DURGA BHAGWAT BANNER

प्रेरणादायी ‘दुर्गा भागवत’!

मराठी साहित्यातील विद्वान लेखिका ‘दुर्गा भागवत’ या लोकसंस्कृती, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र तसेच बौद्धधर्माच्या गाढ्या अभ्यासक होत्या. संस्कृत, पाली या प्राचीन भाषा त्यांना अवगत होत्या, तसेच मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या भारतीय भाषांमध्येही त्यांनी प्राविण्य मिळवले. त्यांचे हे भाषाप्रेम इंग्रजी व जर्मन या जागतिक भाषांवरही जडले. याशिवाय लोकसंस्कृती, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, बौद्धधर्म या विषयांचाही त्यांनी संशोधनात्मक अभ्यास केला.

बहुतेकदा शाळा – कॉलेजचा अभ्यास, त्या सततच्या परिक्षा कधी एकदाच्या संपतात असे होते. त्या विचारांच्या अगदी उलट दुर्गाबाईंचा आयुष्यभर नवनवीन विषय जाणून घेत, त्यांचा सखोल अभ्यास करण्याचा ध्यास दिसून येतो. हेच त्यांच्या विद्वेतेमागील गुपित आहे यात शंकाच नाही. ‘व्यक्ति जीवनभर विद्यार्थी असतो’ या संकल्पनेचे जागते उदाहरण म्हणजे दुर्गाबाईंचे आदर्श व्यक्तिमत्त्व!

विविध ऋतूंतील निसर्गाच्या बदलत्या रंगस्वभावाचे शब्दांकन करताना त्या ललितनिबंधांतून व्यक्त होतात. निसर्ग व मानवातील रहस्यमयी नात्याचे डोळस निरीक्षण आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येते. महानदीच्या तीरावर ही गोंडजीवनातील प्रेमकथा ही त्यांची पहिली ललितनिर्मिती, त्यानंतर ऋतुचक्र, भावमुद्रा, पैस, डूब या लिलित संग्रहांचा आस्वाद प्रत्येक मराठी वाचकाने घ्यायलाच हवा.

विविध साहित्यप्रकारांतून व्यक्त होणा-या, हळव्या, रसिक मनाच्या दुर्गाबाईंनीमधील झुंझार व लढाऊ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन आणिबाणीच्या काळात झाले. तत्कालीन अस्थिर लोकशाहीत लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला त्यासाठी त्यांनी कारावासही पत्करला. विद्वत्ता, अखंड ज्ञानसाधना व नवनिर्मितीच्या ध्यासाने परिपूर्ण असणारे दुर्गाबाईंचे निर्भिड व्यक्तिमत्त्व अनंत पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे असेच आहे.

Designed and Developed by SocioSquares