fruits (1)

फळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी!

ऋतूनुसार येणा-या फळांचे सेवन करायला हवेच, मात्र या फळांचा आनंद घेताना जरा हटक्या पद्धती वापरल्या तर? विविध प्रकाराच्या भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असणारा ‘फलाहार’ सर्वांच्याच आवडीचा असला, तरी फळांच्या वापरातून बनवता येतील अशा फ्रेश रेसिपीजचा आपण नक्कीच विचार करु शकतो!

अननसाची बर्फी –

साहित्य – अननस(किसून-३ वाट्या), ४ वाट्या साखर, १ वाटी दूध (सायीसहित), १०० ग्रॅ. खवा.

पाककृती – प्रथम अननस स्वच्छ करुन किसून घ्यावा, त्याचा गर मोजून वरील प्रमाणानुसार साखर घेऊन या मिश्रणात दूध मिसळून मिश्रण तापवत ठेवावे. खवा परतून घ्यावा आणि गॅसवरील मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये खवा घालून जरा वेळ मिश्रण ढवळत राहावे व गॅस बंद करुन पुन्हा मिश्रणास थोडावेळ घोटत रहावे. आता, घट्ट झालेले मिश्रण तूप लावलेल्या थाळीत पसरवावे व थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.

कच्च्या पपईची कोशिंबीर-

साहित्य- १ लहान कच्ची पपई, १ लिंबू, बारिक चिरलेली कोथींबीर, तेल, हळद, मीठ, साखर, हिंग.

पाककृती – पपई स्वच्छ धुवून सोलून घ्यावी, त्यामधील कच्च्या बिया काढून टाकाव्यात. पपई किसून घ्यावी. दोन चमचे तेल गरम करुन त्यामध्ये, मोहरी, हिंग, हळद घालून तयार केलेली फोडणी किसलेल्या पपईवर घालावी. आता, तयार मिश्रणात मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर मिसळून तयार झालेली पपईची कोशिंबीर सर्व्ह करावी.

चिकूचे रायते –

साहित्य – २५० ग्रॅ चिकू, अर्धा लि. गोड घट्ट मलईचं दही, दोन चमचे भाजलेले जिरे, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा भरडलेली काळी मिरी, एक चमचा साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

पाककृती –  चिकूच्या फोडी करुन घ्याव्यात. दही चांगलं घोटून त्यामध्ये चवीनुसार साखर, लिंबाचा रस, जिरे, कोथिंबीर, काळीमिरी घालावी. सारे जिन्नस मिश्रणात नीट एकजीव करुन घ्यावेत. नंतर त्यामध्ये चिकूच्या फोडी घालाव्यात व थोडावेळ रायते गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. टिप- रायत्यासाठी शक्यतो कडक चिकू घ्यावेत व  दही घट्ट रहाण्यासाठी मिक्सरमधून घोटून घेऊ नये.

पेरुचा हलवा –

साहित्य- अर्धा किलो साल व बिया काढलेले पेरु, २ चमचे तूप किंवा बटर, दूध, कंडेंस्ड दूध, ३० ग्रॅम खवा, आवडीनुसार ड्राय फ्रुट्स

पाककृती – बारीक चिरलेला पेरू मिक्सरमध्ये फिरवून, त्याची प्युरी करुन घ्यावी. ही प्युरी आहे त्या प्रमाणापेक्षा पाव प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवावी. नंतर, वरुन तूप किंवा बटर घालून २ ते ३ मिनिटे मिश्रण शिजवावे. आता, त्यामध्ये कंडेंस्ड दूध व खवा मिसळून मिश्रण तपकिरी रंगाचे होईपर्यंत शिजवून घ्यावे. वरुन तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट घालून तयार पेरुचा हलवा सर्व्ह करावा.

अननसाची गोड-आंबट चव जपणारी बर्फी व कच्च्या पपईला चटपटीत बनवणारी कोशिंबीर करुन पाहाच, सोबत चिकूची दही रायत्याच्या रुपातील निराळी चव, तर हिरवागार पेरुचा हलवा अशा विविधतेने नटलेल्या वरील रेसिपीज नक्की करुन पाहा आणि फळफळावळ फस्त करा अगदी आनंदाने!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares