bread (2)

ब्रेड खाताय, तर जरा जपून!

पौष्टिक पदार्थ बरेचदा चविष्ट नसतात आणि चवदार चटपटीत पदार्थात पौष्टिक गुणधर्म कमी असतात. जसं की पालेभाज्या, सॅलेड्स चवीची हमी देत नसले तरी जीवनसत्त्वांची देतात, उलटपक्षी फास्ट फूड चवीला झक्कास व शरीराला हानिकारक ठरतात. म्हणूनच, चवीला महत्त्व देतो की पौष्टिकतेस यावरुन आपल्या आवडीनिवडी ठरतात. नावडत्या आवडत्या पदार्थांची यादी तयार होत जाते. तुमची देखील अशी एक यादी असेलच! त्या यादीत ब्रेडला स्थान आहे की नाही हे Sunday blog मधील प्रश्नाद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आहेत. तर, ब्रेड खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट याविषयावर आज इथे सविस्तर माहिती घेऊया.

गव्हाच्या पीठातील कस बाजूला काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा! गव्हातील जीवनसत्त्वांचा यात अभाव असल्याने मैद्याचा आरोग्य स्वास्थ्यासाठी फारसा उपयोग होत नाही. तो अतिशय चिवट असल्याने पचण्यास देखील जड जातो.पोटातील पचनक्रियेत अडथळे निर्माण होऊन, पोटात मग संपूर्ण शरीरभर चरबीचे प्रमाण वाढू लागते.

हल्ली पाककृतींमध्ये सर्रास मैद्याचा समावेश केला जातो, तो झटपट शिजतो आणि पदार्थाला क्षणार्धात चवदार बनवतो.  त्यातही मैद्यापासून बनलेल्या निरनिराळ्या त-हेच्या ब्रेड्सना खवय्ये सर्वाधिक पसंती देतात. व्यस्त दिनक्रमात पोट भरण्यासाठी जेमतेम वेळ राखीव ठेवलेला असताना, वेळेची बचत करणारा ब्रेड खाणे सोयीस्कर ठरते. त्यात शाकाहारी-मांसाहारी अशा दोन्ही गटांना नरम गरम पावाने भुरळ घातली आहे. भाकरी, चपाती करण्याचा वा खाण्याचा कंटाळा आल्यास रेडीमेड मिळणा-या पावाचा पर्याय निवडला जातो. कित्येक फूड ब्रॅण्ड्स ब्रेडचा समावेश करुन अनेक नवनवे पदार्थ बनवतात, आधी आकर्षक जाहिरातींद्वारे ते घराघरांत पोहोचतात नंतर मनामनात पक्क स्थान निर्माण करतात. ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो. लहानगे टिफीन बॉक्समध्ये ब्रेड-बटर, ब्रेड-जॅम किंवा सॅण्डविज नेण्यास एका पायावर तयार असतात, हा अनुभव तुम्हीही घेतला असेल.

मात्र अशा या हमखास सर्वांना आवडणा-या ब्रेडच्या पदार्थांचे शरीरावर होणा-या दुष्परिणाम देखील तितकेच गांभीर्याने घ्यायला हवेत.  ब्रेडमधून शरीराला पोषक द्रव्ये मिळत नसल्याने फक्त वजन वाढीस हातभार लागतो. ज्यामुळे, लहान थोर सा-यांमध्येत लठ्ठपणाचा आजार बळावतो. पुढे लठ्ठपणामुळे उद्भवणा-या आणखी ढिगभर आजारांना एकप्रकारे आपण आमंत्रणच देतो.

यावर उपाय म्हणून, व्हाईट ब्रेडच्या तुलनेत ब्राउन ब्रेड खाणे केव्हाही उत्तम! हा ब्रेड संपूर्णत: गव्हापासून बनलेला असल्याने त्यामध्ये पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रियेसही अडथळ येत नाहीत. तरी याचे अती सेवन करणे टाळावे. त्यामुळे, ब्रेड प्रकरणावर अखेरचा उपाय विचाराल तर नियमित घरगुती पोळी किंवा भाकरी खाण्यावर भर द्यावां. ब्रेड खाणं शक्यतो टाळावच, नाहितर किमान ब्राउन ब्रेडची निवड करावी.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares