Exam Banner

‘परीक्षा’ मुलांहून अधिक पालकांची!

शाळा, कॉलेज, पदवी शिक्षणाच्या परिक्षांनंतर, वेळोवेळी द्याव्या लागणा-या शिक्षणोत्तर परिक्षांचे सत्र, तर कधीही न संपणारे! त्यातही दहावी बारावीच्या महापरिक्षा विद्यार्थ्यांसोबत घरातील सर्वांनाच ब्रम्हांड आठवावे इतक्या महत्त्वाच्या झाल्यात. वर्षभराच्या अभ्यासाचा निकाल लावणारे रणांगण दहावी बारावीच्या विद्यार्थांची आतुरतेने वाट पाहातेय. दिवसागणिक पहिल्या पेपरची तारीख जवळ येतेय आणि मुलांसोबत घरच्यांचा मानसिक ताणही वाढतोय. काय होईल?, कसं होईल?, कसे जातील पेपर? या काळजीत पालकांनी हतबल न  होता थोडं धीरानं घ्यायला हवं!

घरातील वातावरण हसतं खेळतं ठेवून, मुलांच्या मनावरील परिक्षेचं दडपण दूर करता येईल. “तू फक्त मनलावून अभ्यास कर, बाकी जो होगा देखा जायेगा|”, असा पवित्रा पालकांनी घेतल्यास मुलांना थोडं हायसे वाटेल. मेंदूवरचे अपेक्षांचे ओझे उतरवून, विश्वासाच्या उबदार घोंगडीत कुवतीपेक्षा जास्त अभ्यास करणे, मग त्यांना जाचक वाटणार नाही आणि परिक्षा, निकाल, कमी मार्क मिळण्याच्या भितीने आत्महत्येस बळी पडणा-या दुर्दैवी जीवांची संख्या तरी घटेल.

वेळेचं गणित – परिक्षा जवळ येऊ लागताच, अभ्यासाच्या वेळा भयानक बदलतात. रात्रीचे जागरण, सकाळचा ब्रम्हमुहूर्त दिवसरात्र नजरेसमोर वह्या आणि पुस्तकं! इतकं केल्यावर मेंदूला मुंग्या आल्या नाहीत, तरच नवल. त्यामुळे, पुरेशा अभ्यासानंतर, मुलांना पुरेशी झोपही मिळायला हवी.

आहार – मुलांना वाचलेले लक्षात रहावे, स्मरणशक्तीने ऐनवेळी दगा देऊ नये, म्हणून बिचा-या पालकांचा जीव वर-खाली होतो. अशावेळी, बावरुन न जाता नेहमीच्या आहारात हलकेशे बदल करावेत. ज्याप्रमाणे, सुका मेवा, फळे, शहाळ्याचे पाणी यांचा आहारात समावेश करावा. पिझ्झा, बर्गर, डिप फ्राईड केलेले जंक फूड, आईस्क्रीम, केक्ससारखे साखरेचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळावे.

ब्रेक टाईम – सोशल मिडीआपासून दूर रहाणेच उत्तम, अभ्यासातून थोडा ब्रेक घेतल्यावर मुलांशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा माराव्यात. परिक्षा, करिअरशिवाय एखाद्या मुलांच्या आवडीच्या विषयावर चर्चा झाल्यास वातावरणातील गंभीरता क्षणात नाहिशी होते.

निकाल – परिक्षा झाल्यानंतर निकालाची चिंता लागून असते. पेपर सोप्पे गेले, तरी कमी टक्के मिळण्याची भिती सतावते. मुलांना या तंग वातावरणातून बाहेर काढण्यासाठी सा-या कुटुंबानेच एक पिकनिक ब्रेक घ्यायला हवा.

जास्त मार्क मिळाल्यास मुलासोबत तुमचे कौतुक होणार व कमी मार्क मिळाल्यास तेच मुल तुमच्याकडे समजून घेण्याच्या अपेक्षेने पाहाणार. परिक्षार्थी मुलांचे, परिक्षणार्थी पालक होण्यापेक्षा या महत्तम चाचण्यांना खिलाडू वृत्तीने सामोरे जाण्याचे शिवधनुष्य, पालकांनो! प्रथम तुम्हाला पेलायचे आहे.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares