plastic banner

प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ करताना, हे उपाय आजमावा…

प्लॅस्टिकचे डबे शक्यतो वापरु नयेत, पण सोयीच्या हेतून लिक्वीड किंवा मायक्रोव्ह प्रुफ प्लॅस्टिकचे डबे वापरले जातात. वेफर्स, बिस्किटांसारख्या सुक्या खाऊसाठी हे डबे उत्तम ठरतात, पण भाजी, आमटी, लोणच्यासारखे मसालेदार पदार्थ त्यात कॅरी केले, की डब्यांचा रंगही बदलतो, अन्नाचा वासही येत रोहतो. हे डबे कुठल्याही साबणाने कितीदाही घासले, तरी प्लॅस्टिकच्या डब्यांना लागलेले मुख्यत्वे हळदीचे, मसाल्याचे डाग काही केल्या निघत नाहीत. अशाने, त्यात साठवलेले पदार्थ खराब होते, त्याला आधीच्या पदार्थाचा वास येतो आणि लवकरच अशा डब्यांना रोजच्या वापरातून बाद करावे लागते.

महागड्या प्लॅस्टिकच्या डब्यांचेही हेच हाल होतात, यावर उपाय म्हणून पुढील पद्धतींनी डब्यांची सफाई केल्यास ते पुन्हा नव्यासारखे होतील.

  1. चार छोटे चमचे बेकिंग सोडा ९०० मिली पाण्यात मिसळून, तयार मिश्रणात प्लॅस्टिकचे डबे साधारण अर्धा तास बुडवून ठेवावेत. मोठा डबा पाण्यात बुडवून ठेणे शक्य नसते, अशावेळी मिश्रण डब्यात घालून ठेवावे.
  2. त्यानंतर डबे धुवावेत. अजूनही डब्यांतून दुर्गंध येत असेल, तर वर्तमानपत्राचे गोळे डब्यात भरुन झाकण घट्ट बंद करावे. दिवसभर डबे असेच राहू द्यानवेत, यामुळे राहिलेला दुर्गंध कागद शोषून घेईल. नंतर, डबे साबण लावून धुवून घ्यावेत.

आता, प्लॅस्टिकच्या डब्यांवर राहून गेलेले डाग घालवण्यासाठीचे उपाय पाहू.

  1. प्लॅस्टिकचा डब्यात थोडे व्हाईट व्हिनेगर घालावे. ते डब्याच्या सर्व बाजूंना लागेल याची काळजी घ्यावी. व्हिनेगरऐवजी हॅण्ड सॅनिटायझर किंवा रबिंग अलकोहोल वापरलात तरी चालेल.
  2. त्यानंतर, डब्याचे झाकण लावून अर्धा-एक तास तरी डबा तसाच ठेवावा. साध्या डोळ्यांनी न दिसणा-या डब्याला चिकटलेल्या अन्नकणांवर किंवा दुर्गंधीवर वाढणारी बुरशी व्हिनेगरमुळे नष्ट होते.
  3. अर्धा-एक तासानी डब्याचे झाकण काढून त्यातील व्हिनेगर ओतून टाकावे. त्यात आता डीश वॉश लिकविड टाकावे. स्पंज वा ब्रशच्या सहाय्याने डबा घासावा. जास्त कडक दातांचा ब्रश घेऊ नये. नाहितर डब्याला ओरखडे पडतील. नंतर, साध्या पाण्याने डबा धुवून घ्यावा. घट्ट झाकणाने डबा तसाच बंद न करता, त्याला नीट सुकू द्या. थोडा वेळ ऊन्हात ठेवलात तरी हरकत नाही.

आता, प्लॅस्टिकचा डबा किती छान स्वच्छ झालाय, हे तुम्हीच सांगा बरं आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares