babysitting (2)

पाळणाघर निवडताना खबरदारी बाळगा, ही अशी!  

कुटुंब छोटं त्यात आई बाबा दोघंही नोकरी करणारे, अशावेळी घरातील लहान मुलांचा सांभाळ कोण बरं करणार? पूर्वी घराघरांत आजी आजोबा असायचेच, आता तेही दुर्मिळ झालेत आणि ज्या लहानग्यांना आजच्या काळातही त्यांचा सहवास मिळतोय, ते भले भाग्यवान! दुर्दैव म्हणजे हे चित्र फारस दिसत नाही, म्हणून मुलांना पाळणाघरात ठेवण्याची व्यवस्था जुनी असली, तरी आजच्या काळात पाळणाघर शोधताना पालकांना जास्तीची खबरदारी घेणं भाग आहे.

पाळणाघरात लहान मुलांना तेथील सांभाळणारी व्यक्ती मारताना, त्यांना चुकीची वागणूत देतानाचे व्हिडीओज इंटरनेटवर व्हायरल झालेले तुम्हीही पाहिले असतील. असे पुन्हा कुठल्याही लहानग्यासोबत घडू नये, म्हणून हा सतर्कतेचा इशारा पालकांसाठी!

प्रथमत: घराच्या आसपासचेच पाळणाघर शोधा. नातेवाईक अथवा स्नेहींमध्ये असेल तर उत्तम. परिसरात आपल्या ओळखीची मंडळी बरीच असल्याने असे पाळणाघर सुरक्षित ठरते.

एकदा त्या घरातील सुविधा स्वत: जाऊन पहा. मुलांची खेळायची, झोपायची जागा, तेथील शौचालय छोट्यांच्या दृष्टींने सोयीचे आहे की नाही ते बघा. अशा घरात खिड्यांना ग्रील असावी, तसेच दाराला आडवी फळी लावलेली असावी. तेथील मुलांचा सांभाळ करणा-या व्यक्तिस प्रथमोपचाराचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जेवणाचा डबा तुम्ही देणार असाल, तर छानच मात्र पाळणाघरात मुलांच्या जेवणाची व्यवस्था असेल, तर न काचरता पदार्थांबाबत, पिण्याच्या पाण्याबाबत चौकशी करावी.

यापलिकडे त्या पाळणाघरात येणा-या इतर मुलांमुलींच्या पालकांशी संवाद साधा. त्यांचा त्या पाळणाघराविषयीचा अनुभव जाणून घ्या. या सगळ्या प्रक्रियेनंतर तुमचे मुल एकदा का पाळणाघरात जाऊ लागले, की तुमची जबाबदारी संपत नाही. दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा त्याच्याकडून पाळणाघरातील गंमतीजंमती ऐका. त्याची काही तक्रार असेल, तर ती देखील शांतपणे ऐकून घ्या. मुख्यतर मुलांवर विश्वास ठेवा. बरेचदा पालक छोट्यांचं म्हणणं फार गंभारपणे घेत नाहीत. पाळणाघरात अज्ञात व्यक्तिकडून लहान मुलांमुलींचा लैंगिक छळ होण्याची समस्या भयंकर आहे, म्हणूनच कुठल्याही बाहेरच्या व्यक्तिस पाळणाघरास भेट देण्याची परवानगी नसते. तसेच, त्यांना मारणं, चुकीच्या त-हेने त्यांच्यावर ओरडणं देखील त्या बालमनासाठी घातक ठरतं. त्यामुळे, तुमची बच्चेकंपनी तुमच्या जवळ काही तक्रार करत असल्यास, त्याकडे कानाडोळा न करता एकदा त्याच्या बोलण्याची खातरजमा करुन घ्या.

यापलिकडे, पाळणाघरात एकाच वेळी भरपूर मुल असतात. सगळ्यांना एकाचवेळी शांत बसवण्यासाठी त्यांना टिव्ही बघायला सांगणं सोप्प असतं. हे वरचेवर घडू नये, म्हणून सर्व पालकांनी टिव्ही बघण्याची मर्यादित वेळ असावी, हे त्या बेबीसीटर सांगणं आवश्यक आहे.

शाळेत सरप्राईज टेस्ट असते, तशी केव्हातरी सरप्राईज भेट त्या पाळणाघराला देणे गरजेचे आहे. यातून दोन हेतू साध्य होतात. बेबीसीटर तेथील मुलांच्या संगोपनाबाबत कायम सतर्क राहील आणि अर्थात तुमचं बाळ अचानक तुम्हाला आलेलं पाहून खूष होईल.

पाळणाघर सध्याची गरज असली, तरी विघटीत घटनांना डोक वर काढण्याची संधीच देऊ नये. तुमचं मुल ज्या पाळणाघरात जातं आहे, तिथे अर्धाअधिक दिवस घालवतं आहे त्यावर तुमची नजर कायम असू द्या व सुविधेचा अतिवापर जाणूनबुजून टाळा. अधिकाधिक वेळ पालकांसोबत घालवणं लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी पालकहो तुम्हीच प्रयत्न करायला हवेत.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares