Plastic bags (1)

“प्लॅस्टिकची पिशवी नको म्हणजे नको!”

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी! हे ऐकून बरं वाटण्यासोबत, थोडी चिंताही वाटली असेल ना? समधान याचं की, निदान आतातरी पिशव्यांचा कचरा कमी होईल, तर चिंता उटसुट वापरल्या जाणा-या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून काय वापरावे याची; क्षणोक्षणी हा प्रश्न समोर उभा ठाकणार. त्यावर उत्तर शोधायला हवे, मैत्रिणींनो स्वत:सोबत घराच्यांनाही वेळोवेळी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची लागलेली सवय मोडीत काढायची, तर नवनव्या क्लुप्त्या योजाव्याच लागतील. त्यासाठी राज्यात लागू झालेली प्लॅस्टिक बंदी प्रथम घरात लागू करुया. घरात नवनवे उपक्रम राबवून, हटक्या पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांना वापरातून बाद करण्यासाठी, आहात  ना पदर खोचून तयार?

या मोहिमेचा श्रीगणेशा करुया, घरामध्ये ठिकठिकाणी ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या शोधून काढू. गादी खाली, गॅस सिलेंडरच्या टाकीवर बोळे करुन ठेवलेल्या, फटीसटींत घुसवलेल्या, पिशव्यांत पिशव्या ठेवून जमवलेल्या सगळ्या पिशव्या एकजात हुडकून काढूया, सोबत थर्माकॉलसुद्धा! भारताच्या इतिहासात परदेशी वस्तूंची होळी केल्याची नोंद आहे, तशी आपल्याला प्लॅस्टिकची होळी वैगरे करायची नाही, नाहीतर उलटेच व्हायचे आणि प्रदुषणात भर पडायची. तेव्हा, घरभर लपून बसलेल्या या पिशव्या, थर्माकॉलचे तुकडे किंवा सजावट एकत्र सुक्या कच-यात जमा करा. सखी हे काम तू एकटीने करायचे नाहीस, घरातील सर्व सदस्यांना हाताशी घेऊन पहिली पायरी फत्ते करायची.

असे प्लॅस्टिक पिशव्यांना घरातून बाद केलेत, तरी बाजारातून, शॉपिंगमॉल्स  किंवा सुपरमार्केट्समधून या पिशव्या तुमचा माग काढत पुन्हा घरात घुसतील. जरा सावध रहा आणि खरेदीसाठी घरातून बाहेर पडताना लहानशी कापडी पिशवी सोबत बाळगायची, या पहिला नियम घरातील प्रत्येक सदस्याला सांगा. अर्धे काम तर झाले.

भडक रंगसंगती, फुलाफुलांची डिझाईन्स असलेल्या कापडी पिशव्या वापरण्यास तरुण मंडळी नकार देतात, त्यांचे स्टाईल स्टेटमेंट बिघडते. काही हरकत नाही. टोट्स बॅग्स, ज्यूटच्या बॅग्स मात्र त्यांना नक्कीच आवडतील. या बॅग्सवर हौशेने कलाकुसर करुन, हवे ते डिझाईन्स, हवी ती रंगसंगीत देत स्वत:ची स्वतंत्र्य हॅंडी बॅग तयार करता येईल. थोड्या हलक्या वस्तू कॅरी करण्यासाठी, कागदी पिशव्यांचा वापर करणे देखील सोयीचे ठरेल. सुंदरशा अनेक कागदी पिशव्या बाजारात उपलब्ध असून, घरी बनवताही येतील. झी मराठी जागृतीच्या वेबसाईटवर लवकरच विविध त-हेच्या कागदी पिशव्या बनविण्याविषयीची मार्गदर्शनपर माहिती देणार आहोत. नक्की वाचा, तोपर्यंत “प्लॅस्टिकची पिशवी नको म्हणजे नको” म्हणण्याचा पायंडा पाडून, कापडी पिशव्यांना रोजच्या वापरात स्थान देण्यास प्रारंभ करुया.

चांगल्या कामाला उशीर नको, आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी फक्त काही मिनिटांत प्लॅस्टिक पिशवी घरातून बाद करण्याचा कार्यक्रम प्रथम उरकून घेऊ! चालेल ना? किती मैत्रिणी तयार आहेत? कळवा नक्की, वाट पाहातोय तुमच्या प्रतिक्रियांची!

More Articles
Designed and Developed by SocioSquares