पूजन देवी लक्ष्मीचे!

दिवाळी सणातील प्रमुख सहा दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘लक्ष्मीपूजन’! धनाची देवता ‘लक्ष्मी’ ही चंचल आहे असा समज हिंदूशास्त्रामध्ये असून लक्ष्मीपूजनाने ती स्थिर होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण ठेवून लक्ष्मीचे पूजन केले जाते. पहाटे अभ्यंगस्नानाने या दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. व्यापारी वर्गाचे नवे वर्ष या दिवसापासून सुरु होते. लक्ष्मीच्या पूजेसाठी पाटावर रांगोळी काढली जाते त्यावर तांदूळ किंवा तबक ठेवून, पूजेमध्ये सोन्याचे दागिने, सोन्या-चांदीची नाणी, को-या नोटा ठेवल्या जातात व दुकानदार किंवा व्यापारी मुख्यत्वे आपल्या व्यवहाराच्या नोंदी ठेवण्याच्या वहीची पूजा करतात.

लक्ष्मीपूजनासाठी सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे स्त्रियांचा भर दिसून येतो. सध्याच्या काळात सोन्याचा चढता भाव पाहता सोने खरेदी कमी झाली आहे असे वाटेल पण, आजही काही ग्रॅम का होईना पण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी करणा-यांची संख्या कमी नाही. केरसुणी सारख्या क्षुल्लक वाटणा-या वस्तूला देखील या उत्सवात मान दिला आहे. घरातील स्वच्छतेसाठी केरसुणीची हळद, कुंकू लावून पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे धर्माने अधर्मावर विजय मिळवण्याचा दिवस. या दिवसाला व्यापारांसह घरोघरी अनन्यसाधारण महत्त्व आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares