Nightout Banner

नाईटआऊट संस्कृती नव्याने रुजू पाहतेय…

नाईटआऊट म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा आपल्या मित्राच्या घरी वास्तव्यास जाणे. मुळात नाईटआऊटची संकल्पना ही पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडे आली असली तरी पूर्वीपासून हे चालतच आलंय. आता त्याचं फक्त नाव तेवढं बदललं आहे. कोजागिरी पौर्णिमा तसेच एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण आपले स्नेही किंवा नातेवाईक यांच्या घरी एकत्र जमून जे जागरण करतो त्याला सुद्धा नाईटआऊटच म्हणतात. पण बदलत्या युगानुसार या संकल्पनेच्या व्याख्या बदलत गेल्या आणि त्याचा कल पाश्चिमात्य पद्धतींकड़े झुकू लागला.

आजच्या धावपळीच्या जीवनात व्यस्त असणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या मित्रमंडळींना एकत्र भेटायला वेळ असतो कुठे! प्रत्येक जण आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात व्यग्र असतो. त्यामुळे महिन्या दोन महिन्यातून एकदा, एखाद्या वीकेंडला, कोणाचा वाढदिवस असेल किंवा मग जोडून सुट्टी आली तर मित्रमंडळींचा नाईटआऊटचा बेत ठरतो. प्रत्येक जण आपल्या दिवसभराच्या कामातून फ्री झाला की ठरलेल्या ठिकाणी येतो. हॉटेलमध्ये किंवा घरच्या घरी सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन काहीतरी शिजवतात. अशा पद्धतीने एकत्र आल्यामुळे रोजच्या जीवनात आपल्याला येणारा ताण, थकवा यातून थोड़ी मोकळीक मिळते. मित्रांशी आपली सुखदु:ख व्यक्त केल्यावर आपण पुन्हा ताजेतवाने होतो. जेवणाचा फक्कड़ बेत झाला की मग गाण्याच्या भेंड़या, स्पीकर लावून नाचणे, पत्ते, कॅरम खेळणे, संगीत मेहफिल असे उपक्रम करून जास्तीत जास्त पहाटेपर्यंत किंवा संपूर्ण रात्र जागरण करणे हा यामागचा उद्देश असतो. अगदीच कंटाळा आला तर सर्वांनी एकत्र बाहेर चक्कर मारून पाय मोकळे करणे. एकदा सकाळ झाली की आवरून आपापल्या घरी परतणे असे या नाईटआऊटचे एकंदरीत स्वरूप असते.

नाईटआऊट करण्यामागचा उद्देश इतकाच की बरेच दिवस न भेटलेले मित्र एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात. त्यामुळे पुन्हा जोमाने काम करायला नवीन हुरूप येतो. फक्त एक खबरदारी घेणं गरजेचं आहे. ज्यांच्याकड़े आपण नाईटआऊटसाठी चाललो आहोत ते मित्र पूर्ण विश्वासार्ह असणं गरजेचं आहे. कारण आजकाल नाईटआऊटला मुले व मुली एकत्र जमतात. त्यामुळे कुठलाही फालतू किंवा ग़ैरप्रकार घड़णार नाहीत हे बघणं महत्वाचं ठरतं. अधूनमधून नाईटआऊटचा बेत करायला मुळीच हरकत नाही पण जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला करत असाल तर त्याचा उलट परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊन तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता असते.

आजकाल पालक फक्त नाईटआऊट हा शब्द ऐकल्यावर दचकतात आणि या गोष्टी त्यांना पटत नाहीत. म्हणून खासकरून मुलींच्या बाबतीत अशा गोष्टींना घरुन अजिबात परवानगी मिळत नाही. अशा वेळेस नाईटआऊटला कशासाठी जात आहोत आणि आपण तिकडे जाऊन नक्की काय करणार आहोत हे सांगून आपल्या पालकांना विश्वासात घेणं आणि त्याचप्रमाणे वागणं हे महत्वाचं आहे. आपल्या जीवनशैलीत कुठलाही नवीन बदल हा चटकन स्वीकारला जात नाही. तसेच तो चुकीचा  किंवा अयोग्यही नसतो. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकतो. तो करत असताना त्या प्रकाराला कुठेही चुकीचं वळण लागणार नाही आणि आपल्या गैरप्रकारामुळे तो बदल बदनाम होणार नाही याची जबाबदारी आपल्या हातात आहे. असंच काहीसं नाईटआऊट या आपल्या संस्कृतीमध्ये रुजू होऊ पाहणा-या नवीन प्रकाराच आहे. कारण रात्र ही जरी वै-याची असली तरी ती सत्सदविवेकबुद्धीने जगणं केवळ आपल्या हातात आहे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares