Puran poli

पुरणपोळीच्या नव्या त-हा!

महाराष्ट्राची ओळख असणारी पारंपारिक ‘पुरणपोळी’ खवय्यांच्या मोठ्या लाडाची! होळी सणाला तर या पुरणपोळीचा मान फारच वधारतो. घराघरात बनत असलेल्या पुरणपोळ्यांचा खमंग सुवास सर्वत्र दरवळून, ख-या अर्थाने होळीचा रंग चढू लागतो. सणावाराला बनणा-या पारंपारिक पदार्थांच्या साहित्य व पाककृतीत थोडाफार बदल करुन एखादा नवीन पदार्थ बनविण्याची हौस असेल, तर खालील रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील! गणेशोत्सवाला विविध स्वादाचे मोदक, तर दिवाळीत अनेक प्रकारच्या करंज्या उपलब्ध असतात, त्याप्रमाणे आता हौशी सुगरणी बनवू शकतील नव्या चवीच्या पुरणपोळ्या खास होळीच्या निमित्ताने!

१. रव्याची पुरणपोळी

साहित्य – पाव किलो बारीक रवा, पाव किलो चण्याची डाळ, पाव किलो गूळ, वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पावडर, साजूक तूप

पाककृती – चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्यावी. वाफवलेल्या डाळीतून पाणी वेगळे करावे. नंतर कढईत गरम तूपामध्ये गूळ व डाळ एकत्र करुन शिजवून घ्यावी व गॅस बंद करुन तयार मिश्रणात वेलची पूड, जायफळ पूड आणि सुंठ पावडर घालून मिश्रण कोमट असतानाच पुरणपात्रात घालून त्याचे बारीक पुरण बनवावे.
आवरणासाठी- प्रथम रवा जराशा दुधासोबत मळून घ्यावा. तयार झालेला गोळा काहीवेळ झाकून ठेवावा. नंतर, त्याचे लहान लहान गोळे करुन त्यामध्ये तयार पुरण भरावे व साजूक तूपाच्या साहाय्याने पोळ्या लाटाव्यात. तव्यावर मंद आचेवर या पोळ्या खरपूस भाजाव्यात.

२. स्ट्रॉबेरी पुरणपोळी-

साहित्य- (आवरण)-दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते (सारण)- २ कप बारीक रवा, १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी, २ टे.स्पू. तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टे.स्पू. वेलची पूड, साजूक तूप
पाककृती – कढईमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घेऊन साधारण मिनिटभर परतून घ्यावेत व त्यामध्ये २ टे.स्पू. पाणी घालून पुन्हा मिनिटभर शिजवून, बाजूला काढून ठेवावेत. आता, कढईमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये रवा घालून मंद आचेवर भाजून घ्यावा. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. नंतर, कढईमध्ये दूध व पाणी गरम करुन त्यामध्ये भाजलेला रवा घालून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यावा व त्यामध्ये साखर, वेलचीपूड, शिजवलेल्या स्ट्रॉबेरीज घालून मिश्रण पाच मिनिटे शिजवावे. आवरणासाठी दिलेले साहित्य नीट मळून घ्यावे व त्याचे लहान गोळे बनवावेत. तयार आवरणात पुरण भरुन पुरणपोळी लाटावी व नॉनस्टीक तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी. अशी, स्ट्रॉबेरी स्वादाने परिपूर्ण पुरणपोळी तूपासोबत गरमागरम सर्व्ह करावी.

३. रताळ्याची पुरणपोळी –

साहित्य – दीड वाटी मैदा, मीठ व हळद चवीनुसार, १ चमचा तेलाचे मोहन, १ वाटी रताळ्याचा कीस, अर्धी वाटी गूळ, १ लहान चमचा जायफळ पूड, दीड वाटी साजूक तूप.
पाककृती – कढईत ३ चमचे तूप घालून कीस परतून घ्यावा व त्यामध्ये गूळ घालून गॅस बंद करावा. त्यात जायफळ पूड घालून पुरण थोडे थंड होऊ द्यावे. आता मैद्यात हळद, मीठ व तेल घालून मिश्रण पाण्याने नीट मळून घ्यावे. नंतर, पारी लाटून त्यात पुरण भरुन पोळी लाटावी व तव्यावर तूप सोडून खमंग भाजून घ्यावी.

४. तिखट पुरणपोळी –

साहित्य – १ वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मैदा, मीठ चवीनुसार, फोडणासाठी ३ चमचे तेल, मोहरी, तिखट, धणे व जिरे पूड, हळद, हिंग, कोथिंबीर, पाव वाटी तेल.
पाककृती – प्रथम हरभरा डाळ सहा तास भिजवून त्यातील पाणी निथळून वाटून घ्यावी. कणिक व मैद्यात मीठ घालून मिश्रण पाण्याने मळून घ्यावे. कढईत तेलावर, जिरे, मोहरी, हिंग, हळद, तिखट, वाटलेली डाळ घालून व्यवस्थित परतावे. नंतर, त्यामध्ये मीठ व कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्यावे. कणकेची पारीमध्ये तयार पुरण भरुन पोळी लाटून झाल्यावर दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्यावी.

येत्या होळीला नेहमीच्या प्रसिद्ध पुरणपोळीच्या मेजवानीला जोड द्या, वरील हटक्या रेसिपीजची, ज्यामुळे घरातील लहान थोरांना तुम्ही सर्व्ह करु शकाला एक नवीन डीश आणि सोबत ‘सुगरण’ ही तुमची ओळखही राहील कायम!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares