mirror banner

प्रत्येकीनं आधी स्वत:वर प्रेम करायला हवं!

प्रत्येक स्त्रिच्या निरीक्षण शक्तीस दाद द्यायला हवी. एखाद्या सोहळ्यात किंवा अगदी रस्त्यावरुन चालताना देखील शेजारून जाणारीनं काय घातलंय? ते तिला शोभतंय का? मग याआधी आपण हे कुठे पाहिलंय? आणि हे मला कसं दिसेल? असे एक ना अनेक प्रश्न मन बांधू लागतं. त्याला स्वत:च्याच समाधानकारक उत्तरांची जोड मिळत जाते.

इतरांवर अशी टिका टिपणी करणं मजेशीर वाटत असेल, पण आपल्याकडे कुणी असं रोखून पाहिलं, तर मात्र कसनुसं होतं. पेहरावावरुन, राहणीमानावरुन कुणी आपल्याबद्दल काही पुटपुटताना जाणवलं की उत्सुकता वाटेत आणि तितकीच घोर निराशा होते.

वाढणारं वय, रोडावलेला चेहरा, पिकणारे केस, शरीराची जाडी, त्वचेचा सावळेपणा, कमी उंची, अशा स्वत:तील ब-याच बाबी स्वत:लाच खटकत असतात. कुणी काही बोलो न बोलो, आपण स्वत:वर केलेल्या टिकांची यादीच इतकी मोठी असते, की बाह्यसौंदर्याबरोबर मनालासुद्धा आपण कमकुवत बनवून ठेवतो. लोक हसतील याची भिती वाटते. चूक होईल म्हणून मन काचरते. ज्यामुळे, चारचौघांत बोलायला लाज वाटते, खुलेपणाने  मत मांडण्यास नकार देतो. स्वत:ला मागेमागे खेचत राहतो.

अशा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मन आधीच खट्टू झालेलं असतं. तुम्हीही असेच स्वत:वर नाराज असाल, तर अशा नकारात्मक विचारांना कायमचा रामराम ठोकण्यासाठी सर्वप्रथम स्वत:वरच प्रेम करायला हवं. एकदा आरशासमोर उभ राहून, तुमच्या सौंदर्यांत असणारी खोट शोधू नका. तर सारे अवयव धडधाकट आहेत. इंद्रिय छान कार्यरत आहेत, त्याबद्दल देवाचे आभार माना.

कित्येक विकलांग, जे आहे त्यात समाधान मानून, अविश्वसनीय कार्य करीत जगण्याचं सोनं करतात. मग, सुदृढ आरोग्य असणारे आपण स्वत:वर नैराश्य का बरं लादून घेतो? शिक्षण, नोकरी, आर्थिक चणचण, कर्जाचे डोंगर, या समस्यांचे काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. पण, आत्मविश्वासातच दु:खाच्या दिवसांचा कायापालट करण्याची ताकद असते ना?

घरकाम, मुलांचे संगोपन, पाहुण्यांचे मानपान, सणसोहळे असा जीवनातील विविध टप्पे मनसोक्त जगायचे असतील, तर प्रथम स्वत:वर माया करायला हवी. जे घरातील स्त्री कधीच करत नाही. किचनचा कारभार वर्षानुवर्ष सांभाळते, दुखण्याखुपण्याकडे दुर्लक्ष करते, नोकरीच्या नादात छंद जोपासणे विसरते. उतरत्या वयात मात्र ब-याच गोष्टी करायच्या राहून गेल्याची जाणीव होते, पण आता वेळ निघून गेलेली असते.

जागृतीच्या मैत्रिणींनो, तुम्हाला अशी खंत कधीही वाटू नये. म्हणून या लेखाचा खटाटोप. चला सगळ्याजणी मिळून म्हणूया, “मी जशी आहे, तशी सुंदर आहे. कुटुंबाकडे लक्ष देताना, स्वत:कडे  मी कधीच दुर्लक्ष करणार नाही. कारण, मी माझी लाडकी आहे.”

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares