fatty (1)

बाळंतपणानंतर पुन्हा फिगरमध्ये येण्यासाठी!

स्त्री-जीवनातील महत्तम टप्पा म्हणजे तिचं आई होणं. वर्षानुवर्ष छान फिगरमध्ये राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणी गरोदरपणात वाढणा-या वजनाचा मनावर फार भार घेतात. गरोदर अवस्थेत बाईचे वजन साधारण ८ ते १० किलोने वाढते. बेली फॅट, डबल चीन, स्ट्रेच मार्क्स येऊ लागतात. पोटाच्या वाढीसोबत संपूर्ण शरीर गुबगुबीत होऊ लागल्याने फिगर बिघडते. सभोवतालची मंडळी जाडेपणावरुन बोलतील, टोपणे मारतील या भितीने, तर कधी आपल्याला स्लीम फिट कपडे घालता यायचे नाहीत, या विचाराने काही जणींना बाळंतपण पार पडल्यावर पुन्हा लगेचच बारीक होण्याची घाई लागते.

मग डॉक्टरांचा सल्ला न घेता जीम किंवा योगाचा मारा व कडक डाएटचा सपाटा लावला जातो. अंगावर दूध पिणा-या बाळांना पुरेसे अन्नघटक मिळत नाहीत. त्याच्या वाढीस अडथळे येतात. तर बाळंतपणामुळे आईच्या शरीराची झालेली झीजही भरुन निघत नाही. अशक्तपणा येतो, बंद झालेली पुन्हा सुरु होताना मानसिक-शारीरिक त्रास शरीराला सहन करावे लागतात; तर कधी व्यंधत्वाचाही सामना करावा लागतो.

या ना अशा अनेक दुष्पपरिणांपासून लांब रहायचे असेल, तर बाळंतपणानंतर बाईनं वजन कमी करण्याचा उगाचचा खटाटोप करुन नये. नॉर्मल डिलीव्हरीनंतर साधारण २ महिने फक्त शरीर पुर्ववत व्हायलाच लागतात. तर सीजरीननंतर आणखी जास्त दिवस लागतात. म्हणजेच, गर्भाशय पुन्हा मूळ आकारात येणं किंवा शरीरातील जीवनसत्त्वांचे संतुलन साधणं या बाबींचे कार्य सुरळीत झाल्यानंतर खरेतर शरीर व्यायामासाठी तयार होते.

खरेतर, बाळंतिणीला पूर्वीपासून सकस आहार देण्याची परंपरा आजही तंतोतंत पाळली जाते. बाकीची मंडळी काळजीपोटी तूपाभरले पदार्थ किंवा डिंकाचे लाडू भरपूर  प्रमाणात खाण्याचा सल्ला देत असली, तरी आत्ताच्या व पूर्वीच्या आहारात, जीवनशैलीतही तितकाचा फरक पडला आहे हे समजून घ्यायला हवे. कारण, या दिवसांत डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचेही नियमित सेवन होत असल्याने त्यांच्याच सल्ल्याने घरगुती पदार्थांचे आहारातील प्रमाण किती असावे, हे देखील समजून घ्यावे. असे केल्याने, शरीरात बिनकामाच्या कॅलरीज साठणार नाहीत व अंग वेडेवाकडे वाढणार नाही.

बाळंतपणानंतर वय चेह-यावर किंवा शरीरावर दिसू नये म्हणून, घटपट करणा-या अनेक स्त्रियांना हेच सांगणं आहे, की प्रथम आईपण मनसोक्त अनुभवण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. बिघडलेली फिगर पुन्हा पुर्ववत होईल, त्यासाठी जरा धीर धरावा लागेल. जसा जसा वेळ जात जाईल, बाळ चालू फिरु लागले. तेव्हा त्याच्या मागे धावताना तुमचे वजन कमी होऊ लागलेच. तसे नाही झाले, तर तेव्हा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने व्यायाम किंवा योगाचा आधार घेऊ शकता.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares