Inspiration > बहुभाषिक – अमृता जोशी
Amruta Joshi Banner

बहुभाषिक – अमृता जोशी

भाषा म्हणजे काय! तर माणसामाणसाला जोड़णारा दुवा म्हणजे भाषा. एक साधा विचार करून पहा, जर जगात भाषाच नसती तर आपलं काय झालं असतं. मुळात अशी कल्पनाच करणं किती कठीण आहे. भारतासारख्या देशात जिथे अनेक धर्माचे, जातीचे लोक राहतात. या देशातच कितीतरी भाषा बोलल्या जातात. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला कमीत कमी 3 भाषा तरी अवगत असतातच. एक म्हणजे त्याची मातृभाषा, दुसरी राष्ट्रभाषा हिंदी आणि तिसरी म्हणजे आजच्या व्यवहारासाठी आवश्यक असणारी इंग्रजी भाषा. पण या व्यतिरिक्त एखादी नवीन भाषा शिकायची म्हटली तर आपण सहसा तयार होत नाही आणि घाबरतो. एखाद्या माणसाला जास्तीत जास्त 4 ते 5 भाषा येऊ शकतात. पण तुम्ही अशी व्यक्ती पाहिली आहे का जिला तब्बल 22 भाषा अवगत आहेत. विश्वास बसत नाही ना! चला, तर मग आज जाणून घेऊयात त्यांच्याविषयी म्हणजेच बहुभाषिक अमृता जोशी यांच्याबद्दल.

 

 

अमृता जोशी यासुद्धा आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातूनच वर आल्या आहेत. त्यांच्या मातोश्री या आकाशवाणी येथे वृत्तनिवेदिका होत्या. पण त्यांच्या घरची परिस्थिती तितकीशी सुबक नव्हती. व्यसनी वडील त्यामुळे होणारा गृहकलह, याचमुळे त्यांच्या मातोश्री यांना ब-याच कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण तरीही त्यांनी खचून न जाता अमृता यांचे संगोपन उत्तम पद्धतीने केलं. तिच्या सर्व आवडीनिवड़ी तसेच कलागुणांना त्यांनी वाव दिला. अमृता हिची जादूची आवड़ लक्षात घेऊन त्यांनी तिला मॅजिक शोमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे अमृता यांना सर्वात लहान जादूगार अशी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी नाटकात बालसंभाजींची भूमिका केली. या गोष्टींमुळे त्यांचे भरभरून कौतुक झाले. जादूचे तसेच नाटकाचे प्रयोग यामुळे देशातच नव्हे तर विदेशात जायची संधी अमृता यांना मिळाली.

भाषेविषयी अमृता यांचे पाय लहानपणीच पाळण्यात दिसले होते. घरात असणारी परदेशी भाषांची पुस्तके वाचून ती समजून घेण्याची त्यांची आवड़ पाहता त्यांनी याच क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. कुठलीही भाषा शिकत असताना आपण ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकली पाहिजे. चुका करण्याची भीती न बाळगता, प्रसंगी आपल्या चुकांवर हसता देखील आले पाहिजे. तरच एखादी नवीन भाषा आपण आत्मसात करू शकतो. तसेच एखादी भाषा परकीय आहे असं म्हणून तिला परकं न करता आपलंसं केल पाहिजे. कारण भाषा जरी वेगळी असली तरी आपल्या मातृभाषेसारखं साम्य आणि साधर्म्य प्रत्येक भाषेत असतं. ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कुठलीही विदेशी भाषा शिकण्याआधी इंग्रजी भाषा ही आलीच पाहिजे हा भ्रम अगोदर मनातून काढून टाकला पाहिजे. इंग्रजी येत नसेल तरी कुठलीही परदेशी भाषा आपण आरामात शिकू शकतो असं अमृता यांना वाटतं.

त्यांचं शिक्षण चालू असताना कोणीतरी अमृता यांना तू सुंदर नाही, कुरूप आहेस असे म्हणून त्यांची हेटाळणी केली होती. म्हणून त्यांनी एके वर्षीच्या मिस इंडिया कांटेस्टमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धेच्या फायनलिस्ट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. यातून त्यांना स्वत:साठी जगाला दाखवून दयायचं होतं की फक्त सुंदरता असून काही होत नाही तर ते मांडण्याची प्रतिभाही असावी लागते. अर्थात त्या जर त्याच क्षेत्रात राहिल्या असत्या तरी त्यांना भरपूर यश मिळाले असते. पण तरी त्यांचे मूळ ध्येय हे वेगळं असल्याने त्या इकडे वळल्या. आजच्या घडीला त्या तब्बल 22 वेगवेगळ्या भाषा बोलू शकतात. याच कारणामुळे त्यांना आज सगळे बहुभाषिक म्हणून ओळखतात. भाषा शिकताना जर त्या भाषेतल्या गंमतीजंमती लक्षात घेऊन जर आपण त्यांचा निखळ आणि मनसोक्त आनंद घेतला तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही असं बहुभाषिक अमृता जोशी यांच मत आहे.

Designed and Developed by SocioSquares