travel bag banner

प्रवासाची ‘बॅग’ भरताना….

पिकनिक म्हणजे, धम्माल-मस्ती, हश्या आणि टाळ्यांची भट्टी! मूड फ्रेश करण्यासाठी ट्रिपचा बेत प्रवासी मोठ्या हौसेने आखतात व सामानाच्या ओझ्याखाली दबून जातात. ढिगभर कपड्यांसोबत “हेही लागेल, तेही लागेल, असू दे बॅगेत” असं म्हणत जड झालेली बॅग उचलूनच जीव अर्धा होतो. मग, ट्रिप पूर्ण होईपर्यंत हा थकवाच सोबत करतो. अशा अडचणींपासून तुम्ही दूर रहावे यासाठी, बॅग पॅक करावी स्मार्टली! सहलीचे ठिकाण वा सहलीचा प्रकार यावरुन बॅगेतील सामान ठरवावे. कमीतकमी व नेमक्या वस्तू निवडाव्यात ज्यामुळे बॅग हलकी होईल. हात किंवा खांदेदुखीचा त्रासही होणार नाही.

तुमच्या पुढील पिकनिक प्लॅन्ससाठी बॅग पॅक करा या क्रमाने,
१. लहानशी विकेंड ट्रिप आहे, तर डफेल बॅग निवडावी. आकारास लहान व वजनास हलकी असणारी ही बॅग छोट्या ट्रिपसाठी योग्य ठरेल.

२. विमान, ट्रेन, बस किंवा कार कुठल्याही वाहानाने प्रवास करणार आहात, तर रोलिंग बॅग (चाकं असलेली) निवडावी. लांबच्या प्रवासात बॅग हातात किंवा पाठीवर घेण्यापेक्षा बॅगेला बाबागाडीसारखे ओढत नेणे नक्कीच कमी श्रमाचे आहे.

३. ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगसाठी जाताय, तर पाठीवरची व वजनास हलकी असेल अशीच बॅग निवडावी. जंगल, रानावनांतील वाटा, उतार चढणीचे अरुंद रस्ते अशा अडव्हेंचरर्सचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल, तर पाठीवर कमी वजनाची बॅगपॅक हवी; ज्यामुळे दोन्ही हात मोकळे रहातील.

४. योग्य बॅग निवडल्यावर, त्यामध्ये भराभर मिळतील ते कपडे न भरता ट्रिपचे दिवस मोजून त्यानुसार कपडे कॅरी करावेत.

५. ताप, अंगदुखी, अपचन या समस्यांवर आराम देणा-या गोळ्या, तसेच बॅंडेज पट्टी, मलम सोबत ठेवावे.

६. डाळ भात, पोळी, भाजी या पदार्थांवर ट्रिपमध्ये जणू बंदीच असते. तेव्हा चकल्या, चिवडा किंवा वेफर्स चवीसाठी जवळ ठेवावेत. मात्र, मुख्य आहारासाठी विविध प्रकारचे पराठे बनवून घेतल्यास उत्तम तसेच, सुका मेवा, फळे घ्यावीत. फळांसाठी फोल्डिंगची सुरी व चाट मसाला छोट्या डबीमध्ये कॅरी करावा.

७. बॅटरी मोबाईल व चार्जर घ्यायला सहसा कुणी विसरत नाहीच, पण प्रवासात बॅटरी चार्ज करणे शक्य नसले किंवा फोन बिघडला, तर अशावेळी महत्त्वाचे नंबर्स, नावे, रस्त्याचा मार्ग, पत्ता अशा नोंदी केलेली एक डायरी सोबत ठेवावी.

अशाप्रकारे, गरजेपुरतेच सामान घेऊन प्रवासाची बॅग पॅक करा. कमीतकमी वजन कॅरी केले, की न थकता, न थांबता भरपूर प्रवास करण्यास तुम्ही मोकळे! विश यु हॅप्पी जर्नी!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares