Gender equility (1)

बालमनावर स्त्री-पुरुष समानता रुजवावी अशी!

गेली कित्येक तपे समाजाला पोखरत असलेली स्त्री पुरुष असमानता मुळातून नष्ट करायची, तर तयार होणा-या नव्या पुढीच्या मनात या समानतेचे बी पेरायला हवे. यासाठी, आईवडिलांनी आपल्या वागणुकीतून समानतेचे धडे मुलांपर्यंत पोहोचवायला हवेत. बाळ जाणते होऊ लागताच पालकांनी अधिक सतर्कपणे वागायला हवे. साधारण वयाच्या तिस-या वर्षापासून बाळाची निरीक्षण शक्ती प्रगल्भ होऊ लागते. भोवताली घडणा-या घटनांचा त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन, ते अनुकरण करण्यावर भर देते. तिची कामे – त्याची कामे, तिच्यासाठीचे नियम – त्याच्यासाठीचे नियम, बंधने यातील फरक घराघरांत प्रकर्षाने जाणवतो. आई वडील भावाबहिणींत जाणूनबुजून भेदभाव करीत नाहीत, तरी नकळतपणे घडते व मुलांसाठी मात्र ते सवयीचे बनते.

शरीर ओळख –

मुलांना समज येऊ लागताच, त्यांना भरपूर प्रश्न पडू लागतात. आई बाबांच्या पेहरावातील फरकापासून सुरुवात होऊन, मुलामुलींतील शरीर फरकाविषयी प्रश्न पडू लागतात. अशा प्रश्नांची उत्तरे देणे कठीण असले, तरी टाळाटाळ नक्कीच करु नये. लहान मुलांना शरीर ओळख करुन देणा-या पुस्तकांतींल चित्रांच्या सहाय्याने मुलांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. यामुळे, शरीररचना वेगळी असली, तरी सामाजिक स्थान समान आहे असे सांगणे सोप्पे जाईल.

आडपडदा न ठेवता बोला –

टिव्ही, सिनेमे, व्हिडीओ गेम्स, इंटरनेटद्वारे मुलांपर्यंत काय पोहोचतयं याबाबत सतत जाणून घ्यायला हवं. कारण, माध्यमे जितकी उपयुक्त माहिती देतात, तितकीच निरोपयोगी व अतिरिक्त माहिती देखील देतात. तेव्हा मुलांपर्यंत  पोहोचलेलं योग्य आहे, की अयोग्य जाणून घेण्यासाठी पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधायला हवा. हसत खेळत गप्पा मारत विविध विषयांवर बोलताना त्यांची स्त्री पुरुष समानतेविषयीची मते जाणून घ्यावीत.

आदर्श व्यक्तिमत्त्वे-

शालेय वयात खेळ, सिनेमे, इतिहास, विज्ञान अशा एक ना अनेक विषयांवर मुलांमुलींत आपापसांत गप्पा घडतात. त्यांच्या भावविश्वानुसार ते आपले रोल मॉडेलही निवडतात. बरेचदा त्यांना पुरुष शास्त्रज्ञ, खेळाडू व पुरुष राजकारण्यांची नावे तोंडपाठ असतात. पण, समान क्षेत्रात आघाडीवर असणा-या स्त्रीयांविषयी मात्र माहिती नसते. यासाठीच, पालकांनी प्रकाशझोतात नसलेल्या स्त्री व्यक्तिमत्त्वांची ओळख मुलांना करुन द्यावी. त्यांचे कार्य, त्यांचे योगदान, त्यांच्या शौर्यगाथा सांगाव्यात. जेणेकरुन बालमनावर लिंगभेदाचे कुसंस्कार घडणार नाहीत.

पालकांनी आपल्या वागण्यात इतकी जागृतता आणण्याआधी, रोजच्या व्यवहारात काही लहान बाबी कटाक्षाने पाळाव्यात. किचनमध्ये आईऐवजी बाबांनी पूर्णवेळ काम करावे असा आग्रह नाही, पण किमान फळे काप, भाजी चीर, जेवून झाल्यावर स्वत:चे ताट उचलं, कचरा काढ अशा साध्या कामांमध्ये तरी मदत करावी. जेणेकरुन घरातील लहानमुलं आपणहून काही कामे हातात घेईल. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करण्याचे त्यांच्या मनावर बिंबवले जाईल.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares