women me too

काय आहे #MeToo मोहिम?

बायका बोलक्या, बडबड्या असतात. चार डोकी जमली, की लागलीच चर्चासत्र भरतात. अमक्या तमक्याचं, वरवरचं, गावभरचं किती विषयावर बोलतात, तरी जे बोलायला हवं तेच नेमकं दडवून ठेवतात. अगदी मनातलं? खोलवरचं? त्या खरचं बोलतात का? स्वत:ची चूक नसूनही लाजीरवाणं करतात, ते लैगिंक अत्याचाराचे कटू क्षण. अशा विकृतीला बळी पडलेल्या स्त्रिया तिचा दु:खद अनुभव कधीच कुणा सांगण्या धजावत नाहीत. चारचौघांत उघडपणे न बोलून, मूक गिळून गप्प बसणे पसंत करतात. कारण, प्रश्न स्वत:च्या, घराच्या इज्जतिचा असतो. व्यक्तिमत्त्वाला गालबोट लागणार या विचारानेच थरकाप उडतो. चर्चा होईल, नावं ठेवतील, बोलं लावतील, रस्त्यानं जाताना वळून वळून पाहातील, सगळ्यांहून वेगळं काढतील, नातं कायमचं तोडतील अशा पिढीजात पोसलेल्या मानवी स्वभावांना शरण न जाता, अबोलपणा सोडून दुर्दैवी अनुभव जगासमोर सांगत स्त्रीने ‘बोलकं’ व्हायला हवं! हेच म्हणतेय मी टू मोहिम!

जगभरातील स्त्रियांना ‘न घाबरता बोल’ म्हणतेय, सोशल मिडीआच्या सहाय्याने एकसंध बांधतेय. अनेक स्त्रिया या आवाहनाला स्विकारुन लैगिंक अत्याचाराबाबतचे स्वानुभव खुल्यामनाने सांगतायेत. मुख्यत्वे, सिनेतारका, उच्चपदावर कार्यरत असणा-या स्त्रिया मोठ्या धैर्याने, वर्षानुवर्षे जड झालेले मन बोलून हलके करतायेत. मोहिमेची बांधणी भक्कम होतेय. यासा-याचा सार म्हणजे, सामान्य महिलांना निदान ‘आपण एकटे नाही’ या विचाराची सोबत मिळतेय. पण, त्या कदाचित इतक्यात बोलणार नाहीत. लहानपणापासून मनावर बिंबवलेलं ‘कुणाकडे बोलू नकोस’ हे वाक्य इतक्या सहजी कसं पुसलं जाईल?

मुली असा प्रसंग ओढवल्याचे आई, बहिणी किंवा मैत्रिणीकडे बोलण्यास चाचरतात आणि बोलल्याच तर मंडळी तिलाच गप्प बसण्याचा, कुणाकडे याबद्दल न बोलण्याचा सल्ला देतात किंवा  तिच्याच वागण्यातली खोट दाखवली जाते. यामुळे, लैगिंक छळ करणारा मोकाट सुटतो आणि ती घडल्या घटनेचे दडपण घेऊन जगू लागते, नकळत तिच्यामनात स्वत:विषयाचा न्यूनगंड वाढीस लागतो. पुढे ती देखील नव्या पिढीला असेच मौन बाळगण्याचा सल्ला देते. झालं! लहान रोपट्याची वाढ पुन्हा इथेच खुंटते, त्याला मनसोक्त फोफवण्यास वाव मिळत नाही. म्हणून, संस्कार देणारी मातीच जरा चाचपडून पाहायची गरज आहे. तिला सुपिक बनविणारे ‘विश्वासरुपी’ खत घालायला हवे. लहान मुलींना मनमोकळं बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, त्यांच ऐका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. बघ्याची भूमिका न घेता, तिला भक्कम साथ देऊन न्यायाची मागणी करा.

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेची नाही, तर तो अत्याचार तिच्यावर लादणा-याची मान शरमेने खाली जायला हवी. यासाठी, आपली व्यथा सांगणा-या स्त्रीवर किमान विश्वास दाखवण्याची गरज आहे. #MeToo म्हणत स्वत:वर ओढवलेला अघटीत प्रसंग सांगण्याची हिंमत करणा-या स्त्रियांना फक्त सहानुभूती न देता, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही असायला हवे. तसेच, #MeToo मोहिमेत सामील होऊ, बेडरपणे स्वत:चे अनुभव सांगून मनमोकळे बोलण्याचा हा प्रपंच असाच सुरु ठेवूया. साथ स्वत:ला स्वत:ची देऊ, मग सा-याजणी आपसूकच एक होऊ!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares