Skin pimples (2)

पिंपल्सवर घरगुती उपाय!

त्वेचेवरील मुरुमांची संख्या त्वचेचा पोत सांगते. जितके मुरुम जास्त, तितकी त्वचा खडबडीत व लालसर दिसू लागते. आलेल्या एका पिंपलमुळे त्याच्या सभोवतालच्या त्वचेलाही संसर्ग होऊन, आणखी पिंपल्स येऊ लागतात. मेकअप करुनही ते संपूर्णपणे झाकले जात नाहीत, त्यांचा त्वचेवरील उभटपणा दिसून येतोच, त्यांना कायमचं घालवायचं; तर कुठलेही साईड इफेक्ट न देणारे पुढील घरगुती उपचार करुन पाहावेत.

  1. बेकींग सोडा चेह-यावरील पिंपल्स घालवण्यासाठी उपयुक्त ठरतो. एक चमचा बेकींग सोड्यात पाण्याचे काही थेंब मिसळून ते पिंपल्सवर जास्तीतजास्त ४ ते ५ मिनिटे लावावे. नंतर, पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
  2. टोमॅटोतील ‘ए’ जीवनसत्त्व त्वचेला तजेलदार बनवते. यासाठी, टोमॅटोचा ताजा गर त्वचेवर किमान २० ते ३० मिनिटे लावून ठेवावा. त्यानंतर, पाण्याने चेहरा नीट धुवून घ्यावा. या गरात काकडीचे पाणी मिसळले, तरी चालेल. त्वचेला छान थंडावा मिळेल.
  3. हळद, मध, दूध, गुलाब पाण्याचे मिश्रणही मुरुमांवर गुणकारी ठरते. या जिन्नसांचे प्रमाण पुढीलप्रमाणे ठेवावे. दोन चमचे मध, दोन चमचे दूध, अर्धा चमचा हळद व काही थेंब गुलाबपाणी एकत्र करुन तयार झालेले मिश्रण पिंपल्सवर लावल्यानंतर साधारण २० मिनिटांनी चेहरा धुवावा.
  4. लिंबाचा रस कापसावर घेऊन हलक्या हाताने मुरुमांवर लावावा. रस चेह-यावर सुकू द्यावा व थोड्यावेळाने पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. नियमितपणे दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास फरक नक्की जाणवेल.
  5. एक सर्वांत साधा सोप्पा उपाय, तो म्हणजे बर्फाचा खडा कापडात गुंडाळून मुरुमांवर लावावा. तीन चार दिवस नियमित हा उपाय केल्यास पिंपल्स कमी होऊन, त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.
  6. अंड्यातील पांढरा भाग मुरुमांवर फायदेशीर ठरतो. हे अंड्यातील पांढरे द्रव्य मुरुमांवरुन लावून १० ते १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

मुरुमांचे येणे बरेचदा अयोग्य आहारावर अवलंबून असते. जेवणात सकस व पौष्टिक पदार्थांची कमतरता मुरुंमाना आमंत्रण देते. त्यामुळे, घरगुती उपायांसोबत घरच्या जेवणावरही भर द्यायला हवा. दह्यातील कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी आवश्यक असल्याने आहाराच दह्याचा समावेश आवर्जून करावा. तेलकट, तूपकट, फास्ट फूड, कृत्रिम रंगांचा वापर केलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. पांढरा ब्रेड, भात, बटाटा, रिफाईंड साखर असे पदार्थ खाण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे. संपूर्ण आहार घेतल्याने, पचनक्रिया देखील सुरळीत सुरु राहते. त्यामुळे, पिंपल्सवर उपाय म्हणून घरगुती औषधांची मदत घेताना, आहाराकडे दुर्लक्ष करु नये.

More Articles
Designed and Developed by SocioSquares