pre bride banner

नववधूसाठी महत्त्वाच्या ब्युटी टिप्स!

लग्न जसजसं जवळ येऊ लागतं, मनातील हूरहूर, डोक्यातील विचार, सोहळ्याचं दडपण वाढू लागतं. कामांची इतकी मोठी यादी असते, की नेमकं स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. मग, ऐनवेळी मेकअपच्या थराखाली आपली मूळची सुंदरता मात्र लपून जाते. असे होऊ नये म्हणून, नव-या मुलीने काही महिने आधीच पुढील त-हेने तयारीला सुरुवात करावी.

  1. त्वचा जास्त तेलकट राहिल्यास पिंपल्सची समस्या सतावते व अधिक कोरडी झाल्याने ती तजेलदार दिसत नाही. यासाठी, त्वचेचा पोत जाणून तिला दररोज पुरेसे मॉच्छराईझ करणे गरजेचे आहे. तसेच, आठवड्यातून किमान एकदा वाफ घेऊन चेह-वरील ब्लॅकहेड्स काढून टाकावेत, चेहरा स्वच्छ करावा.
  1. तुमच्या त्वचेस सूट होणारे फेशिअल महिन्यातून एकदा, असे सलग सहा महिने करुन घ्या. गोल्ड फेशिअलचा पर्याय आजमावून पाहता येईल. असे केल्याने, त्वचा टवटवीत होण्यास मदत होईल. वेळ कमी असल्यास दर आठवड्याला एकदा फेशिअल केले तरी चालेल.
  1. चेह-याचे सौंदर्य अधिक खुलेल, जेव्हा केसही तितकेच निरोगी असतील. यासाठी दोन महिन्यातून एकदा हेअर स्पा करुन घ्यावे. केसांचं तुटणं, त्यांचा राठपणा, कोंड्याची समस्या यामुळे दूर होऊन केस छान सिल्की होतील.
  1. रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताला ऑलिव्ह ऑईलने मसाज करण्यास विसरु नये. यामुळे, त्वचेवरील काळवंडलेपणा कमी होऊन ती उजळण्यास मदत होते. पायाच्या त्वचेसाठीही ऑलिव्ह ऑईल वापरता येईल. लग्नापूर्वी एखाद दोन वेळा मेनिक्युअर, पेडीक्युअर करुन घेणे फायदेशीर ठरेल.
  1. वरील चार नियम तुमच्या देखणेपणाची जबाबदारी घेतील, पण फिगरचे काय? लग्न जवळ येताच ब-याच मुली एकदम काटेकोर डाएट करु लागतात, त्याला जोरकस व्यायापाची जोड देतात. ज्याचा परिणाम शरीर थकल्याने ऐन सोहळ्यात चेहरा रोडावल्यासारखा दिसतो. तुम्ही अशी चूक बिलकूल करु नका. लग्नाच्या दोन महिने आधी हलक्या व्यायामासोबत, दररोज किमान दहा मिनिटे मेडीटेशन आवर्जून करा. कारण, आंतरिक शांतताच सौंदर्यात अधिक भर घालते.
  1. आणखी एक महत्त्वाची बाब, आईच्या घरी आहात तेव्हा भरपूर झोपून घ्या. सासरी गेल्यावर वेळापत्रकात थोडाफार फरक पडणार आहे, म्हणून सध्या किमान आठ तासाची झोप घ्याच. ज्यामुळे, डोळ्याभोवती काळी वर्तुळं येणार नाहीत व कायम ताजेतवाने दिसाल.

लग्नासारख्या महत्तम सोहळ्यात ‘सुंदर’ दिसायचे, तर इतकी काळजी प्रत्येकीनं घ्यायलाच हवी. बाकी मेकअप, कपडे, दागदागिने, सॅण्डल्स हे तुम्हाला छान रुपडे देण्यासाठी सज्ज आहेतच, पण मुळातील देखणेपण खुलविण्यासाठी वरील टिप्स आवश्यक आहेत. पटतंय ना? तुम्हाला आजचा ब्युटी स्पेशल लेख कसा वाटला? आम्हाला कळवा, लिहा तुमच्या प्रतिक्रिया खालील comment box मध्ये!

More Articles
Designed and Developed by SocioSquares