animal banner

भूतदयेचे नवखे मार्ग!

पाळीव प्राण्यांची नावे सांगा? हा प्रश्न शाळेय अभ्यासक्रमात हमखास असतो. मग, त्यात कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, बैल, घोडा, ससा, मासा, कासव आणि तत्सम इतर प्राण्यांची नोंद होते. हल्ली जागेच्या कमतरतेमुळे शक्यतो, कुत्रा, मांजर, मासा वा कासव इतक्याच प्राण्यांनाच पसंती दिली जाते. पण, निस्सिम प्राणीवेड्यांचं इतक्यावरच भागत नाही. पशूपक्ष्यांच्या अधिकाधिक संपर्कात रहता यावं, त्यांना हाताळता यावं, त्यांची जीवनशैली जाणून घेता यावी या उद्देशाने काही नवे मार्ग ते धुंदाळताना दिसतात.

बरेचशी मंडळी, पशुपक्ष्यांसाठी कार्यरत असणा-या सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवकाची भूमिका स्विकारुन ना नफा, ना तोटा तत्त्वावर त्यांच्यासोबत कार्य करतात. एका बाजूला कॉलेज पूर्ण करताना आठवड्यातून एखाद दिवस प्राणी पक्ष्यांसोबत मनसोक्त वेळ घालवतात. अपघातात जखमी झालेली भटके प्राणी वा पक्ष्यांची वेळीच दखल घेत. त्यांच्यावर प्रथमोपचार करत, त्यांना नवजीवन देण्याचं भल काम या एनजीओज करतात. प्राथमिक पातळीवरील या कामासाठी पशुक्षेत्रातील विशिष्ट डिग्रीची गरज नसते, तर एनजीओजचे स्वत:चे काही प्रशिक्षण वर्ग असतात, त्यांच्या चमूत सामील व्हायचे तर अट एकच तुम्ही प्राणीमित्र असायला हवे.

मानवाने जंगलावर आक्रमण केले आणि तेथील मुके जीव वाट भरकटून शहरात येऊ लागले. यामुळेच, वानराचे दर्शन घडते, तर कधी एखादा दुर्मिळ पक्षी बिल्डींगच्या आवारात दिसतो. याहून भयंकर म्हणजे सरपटणारे प्राणी तर सर्रास धप्पा देतात आपल्याला! अशावेळी, हेच प्राणीमित्र उपयोगी पडतात. मोठ्या कौशल्याने भरकटल्या प्राण्यास पकडून त्यांना सुखरुन जंगलात वा राष्ट्रीय उद्यानात सोडतात. काही पूर्णवेळ प्राणिमित्र म्हणून कार्यरत असतात, तर काही हौसेखातर एखाद्या निराळ्याच क्षेत्रात काम करताना, फावल्या वेळात प्राणिमित्राचीही भूमिका निभावतात.

हे प्राणी प्रेम करिअरच्या वाटेवरही नेता येईल. आपली आवडीच्या क्षेत्रात करिअर करणं कुणाला आवडणार नाही? कुठलेही क्षेत्र निवडून नोकरी व्यवसायात पिचून न जाता, नवी पिढी पैसे कमवण्याच्या मार्गास मनसोक्त जगण्याचीही जोड देते.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफर –

फोटोग्राफीला कुठलेही क्षेत्र आता वर्ज्य राहिलेले नाही. त्यांत वाईल्ट लाईफ फोटोग्राफीची पंरपरा तर फार जुनी. फोटोग्राफीची आवड असेल व प्राणीपक्ष्यांच्या अभ्यासात रस असेल तर जरुर हे क्षेत्र निवडावे. वेगाने विस्तारणा-या डिजीटल क्षेत्रात वाईल्ड लाईफ फोटोग्राफीतही असंख्य पाऊलवाटा खुल्या आहेत.

व्हेटर्नरी डॉक्टर्स –

नव्या रुपड्यात तरुणाईला आकर्षित करणारा करिअरचा हा पर्याय. साध्या शब्दात सांगायचं तर पशुवैद्य! प्राण्यांच्या डॉक्टर्सना पूर्वीपेक्षा आता जास्त महत्त्व आणि अस्तित्त्व दोन्ही प्राप्त झालंय. कारण, व्यक्तिंचा पाळीव प्राण्यांकडचा ओढाही वाढलाय. लहान कुटुंब, एकटं रहाणं, अशावेळी सोबतीला कुणी हवं या उद्देशातून वा आवडीतून कुत्रा किंवा मांजर पाळणं पसंत करतात. त्यात विविध भारतीय तसेच परदेशी ब्रीड ठायीठायी दिसतात. त्यामुळे, या क्षेत्रातील आव्हानेही वाढलीत. प्रत्येक नव्या जातीचा अभ्यास, त्यांच्या देखभालीचे फंडे, त्यानुसार त्यांचे औषधोपचार करणा-या तन्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. प्रॅक्टिस करता येईल किंवा स्वत:चं क्लिनिक उभारुन पेट स्टुडीओ काढू शकता. या क्षेत्रात आत्मविश्वासाने उभं रहाण्यासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणं गरजेचं आहेच.

पेट ग्रुमर –

लहान मुलांचं करावं इतकं कोडकौतुक प्राणी पक्ष्यांचं करतानाचे व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. त्यांचे कपडे, हेअर कट, फॅन्सी हेअर बॅण्ड्स, बो, सॉक्स, बूट एक ना अनेक प्रकारे त्यांना देखणं करण्याच्या चढाओढीमागे पेट ग्रुमर्सचा हात असतो. पार पडणा-या प्राण्यांच्या सौंदर्य स्पर्धांत उतरणा-या स्पर्धकांच्या मालकांस अशा पेट ग्रुमर्सची गरज असते. खाण्यापासून देखणेपणापर्यंतच्या सगळ्या सवयींत काय योग्य काय अयोग्य सारं या ग्रुमर्सना ठाऊक असतं. प्रशिक्षणाअंती आदर्श पेट ग्रुमर म्हणून करिअरला सुरुवात करता येते.

अशाप्रक्रारे, भूतदया फक्त छंद न रहता, जगण्याचा भाग बनवण्याची सुवर्णसंधी देणा-या या क्षेत्रांचा तरुणाई गांभीर्याने विचार करते आहे. हे स्वागतार्हच आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares