tumcha natal banner

‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट!

ख्रिसमस म्हटलं की, खाऊची दुकाने केकच्या वेगवेगळ्या प्रकारांनी सजलेली दिसतात. वर्षभरात अनेक सण सोहळे येतात, पण ‘नाताळ’ म्हणजे ‘केक स्पेशल सण’ असं म्हणायला हरकत नाही. रेडीमेड केक्स तर सर्वत्र वर्षभर उपलब्ध असतात, पण घरगुती केकची सर मात्र त्यांना येणार नाही! म्हणूनच, घेऊन आलोय खवय्यांसाठी ख्रिसमस स्पेशल केक रेसिपीज्!!

रवा केक
साहित्य – १ वाटी रवा, ३/४ वाटी दूध, ३/४ वाटी ताक(आंबट नको), ३/४ वाटी साखर, १/२ वाटी तूप, १ टे.स्पून बेसन, १/४ टिस्पून बेकिंग सोडा. २ थेंब व्हॅनीला इसेन्स.
पाककृती – प्रथम एका भांड्यात तूप घेऊन त्यात रवा व बेसन घालावे. यामध्ये साखर, दूध, आणि ताक घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत. हे मिश्रण कमीतकमी चार तास झाकून ठेवावे. केकच्या मिश्रणात सोडा आणि व्हॅनीला इसेन्स घालून ते नीट फेटून घ्यावे, नंतर हे मिश्रण तूप लावलेल्या पॅनमध्ये ओतून कमी आचेवर शिजण्यास ठेवावे. त्यावर झाकण म्हणून तापलेला तवा उलटा ठेवल्यास केकला वरुन देखील आच मिळेल. साधारण १० ते १५ मिनिटांनी तवा काढून केक शिजला आहे की नाही पाहावे. केक वरुन शिजला असल्यास आच बंद करावी व गार झाल्यावर त्याचे सुरीने तुकडे करावेत.
टिप- आच कमी ठेवावी, तसेच भांड्याचा तळ जाड असावा.
हवे असल्यास मिश्रणात काजू बदाम घालू शकता.

लेमन पुडींग
साहित्य – २ मोठे चमचे पांढरे लोणी, पाऊण वाटी साखऱ, १ लिंबू, १ कप दूध, २ अंडी, २ मोठे चमचे मैदा, एक चिमटी मीठ.
पाककृती – अंड्यातील पिवळा व पांढरा भाग वेगवेगळे फेटून घ्यावेत. त्यामध्ये लोणी व साखर मिसळून पुन्हा नीट फेटून घ्यावे. लिंबाची साल किसून घ्यावी तसेच, लिंबाचा रस वेगळा काढून ठेवावा. मैदा मीठ घालून चाळून घ्यावा, नंतर चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस व लिंबाचा रस, अंड्यातील फेटलेला पिवळा भाग, दूध हे सर्व जिन्नस लोणी व साखरेमध्ये मिसळून मिश्रण एकजीव करुन घ्यावे. आता, अंड्याचा फेटलेला पांढरा भाग हळूहळू मिश्रणात घालून ते पुन्हा नीट घोटून घ्यावे. ओव्हनमधील भांडे आतून ओले करुन त्यात हे तयार मिश्रण ओतावे. दुस-या एका उथळ भांड्यात पाणी घालून त्यामध्ये मिश्रणाचे भांडे ठेवावे व मध्यम ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटे बेक करुन घ्यावे.
टिप – हे पुडींग शांतपणे व काळजीपूर्वक करावे.

भोपळ्याचा केक
साहित्य – भोपळा, गूळ, कणीक, खाण्याचा सोडा आणि तेल.
पाककृती – २५० ग्रॅम तांबडा भोपळा किसून घ्यावा. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ, वाटीभर कणीक घालून मळून घ्यावे. नंतर, त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा व दोन चमचे तेल घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे. केकच्या भांड्याला आतून थोडे तेल लावून घ्यावे व मिश्रण त्या भांड्यात पसरवून ओव्हनमध्ये ४० मिनटे भाजून घ्यावे.

बिन अंड्याचा रवा केक
साहित्य – दिड वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी दही, १ वाटी साखर, ४ वेलदोडे (पूड), ४ काजू(पातळ काप), १० बेदाणे, चारोळ्या, अर्धा चमचा बेकींग सोडा, १ वाटी लोणी किंवा तूप, २-३ थेंब केशर इसेन्स, पाव चमचा मीठ
पाककृती-
दही व साखर मिसळून घ्यावे, साखर विरघळ्यावर त्यामध्ये दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून मिश्रण एकजीव करावे व तासभर झाकून ठेवावे. नंतर, केकच्या भांड्याला आतून तूप लावून घ्यावे व मिश्रण त्यामध्ये ओतावे. मध्यम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक बेक करुन घ्यावा.

लहान थोर सर्वांच्याच पसंतीचा हा ‘केक’ आता बनवा घरच्याघरी अगदी सोप्प्या पद्धतीने, चला तर मग, तयार आहात ना कुटुंबाला स्वादिष्ट केकचं सरप्राईज देण्यासाठी..!.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares