Gossips banner

ऑफिसमध्ये वागाव असं, नाहीतर होतं हसं!

नोकरी विश्व जवळून अनुभवण्याची संधी देणारी इंटर्नशीप हल्ली फारच महत्त्वाची झाली आहे. शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याचा पायंडा पडलेला दिसतो. कॉलेजच्या मनमौजी विश्वातून अचानक ऑफीसच्या वातावरणात प्रवेश करताच वागणुकीतून नकळत घडणा-या या चुका टाळायला हव्यात.

ड्रेसिंगबाबत हलगर्जीपणा –

जीन्स–टॉप सारख्या सवयीच्या ड्रेंसिंगमधून बाहेर पडून ऑफीसला साजेसे कपडे घालणं आवश्यक आहे. यासाठी फॉर्मल कपड्यांचीच निवड करावी. भडक रंगापेक्षा फिकट रंगांना प्राधान्य द्यावे.

नियमावली माहित नसणे –

ऑफीसनुसार कामाची पद्धतही बदलते. सावधरित्या सर्व बाबी समजून घ्याव्यात व ऑफीस वेळ, जेवणाची वेळ, सुट्टीचे दिवस तसेच ऑफीसमधील संपूर्ण नियमावली माहित हवी.

कॉलेजमधील वागणूक येथेही –

ऑफीसमधील वातावरण कॉलेजच्यामानाने शांत असते. मित्रमंडळ दोन्ही ठिकाणी असले, तरी मज्जा मस्ती करण्याची ठराविक वेळ असते. लंच किंवा ऍक्टिव्हिटी टाईम, यासाठी राखीव असतो म्हटले तरी चालेल.

कामातील उत्साह निवळणे –

इंटर्नशीप सुरु झाल्यावर नवे काम, नवी माणसं या वातावरणात सुरुवातीचे दिवस खूप उत्साह जातात व हळुहळू ऑफीस कंटाळवाणे वाटू लागते. नोकरीची सवय नसल्यामुळे असे होणे साहाजिक आहे, मात्र तेथील सहका-यांना हे दाखवू न देता, जबाबदारी पार पाडून इंटर्नशीप पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया घेण्यास टाळाटाळ –

तुम्ही केलेले काम कसे झाले याविषयीच्या प्रतिक्रिया वरिष्ठांना विचारायला हव्यात. कामामध्ये आणखी सुधारणा व्हावी यासाठी मार्गदर्शनही घ्यावे. तुमच्यामध्ये नवे शिकण्याची उत्सुकता असेल, तर नक्कीच साधी वाटणारी इंटर्नशीप तुमच्या क्षेत्रातील प्रगतीचा छानसा अनुभव देईल.

वरील चुका होणार नाहीत, याची काळजी घेताना मुलांनी किंवा मुलींनी एक महत्त्वाची सतर्कता बाळगणेही आवश्यक आहे. ऑफीसमध्ये छान इमेज तयार व्हावी, म्हणून प्रत्येक कामाला हो म्हणण्याची सवय लावून न घेता. योग्य अयोग्य ओळखून, गोष्टी पडताळूनही पहाव्यात. ऑफीसमधील व्यक्तीने केलेले चुकीचे मार्गदर्शन, हक्कांचा गैरवापर करुन कनिष्ठ कामांची केलेली सक्ती, सततचे जास्तीचे काम किवां लैंगिक छळासारख्या समस्यांवर चतुराईने मात देण्यासाठी ऑफीसमधील अनोळखी वातावरणाला घाबरुन न जाता, त्यास आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares