navaratri banner

नवरात्रीत या ५ ठिकाणांना भेट द्यावीच!

प्रत्येक सण दणक्यात साज-या होणा-या मुंबईत नवरात्र उत्सवही पहाण्यासारखा असतो. सलग नऊ दिवस देवीची मनोभावे केली जाणारी पूजा व रंगणा-या गरबा नाईट्स!! लहान थोर सा-यांनाच फेर धरायला लावणारा लाईव्ह गरबा अनुभवायलाच हवा व  यासाठी, मुंबईतील पुढील पाच ठिकाणे सुचवत आहोत…

कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम –

नायडू क्लब तर्फे आयोजित केला जाणारा कोरा केंद्र येथील नवरात्री उत्सव १३ वर्ष जुना आहे. प्रत्येक वर्षी साधारण २ लाख भाविक या नवरात्री उत्सवात सामील होतात. तर नवरात्रीच्या दर दिवशी सुमारे ३० हजार भाविक येथे भेट देतात. तसेच, सिनेतारकाही  हजेरी लावतात. बोरीवली सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने  सोयिस्कर पडते. येथे खाजगी वाहनाने जाताना, ए.स.व्ही रोड किंवा लिंक रोडने जाता येईल.

रासलीला नवरात्री, बोरीवली पश्चिम –

बोरीवली पश्चिम येथे रंगणारा आणखी एक मोठा गरबा उत्सव ‘रासलीला’ या नावाने ओळखला जातो. आनंदीबाई कॉलेजजवळ, साईबाबा नगर येथे हा गरबा आयोजित केला जातो. गरबाप्रेमींचे हे एक आवडते ठिकाण आहे.

रंगीलोरे, गोरेगाव पूर्व –

प्रसिद्ध गायकांचा आवाज ही या गरब्याची खासियत असून, मित्र मंडळींसोबत नवरात्री उत्सवाचा आनंद घ्यायचा, तर येथील गरब्यात सामील व्हायलाच हवे. बॉम्बे कनव्हेन्शन अॅण्ड एक्झीबीशन सेंटर गोरेगाव येथे ‘रंगीलोरे’ या नावाने हा नवरात्री उत्सव साजरा होत असून, गरब्याची वेळ सायं. ६ वा.पासून रात्री ९.वा.पर्यंत असते.

पवई बेंगॉली वेलफेअर असोसिएशन –

येथील नवरात्री पूजेचे भव्य देखावे मुख्यत्वे प्रसिद्ध आहेत. दुर्गादेवीच्या भोवतालची सजावट नेहमीच निराळी व अधिक शोभिवंत असते. तसेच, देवीची देखणी मूर्ती तिथे जाऊनच पहायला हवी, सोबत सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील लाईव्ह गरब्याचा आनंद घेण्यासाठी तर नक्की जावे.

वाशी सेक्टर १५ –

या ठिकाणाला भेट द्यायची, तर प्रथम तुम्ही खवय्ये असायला हवे. मुघलाई पराठा, कोलकात्याची प्रसिद्ध बिर्याणी, चिकन रोल्स, रसगुल्ला असे चविष्ट पदार्थ येथील खासियत आहे. आता, तिथे “देवीच्या दर्शनाला जायचं, की पोटोबा करायला..?” असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण दुर्गादेवीचे दर्शन महत्त्वाचे आहेच, गरबाही खेळा, मात्र तेथील प्रसिद्ध चवींचा आस्वादही घ्या. नवी मुंबई, वाशी येथे आय.सी.एल. स्कूल ग्राउंडवर रंगणा-या या नवरात्री उत्सवाला भेट द्यावीच.

हल्ली सार्वजनिक गणेशोत्सवासारखा नवरात्री उत्सवही बिल्डींग्समध्ये साजरा केला जातो. या गरब्यात सामील होणे वेळखाऊ व खर्चिकही नसते. मात्र, तरीही मुंबईतील वर्षानुवर्षे सुरु असणा-या नवरात्री उत्सवांची धम्माल काही निराळीच आहे. झकपक घारगा, कानात पारंपारिक झुमके व हातात दांडीया घेऊन सांग्रसंगीत गरबा खेळायचा असेल, तर मुंबईतील गरबा नाईट्समध्ये एकदातरी सामील व्हायला हवे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares