Work and Home BANNER

नोकरी व घर : दोन्हीचे संतुलन!

शिक्षणाची वर्षे सरल्यानंतर इच्छीत क्षेत्रात नोकरी करुन, स्वाभिमानी जगणे स्विकारणारी ‘ती’! लग्नानंतर गृहिणीच्या कोशात न अडकता, घरासाठी, स्व-विकासासाठी शिक्षणाच्या बळावर आपले निराळे अस्तित्त्व निर्माण करतेय. सलग सात-आठ तास ऑफिसमधली कामे हलकी केल्यावर, तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात घरची कामे! धुणं-भांडी, जेवण सा-यालाच मदतनीस ठेवली, तरी मुलांचा अभ्यास, घराची साफसफाई, वाण सामान, इस्त्रीचे कपडे, बीलं, याद्या, नोंदी अशा न संपणा-या कामांचा आकडा कायमचा मानगुटीवर बसलेला! नोकरी करते, म्हणून घरकामांची जबाबदारी झटकण्याचा पर्याय नसतो. मग, हसत खेळत, तर कधी अगदीच क्षीण आल्यास नाक मुरडत कामे हातावेगळी होतात, पण या सा-या प्रपंचात सखी तू स्वत:ला वेळ देत नाहीस, हे मात्र खटकतं!

व्यस्त दिनक्रमातून नेमकी ‘स्व’वेळ चिमटीत पकडण्याची कला म्हणूनच जागृतीच्या प्रत्येक मैत्रिणीला ठाऊक हवी. ज्याप्रमाणे-

दिवसातले अधिकतम तास ऑफिसमध्ये नाहीतर प्रवासात जातात, अशावेळी ऑफिसमधलं काम मानसिकरित्याही ऑफिसमध्येच ठेवून येणं गरजेचं आहे. नाहीतर, हीच ब्याद आपल्यासोबत घरात शिरते व नीटनेटके आवरलेले घर अस्ताव्यस्त करते. घराच्यांवर राग, चिडचिड होऊन वाद भडकतात. एकाचवेळी अनेक जबाबदा-यांचा ताण सावरताना तारेवरची कसरत होणे साहाजिक आहे. अस्थिर झालेल्या मनाला ताळ्यावर ठेवायचे, तर नियमित मेडीटेशन करायला हवे. दिवसातून १५ ते २० मिनिटे मानसिक स्वास्थ्यासाठी द्यायला काय हरकत आहे. तसेच, उत्तम शारीरिक सुदृढता देखील मानसिक नैराश्यापासून दूर ठेवते. त्यासाठी आवश्यक आहे वयानुरुप व्यायाम सुरु ठेवणे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी आरोग्यदायी कवायतींसाठी वेळ मिळत नसेल, तर किमान सुट्टीच्यादिवशी आठवड्यातून फक्त एक तास योगा, व्यायाम किंवा झुंबा करायला काय हरकत आहे. आता हे एकट्याने करायला कंटाळत असाल, तर क्लास आहेतच जोडीला. असे क्लासेस हल्ली हाकेच्या अंतरावर असतात.

घरातील कामे सारेजण आलटूनपालटून करत असाल तर मस्तच, नाहीतर लहानथोर सर्वांनाच सोयीनुसार कामे वाटून द्यावी. मोठ्यांचे अनुकरण करताना लहानांच्याही कामे अंगवळणी पडतात. आहे ना छान पर्याय? लगेच अमलात आणा! ‘घर प्रत्येकाचे, घरातील कामे प्रत्येकाची’ या नियामामुळे कामे लवकर हातावेगळी होतील. सतत कामांत गढून गेलेल्या ‘ती’ला जरा निवांत वेळ मिळेल. मग, बोलक्या टेक्नोलॉजीला जरा सायलेंट मोडवर टाकून कुटुंब गप्पांचा तास भरवता येईल. संवाद घडेल, फावल्या वेळेत वाचन करता येईल, गाणी ऐकता येतील, छंद जोपासता येतील. किती किती गोष्टी आहेत करण्यासारख्या, फक्त स्वत:साठी वेळ राखून ठेवण्याचा अट्टहास धरायला हवा. यातूनच, मन आनंदी राहील आणि नोकरी व घरकुलाचे सहज संतुलन साधता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares