा तक्ता तोंडपाठ असेल ना? या दिवसांत घराबाहेर पडलं की बरेचजण ठरलेले रंग परिधान करताना दिसतात. किती मस्त वाटतं ना?  नकळत रुढ झालेल्या रंगांच्या परंपरेचे सारे किती कौतुकानं स्वागत करतात. हे पाहून एका विषयावर तरी इतक्या सा-यांचे एकमत झाल्याचे आश्चर्य आणि समाधान वाटतं.

म्हणे, ग्रहांवरुन वारांना दिलेली नावं आणि वारानुसार ठरलेल्या रंगांमागे काही धार्मिक कारणं आहेत. तर, काहींच्या मते देवीच्या रुपांवरुन हे रंग ठरवलेत. आता, यातील सत्यता पडताळून पाहाण्याचा खटाटोप करण्यापेक्षा रंगांमागे दडलेल्या व रंगांमुळे घडलेल्या काही छान छान गंमतीजंमती जास्त  महत्त्वाच्या वाटतात.

शाळेत गणवेश असायचा, ज्यामुळे आपसूकच मनात एक समानता रुजली जायची. आर्थिक स्तराचा बाऊ न होता. त्या अजाणत्या वयात गरीबी, श्रीमंती मैत्रीच्या आड येत नसे. कदाचित येन केन प्रकारेण नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा याची आठवण होते. जमेल तसा ठरलेल्या रंगाचा त्या त्या दिवशी पेहराव करण्याचा प्रत्येकीचा प्रयत्न असतो. स्वभावाला औषध नसल्याने काहीजणी त्यातही कुणाच्या साडीची किंमत किती असेल?, माझ्यापेक्षा तिची साडी किंवा कुर्ती भारी असेल का? याचा अंदाज लावण्यात नऊ दिवस दवडतात. पण, अशांना वगळून बाकीच्यांचा विचार केला तर कित्येकजण एकत्र येऊन नवरात्रौत्सवाचा आनंदे घेतात. तितकचं वाद तंटे मिटवण्याचं निमित्त मिळतं. कॉलनी किंवा ऑफिसमधील मित्रमंडळींमध्ये गप्पा, गोष्टी होतात. भरपूर फोटोज काढतात, मिळून मिसळून राहतात, सणाचा उत्साह कामाचा ताण जाणवू देत नाही. कळत नकळत अशा छान आठवणी जमा होतात.

महिलांप्रमाणे पुरुषदेखील हल्ली नवरात्रीच्या रंगांप्रमाणे पेहराव करु लागलीत. कदाचित दशकभरापुर्वी सुरु झालेल्या या ट्रेंडला त्यांनीही आता आपलंस केलयं. धार्मिक परंपरेच्या पार्श्वभूमीचा विचार न करता विविध इतर धर्मातील मंडळीही हे नऊ दिवस ठरलेल्या रंगांनुसार कपडे परिधान करु लागलीत. मित्र मंडळींच्या आग्रहाखातर का होईना पण, धर्मापलिकडे पाहाण्यासाठी हे नवरंग निमित्त ठरत आहेत. निदान या रंगाच्या माध्यमातून दिसणारा एकोपा काही प्रमाणात मनात झिरपून वातावरण आनंदी होणार असेल तर काय हरकत आहे ठरलेल्या रंगांनुसार पेहराव करायला?

PC: https://goo.gl/xzgZe3

More Articles
Designed and Developed by SocioSquares