parents banner

मुलांसोबत पालकही होत असतात ‘मोठे’!

घरात पिटुकल्या जीवाच्या आगमनासोबत आई, बाबा, आजी, आजोबा या नात्यांचाही जन्म होऊन घराला ख-या अर्थाने घरपण प्राप्त होते. बोबड्या बोलांपासून प्रवास सुरु झाल्यावर बाळाला हळुहळू समज येऊ लागते व यामधून विचारांची निर्मिती झाली की लहानवयातच पाल्याची स्वत:ची काही मतेही आकार घेऊ लागतात. पालकांच्याही नकळत लहान मुलांना शिक्षित करीत असते त्यांची निरीक्षणशक्ती! नजरेसमोरील माणसे, त्यांच्यातील संवाद, त्यांच्या सवयी, वागणूक एकूण सा-याच वातावरणाचा आरसा म्हणजे घरातील लहान मुलं! नवनवीन गोष्टी ग्रहण करण्याची त्यांची प्रक्रिया निरंतन सुरु असते, फक्त या क्रियेस योग्य वळणे देत पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी साहाजिकच घरातील मोठ्यांवर येते.

जन्म:च हुशार म्हणवल्या जाणा-या हल्लीच्या पिढीला मिळालेली टेक्नोलॉजीची साथ घरातील मोठ्यांना लाभलेल्या बालपणाहून फार वेगळी आहे. नजर जाईल तिथे मनोरंजनाची यांत्रिक साधने घरभर ठाण मांडून बसली आहेत, यामुळे त्या बिचा-यांचे मनोरंजनाच्या इतर पारंपारिक माध्यमांकडे होणारे दुर्लक्ष ही घरातल्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. त्यांचे सततचे टिव्ही बघणे, मोबाईलवरील गेम्स, सोशल मिडीयाचे भरपूर पर्याय यामुळे ऑफलाईन गेलाय पालक आणि पाल्यातील ‘संवाद’!

छोट्यांना कुठल्याही सवयीच्या आधीन जाण्यापासून रोखण्याची ताकद याच संवादात असून गप्पा गोष्टींच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या विश्वात प्रवेश करता येई शकतो. टिव्ही बघताना स्क्रिनवरील पात्रांशी मुले एकरुप होतात, त्यांचे बराच वेळ स्क्रिनकडे टक लावून पाहाणे टाळण्यासाठी त्यांना अधून मधून प्रश्न विचारावेत त्यांच्या मनातील त्या पात्राविषयीच्या कल्पना जाणून घ्याव्यात, कधी त्यांचे अभ्यासाचे पुस्तक सहज मन लावून वाचावे.  टिव्ही, मोबाईल, अभ्यास या त्यांच्या जगात तुम्ही रस घेतलेला पाहून त्यांनाही बरे वाटेल आणि पुढील वेळी ते स्वत:हून तुमच्याशी बोलू लागतील. वरचेवर रंगणारा प्रश्न उत्तरांचा खेळ तुम्हाला त्यांच्या बदलत्या विचारांचा अंदाज देत राहिल, ज्यामुळे त्यांच्या कलेने घेणे सोप्पे जाईल आणि जर कधी एखाद्या न आवडलेल्या वागण्यावरुन त्यांना दटावलेत, तरी गप्पांमुळे तयार झालेल्या तुमच्यातील मैत्रीवर परिणाम होणार नाही.

आपल्या दुनियेत सफर करण्याची आई-बाबांची उत्सुकता पाहून मुलांनाही मनमोकळ्या गप्पा मारण्याची सवय लागेल, विविध विषयांवर खेळाडू वृत्तीने घडलेली चर्चा चूक बरोबर ठरविण्याची दृष्टी त्यांना देईल आणि हाच ‘संवाद’ पालक व पाल्याची एकत्र मोठे होण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनवेल!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares