Career (2)

पर्यावरण क्षेत्रात करिअरच्या संधी!

ढासळत्या पर्यावरणाविषयी तुम्ही संवेदनशील असाल, तर तुमच्याजवळील या निसर्गप्रेमाला करिअरची जोड देता येईल. वाढते ध्वनी, वायू, जल प्रदूषण, वृक्षतोडीमुळे बिघडणारा वातावरणारा पोत, अनधिकृत बांधकामे, रोजच्यारोज टनानं वाढणारा कच-याचा ढिग, पशुप्राण्यांच्या नष्ट होत चाललेल्या जमाती, याचसोबत अनेक पर्यावरणीय कायद्यांविषयी नागरीकांची अनभिज्ञता या ना अशा अनेक समस्यांवर देखरेख ठेवून त्यावर संशोधनात्मक कार्य करणारे अनेक विभाग कार्यरत आहेत.

मानवाच्या जीवनशैलीमुळे बिघडलेल्या वसुंधरेच्या रुपड्यास पुन्हा पुर्ववत करणे अशक्य असले, तरी किमान तिची आणखी दुर्दशा होऊ नये म्हणून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी पर्यावरणीय पत्रकारिता हा एक उत्तम पर्याय ठरेल. निरिक्षण शक्ती व संशोधक वृत्तीच्या बळावर मासिके, वर्तमानत्रे किंवा दूरचित्रवाणीवरील बातमीवजा वाहिन्यांवर पत्रकाराची भूमिका बजावता येईल. सामान्य पातळीवरील समस्यांवरही प्रकाशझोत टाकण्याची संधी मिळेल. यामध्ये, पत्रकारितेच्या पदवीसोबत पर्यावरणविषयक तंत्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

पर्यावरण विज्ञान या विभागातही उत्तमोत्तम गुणी अभ्यासकांची आवश्यकता असून, इथे सृष्टिचा होणारा –हास थांबवण्यासाठी विश्लेषणात्मक संशोधन केले जाते. या कामाचे स्वरुप व्यापक, तितकेच आकर्षक आहे.

सध्याच्या काळात पर्यावरणासाठी सर्वोतोपरी गरजेचा असणारा प्रदूषण नियंत्रण विभाग! इथे योजनाबद्धरित्या काम व सतत नवनवीन धोरणे राबवणे आवश्यक आहे. यासाठी, पर्यावरणाचा आंतर्बाह्य अभ्यास हवा, तसेच स्थानिक ते आतंरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणविषयक घडामोडींची माहीती असावी. पर्यावरण विज्ञान विषयातील पदवी गरजेची असून, स्वयंसेवी संस्था, वन्यजीव व्यवस्थापन, जलसंपदा व कृषी संशोधन तत्सम विभागात कार्य करता येईल.

तसेच, कायदा क्षेत्रातील पदवी व पर्यावरण विषयातूल तंत्रशिक्षणाची पार्श्वभूमी असल्यास, कायदा कंपन्या, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पर्यावरणाशी संबंधित कायदा विभाग सांभाळता येईल. तसेच, नागरिकांमध्ये विविध पर्यावरण विषयक कायद्यांविषयी जागृतता निर्माण करुन त्यांना निसर्ग रक्षणार्थ तयार करता येऊ शकते.

या सा-यापलिकडे या क्षेत्रात जाणत्या पर्यावरणप्रेमींची पिढी घडविण्याची संधी देखील आहे. पर्यावरण शिक्षिकेच्या भूमिकेतून! अगदी प्राथमिक शाळेपासून निवडक उच्चमाध्यमिक अभ्यासक्रमात पर्यावरण विषय अध्ययनात असल्याने गुणी पर्यावरण शिक्षकाची निकड असतेच, या संधीचाही विचार करता येईल.

सामाजिक कार्य व करिअर असा छान संयोग असणा-या पर्यावरण क्षेत्राकडे उत्पन्नाच्या दृष्टीने पाहायला हरकत नाही.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares