Working mom (2)

नोकरी करणा-या आई समोरील अडचणी!

लग्न झाल्यावर स्त्री जीवनाची एका नव्या पर्वास सुरुवात होते, तशी किंवा त्याहून अधिक ती आई झाल्यावर तिचे
आयुष्य सर्वतोपरी बदलते. मुलगी, बहिण, पत्नी, सून अशा भूमिकांमध्ये आणखी एकीची भर पडते. जबाबदा-या
वाढतात, कामेही वाढतात. त्यात नोकरी करणा-या आईची तर बातच न्यारी, तारेवरची कसरत करताना तिला
तिचाच जीव होतो भारी!
बाळंतपणानंतर चार पाच महिन्यांतच पुन्हा नोकरीवर रुजू होणारी आई शरीराने ऑफिसमध्ये असते, पण मनाने
घरीच थांबते. बाळ जेवलं असेल? झोपलं असेल? रडत नसेल ना? अशा विचारांनी अगदी दिडमुठ होते. घरी बाळाची
काळजी घेणारे आजी ओजाबा असतील तर छानच, पण ते शक्य नसल्यास योग्यसे पाळणाघर शोधावे लागते आणि
तान्ह्या बाळाला घरी ठेवून ती ऑफिसच्या कामात मन गुंतवण्यासाठी झटते. सुट्टीची वाट पाहाणा-या तिचा, रविवार
देखील घरातील कामे उरकण्यात जातो. हे सत्र असेच सुरु ठेवायचे, की त्यात बदल करायचे हे घरातील बाकी
सदस्यांच्या हातात आहे.
काय करायचे घरातल्यांनी..? तर घरकामात तिला अधिकाधिक मदत करुन, तिचे काम हलके करायचे. प्रत्येकाने
स्वत:ची कामे उरकण्यावर भर द्यायचा. लहानग्याला आईचे दूध बाळाच्या प्राथमिक वाढीसाठी जितके अपरिहार्य
आहे. तितकेच मुलांच्या निकोप वाढीसाठी आई मुलांनी जास्तीतजास्त वेळ एकत्र घालवणे, त्यांच्या संवाद घडणे
गरजेचे आहे. यासाठी, मुलं पूर्णवेळ शाळेत जाण्यापुर्वीची वर्षे मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. एकदा का मुल
शाळेत जाऊ लागले, की अभ्यास, ट्युशन्स, हॉबी क्लासेसमध्ये तेही व्यस्त होतात. त्यांचा व नोकरी करणा-या आईचा
अधिकाधिक वेळ घराबाहेर जातो. वयानुरुप मुलांचा अभ्यास वाढत जातो, तसा आईसोबतचा गप्पांचा तास हळूहळू
मागे पडतो. पण, तो कायमचा बंद होता कामा नये.

हल्ली मुली उच्च शिक्षण घेऊन नोकरी करुन स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठी धडपडतात. लग्न देखील त्यांच्या
स्वप्नांआड येऊ देत नाहीत. याच ध्येयवेड्या स्वत: आई झाल्यानंतरही कधी स्वेच्छेने, कधी गरजेपोटी मॅटरनिटी लिव्ह
संपवून लगेच नोकरीवर रुजू होतात. तिला आकाशी उंच भरारी घ्यायची आहे, मात्र त्यासाठी तिच्या पंखांत बळ हवे.
ते बळ तिला बहाल करायचेय घरातील प्रत्येकाने!

More Articles
Designed and Developed by SocioSquares