winter jelly (1)

पेट्रोलियम जेलीचे हे ५ उपयोग माहित आहेत?

सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. दर दोन तीन दिवसांनी कुणाच्या ना कुणाच्या लग्नस्थळी जाणे तुम्हीही अनुभवत असाल, त्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लग्नमंडपी उपस्थित रहाण्याच्या पेचातही अडकू शकता. आता, ते लग्न लांबच्या नातेवाईकाचे असो किंवा घनिष्ठ मित्राचे, जायचं तर अगदी टिप टॉप! अशावेळी कमी वेळात कामे निपटावी लागतात, यामध्ये छोटीशी पेट्रोलियम जेलीची डबी तुमचा मौल्यवान वेळ नक्की वाचवेल.
पेट्रोलियम जेली कोरडी पडणारी त्वचा मुलामय ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण त्याशिवाय या तेलकट जेलीचे आणखी काही उपयोग आहेत जे प्रत्येकीला माहित असावेत. कारण, वेळ वाचविण्याचे नवे फंडे आपण कायमच शोधत असतो, हो ना?

१. डोळ्यांचा मेकअप –
डोळ्यांना मेकअप करणे जितके नाजूक व अवघड काम, तितकाच हा मेकअप पुसतानाही जपावे लागते. नाहीतर मस्करा, आयलायनर, काजळ सारे एक होऊन डोळ्याभोवताली काळे होते आणि मग तोंड साबणाने धुतले तरी त्वचेवरील काळेपणा जात नाही. यासाठी, कापसावर थोडी पेट्रोलियम जेली घेऊन त्याने डोळ्यांचा मेकअप हळूवार पुसून घ्यावा. असे केल्याने, वॉटरप्रुफ मेकअपही सहज निघतो व त्वचेला इजा होत नाही.

२. नेलपॉलिश-
घाईघाईत नेलपॉलिश लावताना बरेचदा ते नखाबाहेरील त्वचेवर लागते. लगेच कापूस किंवा कपड्याने पुसायला गेल्यास, नखावरील ओल्या नेलपेंटला लागून तेही खराब होते. या त्रासातून सुटण्यासाठी नेलपेंट लावण्याआधी नखाच्या भोवताली पेट्रोलियम जेली लावावी. ज्यामुळे, तिथे नेलपॉलिश लागले तरी थोड्यावेळाने स्वच्छ कले तरी सहज जाते.

३. शाही झुमके –
साडी, कुर्ती किंवा पंजाबी ड्रेसवर सध्या भरगच्च कानातले घालण्याचा फॅशन ट्रेंड पाहाता, असे वजनदार कानातले नाजूक कान किती वेळ झेलणार? मग, कान दुखू लागतो, सुजतो यावर उपाय म्हणून थोडशी पेट्रोलियम जेली कानाच्या पाळीस लावावी.

४. हेअर कलर-
घरच्याघरी केसांना कलर करण्याचे शिवधनुष्य उचलत असाल, तर असे रंगकाम करताना कपाळाला, कानाला किंवा चेह-यावर कुठेही लागलेला हेअर कलर सुकून पक्का होतो. अशी फजिती झाली, की केसांचा नवा रंग नजरेस पडण्याआधी चेह-यावरील रंगाचे डागच प्रथम दिसतात. असे होऊ नये म्हणून, केसांभोवतालच्या त्वचेवर पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावावा, यामुळे रंग त्वचेला लागत नाही.

५. फाऊंडेशन-
मेकअप करताना चेह-यावरील काही भाग हायलाईट केल्यास, आणखी उठून दिसतात. यासाठी आवश्यक आहेत हायलाईटर्स, जे इतर मेकअप प्रॉडक्टप्रमाणेच महागडे आहेत. यातून पळवाट काढून पेट्रोलियम जेलीचा मस्त वापर करता येईल. फाऊंडेशन व ही जेली समप्रमाणात घेऊन नीट एकत्र करावी आणि चीकबोन, कॉलरबोन हायलाईट करावेत. मेकअपमध्ये वापरलेली ही ट्रिक ओळखूही येणार नाही इतकी चपलख बसते.

पाहिलतं? कोरड्या त्वचेची काळजी घेण्याशिवाय इतरही बरीच कामे करते ही पेट्रोलियम जेली! चला तर, वरील टिप्स नक्की आजमावून पाहा व सोहळ्यासाठी तयार होताना तुमचा किती वेळ वाचला हेही कळवा आठवणीने!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares