AFTER FIFTY (1)

पन्नाशीनंतरही स्वावलंबी जगता येईल!

घर, संसार, मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून, अनेक मैत्रिणी हातातली नोकरी सोडून गृहिणी किंवा हाऊस वाईफची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतात. त्यांच्याच नोकरी किंवा व्यवसाय करण्याची ताकद व इच्छा असूनही तडजोड करण्यास तयार होतात. मात्र काही वर्षांनी मुलं मोठी झाली, जबाबदा-या थोड्या कमी झाल्या की वाटू लागतं, “गृहिणी होण्याच्या निर्णयावर तेव्हा पुर्नविचार करायला हवा होता, किमान स्वखर्चासाठी थोडी रक्कम मिळवत राहायला हवं होतं, आता वय झालं, वेळ असला, तरी काम कोण देणार?” असे मन अस्वस्थ करणारे विचार मनात येत असतील, तर चांगलंच आहे. हीच नवी सुरुवात आहे. खचून नाही जायचं, जे इतके वर्ष नाही जमलं, तेच आता करायचं. जिथे आहोत तिथून श्रीगणेशा करण्याचा निश्चय करायचा, कारण शेवटी वय हे केवळ आकडे आहेत, ताकद तर इच्छाशक्तीत आजही कायम आहे. तिला आजमवूया….

ट्युशन्स:

शाळेत अभ्यासात कसे होतात? हूशार नसलात किंवा सर्वसाधारण असलात, तरी शाळेत, कॉलेजात एखादा विषय तरी आपल्या आवडीचा असतोच. त्याच्याच जोरावर त्या विषयाच्या घरी ट्युशन्स घेणे सुरु करता येईल. भाषा, गणित, इतिहास, विज्ञान यांपेक्षा चित्रकला, हस्तकलेत उत्तम होतात? तर आणखी मस्त! सुट्टीत किंवा विकेंडला कलेचे क्लासेस घेऊ शकता. अभ्यासाचे विषय असोत वा कलेचे, थोडा सराव करुन तुम्हाला नवे बदल अपडेट्स जाणून घ्यावे लागतील. पालक कायम उत्तम शिक्षकाच्या शोधात असतात. पूर्वतयारीनिशी विद्यार्थ्यांना सामोरे जायचे. इथे वयाचे बंधन आलेच कुठे? माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो आणि ज्ञान दिल्याने वाढते या दोन्ही उक्त्या तंतोतंत ख-या आहेत. त्यांचाच मागोवा घेत वयाला विसरायचे.

डिझायनिंग:

हे काम थोडं नाजूक आहे. नक्षीकाम म्हटलं, की बारीक नजाकती आल्याच. नजरेने फक्त छान साथ द्यायला हवी. कपड्यावरील डिझाईन्स, विणकाम, भरतकामातील प्रयोग किंवा मग महिलांना कायम मोहविणा-या हॅण्डमेड ज्वेलरीज! हवी तशी आणि हवी तितकी कलाकुसर करण्याची मुभा आहे.

शेफ:

आणखी किती वर्ष घरातील मंडळी आणि नातेवाईकांकडून स्वत:जवळील स्वयंपाक कलेचे गोडवे ऐकून घेणार? त्यापलिकडेही जायचेय ना? मग करा विचार स्वत:चं छोटेखानी, घरगुती कॅटरिंग सुरु करण्याचा. मान्य तुम्ही पन्नाशी पार केलीत. आता, फार धावपळ जमत नाही. म्हणूनच म्हटलं, छोटंसं कॅटरिंग अगदी सणसोहळ्यानिमित्त तुमच्या हातचा स्पेशल एखाद दुसरा पदार्थ बनवून विकता येईल. रेडीमेड घरगुती पदार्थांना मागणीही खूप आहे. घरातील सदस्यांनी फक्त माऊथ टू माऊथ पब्लिसिटी केली तरी पुरे. पदार्थाचा खमंगपणा खवय्यांपर्यंत आपसूक पोहोचेल.

सल्लागार:

इतक्या वर्षांत भरपूर पावसाळे पाहिलेत तुम्ही, म्हणूनच तुमच्या गाठीशी अनुभवाची शिदोरी देखील बांधली गेली. बरेचदा फुकटच्या सल्ला खिजगणतित नसतो, पण विकतचा सल्ला हमखास खपतो. अर्थात तो तितका बिनचूक हवा. व्यवहारिक झालेल्या यांत्रिक युगात मानसिक स्थैर्य हरवून बसणा-या अनेक व्यक्तिंना सकारात्मक विचारांची गरज असते. तुमच्याजवळ सारासार विचार करण्याचा गुण असेल, तर त्याला अनुभवाची जोड देत तरुणांशी छान मार्गदर्शन करता येईल.

लेखन:

कॉलेजला असताना छान कविता लिहायचात म्हणे, कथा-कल्पना रंगवण्याची हौस असूनही वेळे अभावी साहित्य लेखनावर, तेव्हा हवे तसे लक्ष देता आले नाही. तर आता पुन्हा हातात लेखणी घ्या. लेखनाच्या छंदाला मूर्त रुप द्या. पेन पेन्सिलची सवय नसेल, तर पटपट टाईप करा लॅपटॉपवर. कठिण काहीच नाही, वयाचं बंधन तर मुळीच नाही. तुमच्या मनाचा होकार महत्त्वाचा. त्याने पुढकार घ्यायला हवा. डिजिटल युगात लेखनाला व्यासपीठ मिळवून देणंही सोप्प झालंय. तुम्ही सुरुवात तर करा.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares