photography banner

फोटोग्राफी: एक धम्माल करिअर!!

फोटोग्राफीची आवड असणा-या प्रत्येकाला या क्षेत्रात करिअर करता येईल. मात्र, त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. आदर्श फोटोग्राफर्सच्या पठडीत बसायचे, तर या कलेचे रीतसर मार्गदर्शन घेणेच उत्तम! मुख्यत्वे कॅमेराच तंत्र शिकून घेण्याला वयाची मर्यादा नाही, फक्त मनापासून कॅमेरा विश्व शिकण्याची इच्छी हवी. बेसिक प्रशिक्षणानंतर स्वत:चा स्टुडीओ सुरु करण्यापलिकडेही भरपूर फ्रिलान्स करिअरचे पर्याय आता खुले झालेत. त्यामुळे थोडा पठडीबाहेरचे करिअर म्हणून फोटोग्राफीकडे पाहाता येईल. जसे की,

  • फुड फोटोग्राफी

हॉटेल, रेस्टॉरंट्संना फुड फोटोग्राफर्सची गरज असते. तयार डिश लोकांपर्यंत आकर्षकरित्या पोहोचवायची, तर प्रथम तितकेच चविष्ट त्या डिशचे फोटोज काढायला हवेत. तरच खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटेल ना! जाहिरात देताना अशा फोटोजना हॉटेलच्या जाहिरातीत स्थान दिले जाते.

  • प्रॉडक्ट फोटोग्राफी

मार्केटिंग, जाहिरात क्षेत्रे कायम उत्कृष्ट प्रॉडक्ट फोटोग्राफर्सच्या शोधात असतात. रंग, प्रकाशाचा ताळमेळ साधत वस्तूंचे उत्तम फोटोज काढणे देखील शिकावे लागते. प्रॉडक्ट फोटोग्राफी ऐकण्यास सोप्पी वाटली, तरी तंत्राच्या साथीने वस्तूंचे आकर्षकरित्या फोटोज काढण्याचे शास्त्र प्रथम अवगत करावे लागते.

  • फोटोजर्नलिस्ट

फोटोजर्नलिस्ट हे पत्रकारितेतच निराळे मोठे विश्व आहे. त्यातच फोटोग्राफीचे बरेच लहान मोठे विभाग पडतात. वृत्तपत्रासाठी, मासिकासाठी फोटोग्राफी करताना त्यात पुन्हा गुन्हेगारी, क्रिडा, राजकारण असे आणखी प्रकार पडतात. आवडीनुसार हवे ते निवडता येते. तसेच, कायम सतर्क राहून बातमीवर लक्ष ठेवण्याची तयारीही असावी लागते.

  • वाईल्डलाईफ फोटोग्राफी

जंगल सफारी हा प्रकार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनू शकता. प्राणी, पक्षी, किटक अशांचा तासनतास मागोवा घेत फॉटोग्राफी करण्यासाठी संयम व चिकाटी हवी. असे फोटोग्राफर्स जंगलांमध्ये, कडेकपा-यांत कित्येक दिवस एकाचजागी कॅमेरे लावून प्राणी पक्ष्यांची वाट पाहतात, तेव्हाच तर त्यांना मनाजोगते शॉट्स मिळतात. असे फोटोज् मिसिकांना किंवा वृत्तपत्रांना हवेच असतात किंवा तुम्ही स्वत:चे वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे प्रदर्शनही भरवू शकता.

  • नेचर फोटोग्राफी

भटकंतीची आवड असणारा प्रत्येकजण ट्रिपवर गेल्यावर निसर्गाचे फोटे किमान मोबाईलमध्ये काढतोच. आता, याच फोटोग्राफीचा थोडा खोलवर अभ्यास केला, तर तुमच्यातील नेचर फोटोग्राफरला नक्कीच प्रोफेशनल टच मिळेल. वाईल्डलाईफ फोटोग्राफीप्रमाणे नेचर फोटोग्राफीलाही मागणी आहे. तेव्हा, छंदाला मोठे रुप द्यायला काय हरकत आहे. डिएसएलआर कॅमेराचा अंतर्बाह्य अभ्यास मात्र अपेक्षित आहेच.

  • फॅशन फोटोग्राफी

वर्षानुवर्षे दिमाखात विराजलेल्या फॅशन फोटोग्राफीच्या क्षेत्राचा तोरा असाच कायम राहणार यात शंकाच नाही. फोटोग्राफर्स आपल्या कामातून या क्षेत्रात स्वत:चे वेगळेपण सिद्ध करु शकतात. कारण, या क्षेत्रात करिअरची संधी आहे मात्र स्पर्धा देखील तितकीच आहे.

  • वेडिंग फोटोग्राफी

सध्या कॅमेरा प्रेमी मोठ्या प्रमाणात हा पर्याय निवडताना दिसतात. इथे लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या समारंभातील क्षण सौंदर्यपूर्णरित्या कॅमेरात कैद करायचे असतात. हल्ली कौटुंबिक सोहळा, मग तो कुठलाही असो कॅमेरामन लागतोच. मोबाईलमध्ये उत्तमोत्तम कॅमेरे उपलब्ध झाले असले, तरी प्रोफोशनल्सची मागणी घटलेली नाही. त्यामुळे, प्री वेडिंग शूट, लग्न, बारसं, मुंज, वाढदिवस सर्व प्रकारचे सोहळे फोटोग्राफरशिवाय केवळ अपुर्णच! नवजात बाळाचे कौतुकाने फोटोशूट करुन घेणा-यांची संख्या वाढतेय. बेबी फोटोग्राफी असे खास लहान मुलांची फोटोग्राफी हटक्या पद्धतीने करणारे नवे क्षेत्रही वेगाने रुजू पाहातेय.

 

  • फोटोग्राफी टिचर

स्वत:प्रमाणे आणखी कॅमेराप्रेमी तयार करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते फोटोग्राफीचे शिक्षक होऊन! मुळात शिकवणे, सांगणे, आपल्याजवळील ज्ञान इतरांपर्यंत रंजकत-हेने पोहोचवणे आवडायला हवे. वर्गावर्गांमध्ये प्रात्यक्षिक दाखवून हसत खेळत मुलांना कॅमेराचे तंत्र शिकवून, चांगले व गुणी फोटोग्राफर्स तुम्हाला घडवता येतील.

  • साईन्टिफीक फोटोग्राफर

साध्या डोळ्यांना न दिसणारी सूष्म वैज्ञानिक दृश्ये कॅमेरात बंदिस्त करणे, इथे अपेक्षित असते. कधी पाठ्यपुस्तकासाठी, तक्त्यांसाठी, जाहिरातींसाठी, तन्ज्ञांना अभ्यासासाठी अशा सूष्म अतिसूष्म संशोधनपर दृश्यांचे फोटोज प्रकाशाचा योग्य मेळ साधून काढावे लागतात.

वरील, सर्वच क्षेत्रातील फोटोग्राफर्सना वार्षिक उत्पन्न व्यवस्थित साधता येते. मुख्यत्वे, लग्न, जाहिरात, फॅशन, वाईल्डलाईफ, नेचर, साईन्टिफीक फोटोग्राफीसारख्या क्षेत्रात मानधन अधिक मिळते व बाकीच्या क्षेत्रांत थोडा कमी, पण फायदाच होतो. तोटा होण्याच्या शक्यता फार कमी. यासाठी, प्रथम फ्रीलान्ससर म्हणूनच सुरुवात करावी.  कॅमेरा, कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप, सॉफ्टवेअर असा प्राथमिक भांडवली खर्च येईल. फोटोग्राफर जितका अनुभवी, तितकी त्याची कला देखीण होत जाते व त्याची मागणी वाढते, त्याचे मानधन देखील मग तितकेच जोरकस असते. फक्त, त्याने काळानुसार फोटोजची स्टाईल बदलत रहाणे अपेक्षित असते.

शेवटी प्राविण्य व यश सरावानेच साध्य होते. फोटोग्राफी क्षेत्रात जम बसवायचा असेल, स्वत:ची आवड हेरुन य़ोग्यसे फोटोग्राफी क्षेत्र निवडा व सतत प्रयोगशील राहा. म्हणजे, स्वत:चा निराळा ट्रेंड सेट करता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares