pANATI (1)

निसर्गप्रेमींची अनोखी दिवाळी!

दिवाळीचा सण म्हणजे हिंदू धर्मातील सर्वांत मोठा व महत्त्वाचा सण. ज्याच्या प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व, पदार्थांपासून सजावटीपर्यंत सा-याची निराळीच रंगत!! वाढते प्रदुषण व तितक्याच वेगाने वाढणा-या महागाईचे संतुलन साधताना सणाचा आनंदही टिकवून ठेवण्याची धडपड सुरु असते. यासाठीच, या दिवाळीच्या सोहळ्याला देऊया नैसर्गिकतेची जोड, उत्साहाने साजरा करु दिवाळीचा सण! इथे देण्यातला आनंद अनुभवताना समाधानाची प्राप्ती होते. पर्यावरणाचा विचार केल्याने मिळणारा स्वच्छ आनंदही आपल्याच खात्यात जमा होतो. दिवाळीच्या प्रत्येक लहान सहान कामांत थोडे दक्ष राहूया. घराची साफसफाई, शॉपिंग, फराळाचे पदार्थ, घरातील शोभेच्या वस्तू म्हणजे कंदील, पणत्या, रांगोळीचं सामान अशी न संपणारी यादी बनवताना त्यामध्ये पुढील टिप्सना स्थान दिलेत, तर सर्वांना सामावून घेत दिवाळी साजरी केल्याचा आनंद नक्की मिळेल.

१.दिवाळीची शॉपिंग करताना दुकानदाराकडून प्लॅस्टिकची पिशवी घेणार नाही असं ठरवूनच निघायचं. त्या दुकानात कागदाच्या पिशव्या वापरल्या जात नसतील तर, अडचण व्हायला नको यासाठी घरुनचं काथ्याची किंवा कापडाची बॅग घेऊन निघावे. या बॅगा मजबूत असल्याने एकावेळी जास्त वस्तूंचा समावेशही त्यामध्ये करता येतो.

२.दिवाळीचं शुभ चिन्ह म्हणून मानाने मिरवणारा ‘कंदील’ विकत घेताना प्लॅस्टिकचा वापर न केलेल्या कंदीलाचीच निवड करावी किंवा स्वयंसेवी संस्थांनी बनवलेले कंदील देखील एक चांगला पर्याय ठरतील, ज्यामुळे खरेदी व मदत असा दुहेरी आनंद मिळू शकेल.

३.तसेच, शॉपिंगमधून घरात जमलेल्या कागदी पिशव्या वापरुन कंदील तयार करता येईल, ज्यामुळे त्या पिशव्याही फुकट न जाता त्यांचा कलात्मक वापर होऊ शकेल.

४.दिवाळीत घरोघरी आणखी एक कार्यक्रम घडतो तो म्हणजे साफसफाईचा. रद्दीपासून माळ्यापर्यंतची आवराआवर करण्याच्या कामाला सगळे जुंपले जातात व जुन्या, नको असलेल्या वस्तूंही फेकून दिल्या जातात. अशावेळी वापरत्या येण्याजोगे कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके गरजूंना दिल्याने त्यांची दिवाळी आनंददायी करता येईल.

५.गेली कित्येक वर्ष सामाजिक संदेशातून फटाक्यांना विरोध केला जातोय, यामुळे फटाक्यांची खरेदी पूर्णपणे बंद झाली नसली तरी, त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

६.फटाके खरेदी केलेच, तर किमान बालमजुर कामगारांकडून ते तयार केलेले नाहित, याची खबरदारी घ्यावी. फटाक्यांच्या बॉक्सवर ‘आमच्याकडे बालमजुर काम करीत नाहीत’ अशी नोंद असलेले फटाकेच घ्यावेत. तसेच, धूर व आवाज कमी असलेल्या फटांक्यांची निवड करावी.

७.लहान मुलांना दिवाळीत फटाक्यांपेक्षा इतर कलाकुसरीच्या गोष्टींमध्ये गुंतवावे. कंदिल बनवणे, कार्टुन्सची रांगोळी, पणत्यांची सजावट करण्यास शिकवावे. असे केल्याने त्यांनाही दिवाळीच्या सुट्टीचा नवा अनुभव घेता येईल.

वरील बाबी दिवाळी साजरी करण्याच्या फक्त टिप्स नाहित, तर आजची गरज देखील आहेत. चला तर, लागुया तयारीला!! तुम्हीसुद्धा इको-फ्रेंडली दिवाळीचा मनमुराद लुटा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समाधानाची, आरोग्यदायी व प्रदुषणविरहित जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सर्वांना दिवाळीच्या इको- फ्रेंडली शुभेच्छा!

More Articles
Designed and Developed by SocioSquares