brekffast (2)

ब्रेकफास्ट करावा तर हा ‘असा’!

निद्रादेवीच्या कचाट्यातून स्वत:ची सोडवणूक करुन घेण्यातच सकाळचा प्रहर उलटतो. अर्ध्या झोपेतच शाळा किंवा ऑफीस गाठल्यानंतर दिवसाला खरी सुरुवात होते. या गोंधळात भर पहाटे पोटभर खाणं होत नाही. चहा किंवा ग्लासभर दूध पिऊन घरातून निघतो आणि थेट दुपारी जेवणाच्या डब्यावर ताव मारतो. वर्षानुवर्ष असाच दिनक्रम सुरु असल्याने, खाण्याच्या वेळा अंगवळणी पडलेल्या असतात. त्यानुसारच भूक लागते. शरीराला लावू तशी सवय लागते आणि आपण सारेच चांगल्या सवयींशी दोस्ती करण्यात उत्सुक तर असतोच. तर मग, वयानुरुप पुढील प्रकारे ब्रेकफास्टचा मेनू ठरवता येईल.

लहान मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये दूध तर हवेच आणि दूध पिण्यास टाळाटाळ करणा-यांना मग मिल्क शेक, विविध फळांचे ज्यूस किंवा फळांचे स्मूदीज् द्यावेत. जेणेकरुन दूधाऐवजी शरीराला पोषक असणारी फळांमधील जीवनसत्त्वे त्यांना मिळतील. पॅनकेक्स देखील मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे. या रेसिपीमध्ये वेगवेगळे प्रयोगही करता येतात. कणीक व रव्यासोबत फळांचा गर किंवा सुक्यामेव्याचा चुरा पॅनकेक्सच्या पिठात मिसळता येतो.

तरुणाईची भूक मोठी असतेच, पण प्रौढांनीही अशक्तपणा, सांधेदुखीसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी सकस ब्रेकफास्ट घ्यावा. घरुन खाऊन निघण्यासाठी वेळ मिळत नसेल, घाई होत असेल; तर जेवणाच्या डब्यासारखा ब्रेकफास्टचा डबा सोबत घ्यावा. जेणेकरुन कॉलेज किंवा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तो खाता येईल.

यामध्ये, अती तेलकट पदार्थांचा समावेश नसावा. पोहे, उपमा, इडली, दलिया, उकडलेली अंडी, अंड्याचा पोळा किंवा डाएट सांभाळणा-या ब्रेकफास्टमध्ये ओट्स, सोया, सूजीचा समावेश करता येईल. वाफवलेले मूग, ब्राऊन ब्रेडचे सॅण्डविच खाणेही आरोग्यदायी ठरेल. तसेच, फळांच्या फोडींवर जराचे सैंधव मीठ किंवा चाट मसाला टाकून खाल्यास तोही डाएटपूर्ण ब्रेकफास्ट ठरेल.

वयोवृद्ध व्यकींची पचनशक्ती इतर वयोगटापेक्षा थोडी कमकमुत असते. यासाठी त्यांचा ब्रेकफास्ट शक्यतो जितका हलका असेल, तितके उत्तम ज्यामध्ये तांदळाची कणेरी किंवा काही ठिकाणी पेज म्हटले जाते, ती द्यावी. त्यामुळे, शरीराला ऊर्जा तसेच थंडावा मिळतो. पोहे, उपमा, इडली असे पदार्थ त्यांच्या भूकेनुसार त्यांना कमी जास्त प्रमाणात खाऊ द्यावेत. फळे चावून खाणे शक्य नसते, म्हणून ज्यूस आवर्जून द्यावेत.

मैत्रिणींनो, असा हेल्दी ब्रेकफास्ट घरातील सर्व सदस्यांना सर्व्ह कराल आणि नेमका तुम्हीच तो खाण्याचे विसराल. असे होऊ देऊ नका. दिवसभर लागणारी कामांची रीघ झपझप निपटायची, तर सकाळीच त्यासाठीची ऊर्जा प्रथम शरीरात साठवायला हवी. म्हणूनच, तर हा आरोग्यदायी ब्रेकफास्टचा अट्टहास!

More Articles
Designed and Developed by SocioSquares