Bhaji Recipe (1)

आता, पालेभाज्या आनंदानं पोटात जातील!

भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्या, तरी नेहमीच्या भाज्यांचे त्याच  त्याच चवीचे पदार्थ करायचाही कंटाळा येतो आणि खायचाही. अशावेळी,  नकोशा भाज्यांचं काहितरी चविष्ट बनवायला हवं. तरचं, त्या आवडीनं पोटात जातील. म्हणूनच, घेऊन आलोय आजच्या चवदार रेसिपिज्…

मेथी पुरी:

साहित्य- मेथीची पानं, १/२ वाटी कणिक, १ चमचा चण्याचे पीठ, १ चमचा तांदळाचे पीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद, तेल, पाणी

पाककृती- कणिक, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ, सर्व जिन्नस एकत्र करुन पाण्याच्या सहाय्याने मळून घ्यावे व थोडावेळ झाकून ठेवावे.  तयार मिश्रणाच्या पु-या लाटाव्यात आणि छान तळून घ्याव्यात.

पालक वडी:

साहित्य- १ जुडी पालक, १ कप बेसन, आले लसूण पेस्ट, १ टे.स्पू. चिंचेचा गोळा किंवा २ टे.स्पू. दही, एक टि.स्पू. तेल, १ लहान चमचा हिंग, पाणी, गरम मसाला, तिखट व मीठ चवीनुसार

पाककृती- पालकाची पाने बारीक चिरून घ्यावीत. त्यानंतर बेसनात दही किंवा चिंचेचा कोळ, आले लसूण पेस्ट, हिंग, गरम मसाला, तिखट, मीठ घालून मिश्रण जाडसर भिजवून घ्यावे. त्यामध्ये, चिरुन घेतलेला पालक मिसळावा आणि पुन्हा मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

आता, कूकरच्या तळाशी थोडे तेल लावून घ्यावे, त्यावर तयार मिश्रण पसरवावे. कूकरला शिट्टी न लावता २० ते २५ मिनिटे हे मिश्रण वाफवून घ्यावे. मिश्रण पूर्ण थंड झाले की आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या वड्या कापाव्यात.

कोथिंबीर बारीक चिरुन वड्यांवर पसरावी किंवा वरुन फोडणीही देता येईल. जिरे, मोहरी, मिरची तत्सम पसंतीनूसार फोडणीमध्ये हवे तसे जिन्नस घेता येतील.

भाज्यांचा पराठा:

साहित्य- १/२ कप किसलेला गाजर, १/२ कप बारीक चिरलेली कोबी, १/२ कप वाटलेले हिरवे वाटाणे, १/२ कप बारीक चिरलेला घेवडा, १ टे.स्पू. तेल, १ बारीक चिरलेला कांदा, १/२ टि.स्पू. आलं, २ टि.स्पू. लसूण, १ टि.स्पू. गरम मसाला, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आमचूर व मीठ चवीनूसार

आवरणासाठी १ कप गव्हाचे कणिक, २ टि.स्पू. तेल, १/२ टि.स्पू. मीठ

पाककृती- प्रथम सर्व भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात व कढईत तेल गरम करुन त्यात जिरे, हिंग, हळद, चिरलेला कांदा, किसलेलं आलं, किसलेला लसूण घालावा.

कांदा व लसूण किंचिच गुलाबी दिसायला लागल्यावर त्यात गरम मसाला घालून एखाद मिनिटं पुन्हा मिश्रण परतावे.

आता, त्यामध्ये चिरुन घेतलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्या, लाल तिखट व आमचूर घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे.

कणकेमध्ये १/२ टि.स्पू. मीठ व २ टि.स्पू. तेल घालावे. पाण्याच्या सहाय्याने कणिक मळून घ्यावी. मळलेली कणिक थोडावेळ झाकून ठेवावी.

आता, कणकेचा साधारण २ इंचाएवढा गोळा घेऊन त्याची मोठी पुरी लाटून घ्यावी आणि तयार केलेल्या सारणाचा छोटा गोळा लाटलेल्या पुरीच्या मध्यभागी ठेवावा. त्याला पुरीचे आवरण द्यावे.

त्याचा जाडसर पराठा लाटून घ्यावा. तव्यावर तेलाच्या सहाय्याने पराठा दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावा.

कशा वाटल्या आजच्या रेसिपीज्? बनवून पाहा व आठवणीने कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील comment box मध्ये.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares