Grandparents Banner

पिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल!

एकत्र कुटुंब पद्धती विभक्त झाली आणि वास्तूसोबत मनांचाही आकार आकुंचन पावला. छोट्या कुटुंबाने छोट्या जागेत घर बसवण्याच्या नादात अनेक अडगळीच्या वस्तू दूर सारल्या. निर्जीव गोष्टींना थारा न दिल्याने, घर सुटसुटीत मोकळं ढाकळं झालं; पण सिनियर सिटीझन्सना वगळल्याने पर्णहीन झाडाप्रमाणे ओकबोकंही वाटू लागलं. ट्रेन, बस, देवदर्शन सा-या ठिकाणी वृद्धांना आरक्षण मिळालं, मात्र नेमक्या हक्काच्या घरातच जागा आरक्षित करणं बाकी राहिलं.

कधी जाणून बुजून, तर कधी मनावर दगड ठेवून, शिक्षण नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर बस्तान बसवणा-यांमुळे नवी पिढी आजी आजोबांच्या प्रेमाला पारखी झाली. घरातील नातवंडं या उणिवेमुळे ब-याच गोष्टींना मुकतायेत, त्यातील काही पुढीलप्रमाणे-

बोलके पुस्तक

लहान मुलांना वाचनाची आवड लावायची, तर प्रथम त्यांना रंजक कथा ऐकवाव्या लागतात. छान छान गोष्टी खुलवून सांगणे आजी आजोबांना अचूक जमते. इतिहास पुस्तकात वाचून जिकता लक्षात रहात नाही, तितका तो अनुभवलेल्या व्यक्तिंकडून ऐकल्यावर डोक्यात पक्का बसतो. आजी आजोबांचा स्वानुभव इथे छान कामी येतो.

टाकाऊ ते टिकाऊ

या दोन्ही पिढ्यांचे बालपण, अगदी दोन टोकं! सर्व क्षेत्रांतील विकास, पैशाचे घटलेले मूल्य, वाढती महागाई यामुळे बचतीचा सल्ला आजी आपल्या वागण्यातून मुलांपर्यंत पोहोचवते. त्यांचे गरीबीतले दिवस, तेव्हाची काटकसर, कमी खर्चात भागवण्याचे अनुभव ऐकले, की मुलांनाही गरजेपुरती खरेदी करण्याची सवय लागते.

नातीगोती

‘हम दो हमारा एक’मुळे काका, आत्या, मावशी, मामा अशी सख्खी नाती नव्या पिढीच्या वाट्याला येत नाहीत. अशावेळी, नात्यांचा गोतावळा उलगडून सांगण्यात आजी आजोबा मात्र तरबेज असतात. भरपूर सदस्यांनी भरलेल्या घरात त्यांचं बालपण गेलेलं असल्याने, रक्ताच्या नात्यांइतकीच मैत्रीची नाती जपण्याची ते शिकवण देतात.

वयोगट

आजी आजोबा व नातवंड्यांच्या वयात भरपूर अंतर असले, तरी दोघांमधील मैत्रीचे नाते ‘जनरेश गॅप’ सहज भरुन काढते. यामुळे घरातील लहान मुलांना कुठल्याही वयोगटासोबत बोलण्या चालण्याची रीतभात कळू लागते. लहानांना समजून घेण्यासोबत, मोठ्यांना मान देण्याचे शिकताना आई वडील व आजी आजोबांचे आपापसातील वागण्याचेही ते निरिक्षण करतात.

ताणमुक्त संवाद

गाठी अनुभवाची पोतडी असल्याने, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण न घेणे आजी आजोबांना छान जमू लागलेले असते. नव्या पिढीतील झटपट निर्णय, अतीताण, अतीराग, हलगर्जीपणा, आतताईवृत्ती अशा अवगुणांवर लगाम बसतो. घरात विविध विषयांवर चर्चा, संवाद घडत राहतात ज्यामुळे, वेळोवेळी थोरांचे मौलिक सल्ले घेण्याची चांगली सवय लागते.

भूतकाळात अडकून न रहाता, जगण्याच्या नव्या पद्धतींशी आजी आजोबा जमेल तसं जुळवून घेत असलेलं पाहून, मुलांनाही बदलाला सामोरं जाण्याची ताकद मिळते. नेहमी स्वत:च्या मनाप्रमाणे घडायलाच हवं, हा हट्ट फार टिकाव धरत नाही. आई बाबांवर प्रेम असतंच, पण आजी आजोबांची माया माणसांची किंमत समजावून सांगते. ‘म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण’ कदाचित याचमुळे या दोन पिढ्यांचं एकमेकांशी छान जुळतं, एकमेकांना समजून व सामावून घेण्याचं भान कायम रहातं!

तुमच्या घरातील लहानग्यांना असे प्रेम मिळतेयं ना? कळवा तुमचे अनुभव, तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहातोय!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares