Summervacation (1)

भटुकड्यांची टूर निघाली!!

उन्हाळ्याचा उकाडा दिवसेंदिवस वाढतोय शाळेला सुट्टी पडल्याने मुलंही कंटळालीयेत! फिरायला जायचं म्हटलं तर, कुठे जायचं?, कसं जायचं? तुमच्या मनातील अशा प्रश्नांना आम्ही देऊ उत्तरं आमच्या ब्लॉग्सद्वारे, चला बच्चे कंपनीला घेऊन मनसोक्त हिंडून या!!
कर्नाळा पक्षी अभयारण्य-
काऊ – चिऊ या बोबड्या बोलातून पक्ष्यांशी ओळख होण्यास सुरुवात झाली, की पुढे पक्ष्यांचे विविध प्रकार, रंग, लहान मोठ्या आकारातील आकर्षक चोची, त्यांच्या त-हेत-हेच्या आवाजाची तर निराळीच मौज वाटते. नाजूक शरीरयष्टी असणा-या पक्षी जगताची आणखी जवळून ओळख करुन घेता येईल कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देऊन! शहरातील गर्दीतून जरा विश्रांती घेऊन, येथील शांततेत निसर्गाच्या सोबतीने पक्ष्यांचे निरीक्षण करण्याचा आनंद घ्यायलाच हवा. सोबतीला कर्नाळा किल्ल्याचे मोहक सौंदर्य देखील आहेच. मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असणारे हे अभयारण्य भटकंती प्रिय असणा-यांचे आवडते ठीकाण असून, पनवेलहून टॅक्सी किंवा रिक्षाने कर्नाळ्याला पोहोचला येते.
ताडोबा व्यघ्र प्रकल्प-
पशु प्रेमींनी भेट द्यायलाच हवे असे ठिकाण म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प! वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात बिबट्या, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा असे प्राणीही आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात राहणा-या आदिवासी जमातींच्या तारु किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन त्या जंगलास ताडोबा हे नाव पडले असावे, असे म्हटले जाते. ६२५ स्क्वेअर किलोमीटर इतके मोठे क्षेत्रफळ असणारा अंधारी व्याघ्र प्रकल्प मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूरला जाऊन, पुढे बसने ताडोबाला पोहोचता येते. कारने जाण्याचा विचार करत असाल, तर धुळे – जळगाव – अकोला – यवतमाळ – चंद्रपूर – ताडोबा या अशा मार्गाने जाऊन, कुटुंबासह छान एकदिवसीय सहलीचा आनंद घेता येईल.
पाचगणी –
महाराष्ट्रातील सह्याद्रिच्या रांगांविषयी वेगळे काय वर्णावे, पण येथील पाच टेकड्यांमधील दांडेघर, खिंगर, गोडवली, अमरळ व तैघाट या पाच गावांच्या मधे वसलेले ‘पाचगणी’ नावाचे पठार म्हणजे रम्य देखाव्यांची पर्वणीचं! हे ठिकाण ‘टेबल टॉप’ किंवा ‘टेबल लॅंड’ या नावाने ओळखले जाते. पुण्याहून साधारण १०० किमी व मुंबईहून साधारण २८५ किमी अंतर पार करुन पाचगणीला पोहोचता येते. साता-याहून ४५ किमी, तर वाईहून १० किमी अंतरावर पाचगणी वसले आहे. मिथ्यकथांची पार्श्वभूमी असणारे सिडने पॉईंट, कृष्णा पॉईंट, डेव्हिल्स किचन पॉईंट अशी ठिकाणेही पहाण्यासारखी आहेत.
तोरणमाळ –
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास कुठलेही शहर नसल्याने वर्दळमुक्त तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे. गडाच्या पायथ्यापासून सात आडवी वळणे घेत जाणारा ‘सात पायरीचा घाट’, सिताखाई आणि यशवंत तलाव ही तेथील विशेष आकर्षणे आहेत. तोरळमाळच्या पायथ्याशी औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्रही आहे. नाशिक – धुळे – शहादा असा रस्तामार्ग पार केल्यानंतर शहाद्यापासून मिनी बससेवा आहे. बस थेट तोरणमाळच्या माथ्यापर्यंत जाते.
वर्षभर सुरु असतात क्लासेस व शाळा, गावाला जाण्याचाही आलायं कंटाळा, मग सहलीचा विचार करायलाच हवा. उन्हाळी हिटच्या झळांपासून जरा ब्रेक घेत, मे महिन्याची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी आपण निसर्गरम्य ठिकाण शोधत असतो. म्हणूनच, महाराष्ट्राचं सौंदर्य उलगडणा-या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. यंदाची सुट्टी घालवायची असेल मजेत, भेट देत रहा आमच्या भटकंती स्पेशल ब्लॉग्सना!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares