breast feeding banner

ब्रेस्ट पंप वापरणं ‘योग्य’ की ‘अयोग्य’? वाचा इथे…

नवजात बाळासाठी अमृतासमान असणारं आईचं दूध त्याला नियमित मिळायलाच हवं, हे सूत्र प्रत्येकाला तोंडपाठ आहे. नवमाता गृहिणी असेल तर प्रश्नच नाही. बाळाकडे पूर्णवेळ लक्ष देत, त्याला दूध पाजण्याच्या वेळा ती छान जपते. कारण, यावरच बाळाची सर्वांगीण वाढ अवलंबून असते. मात्र, आजकाल बहुतांश नवमाता या नोकरी किंवा व्यवसाय करणा-या असतात. बाळंतपणानंतर तिला लगेचच घराबाहेर पडावं लागतं. बाळाला घरी ठेऊन, त्याच्याच सुखकर भविष्यासाठी ती पुन्हा कामावर रुजू होते. अशावेळी, त्याला दिवसभर आईचं दूध मिळावं म्हणून ऑफिसला जाण्यापूर्वी हातानंच थोडं दूध भांड्यात काढून जाण्याची पद्धत नवमाता आजमावतात. हे काम सोप्पं करणारं ब्रेस्ट पंपसारखं यंत्र दिमतीला आलं आणि तान्ह्यासाठी भरपूर प्रमाणात आईच्या दूधाची साठवणूक करणे शक्य झाले. यामुळे, फक्त नोकरी करणा-या नाही, तर गृहिणींनाही काही कामासाठी घराबाहेर जायचे असल्यास, तान्ह्याच्या दूधाची व्यवस्था करुन त्याला घरातल्यांकडे सोपवत बाहेर जाऊन येता येते. फक्त या ब्रेस्ट पंपच्या वापर करताना सुवर्णमध्य साधता यायला हवा. सोय पहाताना अतिरेक होता कामा नये.

प्रथमत: ब्रेस्ट पंपची निवड करताना, कामचलाऊ वस्तू विकत घेण्याची चूक करु नये. हा मातेच्या व बाळाच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महाग वाटला, तरी योग्य ब्रॅण्डाचाच ब्रेस्ट पंप घ्यावा आणि पंपचा वापर किती प्रमाणात केला जाणार आहे, यावर कुठल्या प्रकारचा पंप निवडायचा ते ठरवता येईल. मॅन्युअल पंपने दूध काढताना आई देखील थकते व वेळही लागतो. पण, क्वचित वापर होणार असल्यास मॅन्युअल पंप सोयीस्कर ठरतो. याउलट, रोजच्यारोज पंपचा वापर करणा-या नवमातांनी इलेक्ट्रॉनिक पंपचा विचार करायला हरकत नाही. वेळ कमी घेते व दूधही जास्त प्रमाणात मिळते. तसेच, ब्रेस्ट पंपचे साहित्य वेळोवेळी निर्जंतूक करावे व स्टीलच्या भांड्यातच दूध साठवावे. काचेच्या भांड्यात दूध साठवल्याने दूधातील आरोग्यदायी पेशी काचेला चिटकून रहातात व बाळापर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत. सामान्य तापमानाला हे दूध साधारण चार तास टिकून रहाते, तर फ्रिज वा फ्रिजरमध्ये आणखी काही तास व्यवस्थित रहाते. दूध जास्तीतजास्त काळ टिकवून ठेवण्याच्या युक्त्या आपल्याला अवगत असल्या, तरी शक्यतो ताजे दूध बाळाला देण्याचा अट्टहास ठेवावा.

अशाप्रकारे, ब्रेस्ट पंपच्या वापरातून आपण सोय तर साधली. मात्र, यापलिकडे अप्रत्यक्षरित्या होणा-या भावनिक नुकसानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. स्तनपानाची क्रिया आई बाळातील परस्पर नात्याचा भावबंध नकळतपणे दृढ करीत असते. तान्ह्याचे आईचा स्तन चोखणे, हे त्या नवमातेच्याच शारीरिक हिताचे असून, यामुळे अधिकाधिक दूध तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत सुरु राहते. कारण, ब्रेस्ट पंपने दूध खेचून घेण्यात एक यांत्रिकपणा आहे, जो या प्रक्रियेस पूर्णत्व देण्यास कमी पडतो.

यावरुन आपल्याला लक्षात येईल, की ब्रेस्ट पंपचा वापर दिवसभरातून कितीही वेळा करणे शक्य असले, त्यावर फारशी मर्यादा नसली. तरी प्रत्येक नवमातेने ती स्वत:वर घालून घ्यायला हवी. कामावरुन घरी परतल्यावर वा सुट्टीच्या दिवशी जेव्हा केव्हा शक्य असेल, तेव्हा बाळाला पंपचा वापर न करता दूध पाजावे. हेच, बाळ बाळंतिणीच्या आरोग्यासाठी हिताचे ठरेल.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares