VISAR (2)

पाहुणा गावाला निघाला!

काही महिने आधीच गजराजाची मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकार सुरु करतात. विविध आकारातील, रुपातील, रंगसंगतीचा मेळ साधणा-या अशा भक्तांच्या मागणीनुसार बाप्पाच्या प्रतिमा तयार होतात. गणेशाच्या आगमनाची ही चाहूल, तर घरोघरी सफाई करण्यापासून पाहुण्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यापर्यंतच्या तयारीत गणेशभक्तही तल्लीन होतो. घरी आलेल्या बाप्पाचे मनोभावे कौतुक करताना त्याच्या सहवासातील हा अकरावा दिवस कधी उजाडतो समजतही नाही. ‘तो’ घरी येणार ही जाणीव जितकी सुखदायक तितकीच, तो आता परतणार ही भावना नकोशी वाटते. प्रसन्न वातावरण निर्माण करणा-या लंबोदराचे विसर्जन करताना डोळ्यांत पाणी तरळते व मन ‘बाप्पा पुढल्या वर्षी लवकर ये!’ असे हक्काने म्हणते आणि बाप्पा देखील दरवर्षी उत्साहाचं गाठोडं घेऊन येतो.

देवासाठी नैवेद्य, सकाळ- संध्याकाळ नियमित होणारी आरती, टाळांचा खुमणारा नाद, पदार्थांची रेलचेल, किचनमधील व्यस्त ‘ती’, प्रसाद वाटणारे लहानगे व घरातील कामे उत्साहाने तडीस नेणारी पुरुषमंडळी! या अकरा दिवसांच्या दिनक्रमाची जणू सवय होते. नातेवाईकांच्या भेटी व भजन – किर्तनात रंगणारे जागरण! हे सारे ज्याच्यासाठी त्या पाहुण्याचे, अनंत चतुर्दशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला विसर्जन केले जाते. याच दिवशी अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात. यामागे ब-याच आख्यायिका रुढ आहेत. ‘कौंदण्य’ नावाच्या ऋषींने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना समजले की, अनंत सर्वत्र आहे. तेव्हापासून या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते. यालाच, अनंताचे व्रत असेही म्हणतात. सलग चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सुख – शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळवण्यासाठी अनंताच्या पूजेचे व्रत करावे असे मानले जाते. कित्येक ठिकाणी पिढ्यान पिढ्या हे व्रत केले जाते. निस्वार्थी व परोपकारी धोरणाचा जीवनात अवलंब केल्यास सुख – शांती नांदते, असा संदेश अनंताच्या व्रतातून दिला गेला आहे. सोबत, आनंददायी गणेशोत्सव सोहळ्याची सांगता देखील यादिवशी होते. बाप्पा तुझ्याविना ‘चैन पडेना आम्हाला’ ही भक्ताची माया सोबत घेऊन गावी परतणारा बाप्पा देखील पुढील वर्षाची वाट पाहात असणार!

Image source – http://goo.gl/ffbDV5

More Articles
Designed and Developed by SocioSquares