fat banner

वाढलेल्या पोटासाठी न कंटाळता करा ही योगासने!

वयानुरुप येणारा लठ्ठपणा किंवा बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे कमी वयातच वजन वाढीच्या उद्भविणा-या समस्यांमुळे शरीर वेडेवाकडे वाढू लागते. मुख्यत्वे पोट सुटले की शरीर ख-या अर्थाने गोलाकारशा झीरो फीगरकडे वाटचाल करते. यासाठी कुठल्याही वयात पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने एक उत्तम उपाय ठरतील. आज अशाच ५ योगासनांची माहिती आपण करुन घेणार आहोत.

3

सेतुबंधासन –

प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून शरीराच्या जवळ उभे करावेत. दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्याएवढे अंतर असावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत पोट व कंबर वरती उचलावे. श्वसन संथ सुरु ठेवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहिल्यानंतर, हळुवारपणे पुन्हा मूळस्थितीत यावे. (मणक्याचे विकार असणा-या व्यक्तिंनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करु नये.)

1 (1)

चक्की चलनासन –

हे योगा प्रकार करताना, प्रथन जमिनीवर आरामात बसावे. पाय सरळ पसरावेत. दोन्ही पाय ऐकमेकांना लागून ठेवावेत. दोन्ही हात जोडून तयार झालेली मूठ पायाला समांतर धरावी आणि आता गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात कंबर फिरवावी. प्रथम दहा वेळा घड्याळ्याच्या दिशेने व नंतर दहा वेळा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने कंबर फिरवावी. कंबर फिरवताना घाई करु नये.

5

भुजंगासन –

प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडावेत. हनुवटी फरशीवर ठेवावी व हाताचे कोपरे कमरेला टेकलेले असावेत. आता, हळूहळू हातांच्या आधारे कमरेपासून पुढचा भाग शक्य असेल तितका जमिनीपासून वर उचलावा व नजर आकाशाकडे असावी. साधारण २० ते ३० सेकंदांनी हळूहळू पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे.

4

धनुरासन –

हे आसन करताना शरीराची स्थिती साधारण धनुष्यासारखी होते. प्रथम पोटावर उपडे झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून, पायांमध्ये ६ ते ७ इंचाचे अंतर असावे. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्याजवळ पकडावे. आता, हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचलावेत. पाय वर उचलताना पोट-या मांड्यांपासून लांब नेण्याचा प्रयत्न करावा. हे योगासन करताना श्वासाची गती संथ असावी. हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा करावा, ज्यामुळे शरीराचा संपूर्ण भार पोटावर येईल. पोटाला किंवा पाठीच्या कण्यास गंभीर विकार असलेल्यांनी हे आसन करणे टाळावे.

2

पश्चिमोत्तासन –

प्रथम दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून बसावे. पायाचे अंगठे व टाचा जुळवून घ्याव्यात. दोन्ही हात कंबरेवर ठेवावेत. आता, थोडे कंबरेत वाकून डाव्या हाताने डाव्या पायाचा व उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा. मात्र, गुडघ्यांमधून पाय वाकता कामा नयेत. हे आसन नियमितपणे करीत राहिल्यास, हातांनी पायाचे अंगठे पकडणे शक्य होते.

अशाप्रकारे, वाढते पोट नियंत्रणात ठेवण्यासाठी वरील योगासने नियमित करायला हवीत. तसेच, सांधेदुखी किंवा कंबरेच्या, पाठीच्या दुखण्यावर उपचार सुरु असल्यास मार्गदर्शनाशिवाय कुठलीही योगासने करु नयेत.

More Articles
Designed and Developed by SocioSquares