COUPLE GOLE (1)

नेमकं काय म्हणायचं असतं…!

जन्मोजन्मीच्या गाठी सुटता सुटायच्या नाहीत, वडाला करकचून दोरा बांधत, मोठ्या प्रेमानं घालतेलं साता जन्माचं गा-हाणं फळास आल्यावाचून राहील कसं! प्रेमापुढे देवही हतबल होतो, म्हणूनच सावित्रीचं उदाहरण आजही ताजं आहे. पुढल्या जन्मांचं बुकींग बायको मनोभावे करते आणि नवराही मनोमनी “मला हीच हवी” म्हणतो.

इतकं सुंदर फुलावानी बहरलेलं नातं, बिचारं कायम विनोदाचा भाग बनतं. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नवरा बायको संवादातल्या कुरघोडी ऐकल्या की हसू येतं आणि अनुभवल्या की समजू लागतं; यामुळेच नात्यातली गंमत टिकून रहातेय.

जोडीदाराच्या बोलण्यातल्या बिटविन द लाईन्स सतर्क राहून अचूक हराव्या लागतात. जसं की, “ब-याच दिवसांत कोथिंबीर वड्या झाल्या नाहीत ना.” नव-याच्या या वाक्यातला ‘वड्या खाऊशा झाल्यात, तेव्हा कर’ हा अर्थ बोयकोपर्यंत छान पोहोचतो. कोथिंबीर वड्या कर गं, अशी ऑर्डर देण्यापेक्षा हे केव्हाही बरं, नाही का? “घरातलं मीठ संपलंय वाटतं.” नव-याच्या या खोचंक वाक्यावरुन बायको कुठलातरी पदार्थ अळणी झाल्याचा अंदाज बांधते. शब्दांची कोडी घालत, हजरजबाबी उत्तर देण्यात बायकाही कमी नाहीत.

स्वयंपाकात काही गडबड होऊन वरचेवर बिघडू लागलेल्या पदार्थांबाबत नव-यानं तक्रार केली, की त्यावर “बैलाला पण बैलपोळ्याची वर्षातनं एक सुट्टी मिळते.” हे उत्तर नव-याच्या कानावर येऊन आदळतं. बायकोच्या या उत्तरामागच्या भावना नवराही छान जाणतो. घरातलं किचन अधनं मधनं बंद ठेवून, हॉटेलला जायला हवं. तिलाही घरकामातून उसंत मिळायला हवी ना. सहज आठवणींत रमताना “शेवटचं कधी गेलेलो बरं, नाटकाला?” असं बायको लाडीकपणे म्हणाली असली, तरी तिच्या ह्यांना बरोबर समजतं. आता लवकरच एखादी सुट्टी पाहून टिकीटं काढायला हवीत.

नातेवाईक, शॉपिंग, आवडीनिवडी, आठवणी अशा एक ना अनेक विषयांवर असे तिरकस संवाद या नात्यात येताजाता घडत असतात. गोडीगुलाबीतलं बोलणं असं कोड्यातलं होऊ लागतं, ते नातं जुनं झाल्यानं नाही, तर नातं ख-या अर्थानं मुरु लागल्यानं, हो ना? चला तर, तुम्हाला ठाऊक असलेली असली गंमतीशीर वाक्यं पटपट लिहा ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये,

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares